NASA चं प्रमुखपद पहिल्यांदाच महिलेकडे? जो आणि कमला ऐतिहासिक निर्णय घेण्याची शक्यता

NASA चं प्रमुखपद पहिल्यांदाच महिलेकडे? जो आणि कमला ऐतिहासिक निर्णय घेण्याची शक्यता

1958 साली स्थापना झाल्यापासून 'नासा'चं (NASA chief) प्रमुखपद केवळ पुरुषांनीच भूषवलं आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 23 जानेवारी :अमेरिकेच्या 'नासा' (NASA) या जगप्रसिद्ध अंतराळ संशोधन केंद्राचं प्रमुखपद पहिल्यांदाच महिलेकडे येणार आहे? कदाचित तशी शक्यता आहे. 1958 साली स्थापना झाल्यापासून 'नासा'चं प्रमुखपद केवळ पुरुषांनीच भूषवलं आहे. अमेरिकेचे नवे अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) या जागेवर महिलेची नियुक्ती करून ऐतिहासिक निर्णय घेऊ शकतील, असा आडाखा बांधला जात आहे.

अमेरिकेचे 46वे अध्यक्ष म्हणून डेमॉक्रेटिक पक्षाचे जो बायडेन यांनी 20 जानेवारी 2021 रोजी कार्यभार स्वीकारला. त्याच वेळी 'नासा'चे मावळते प्रमुख जिम ब्रिडेन्स्टाइन (Jim Bridenstine) आपल्या पदावरून अधिकृतपणे पायउतार झाले. स्वतः रिपब्लिकन पक्षाचे असलेले आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नियुक्ती केलेले ब्रिडेन्स्टाइन यांनी त्यांच्या कार्यकाळाच्या अखेरच्या टप्प्यात महत्त्वाकांक्षी आर्टेमिस (Artemis) कार्यक्रमाच्या प्रगतीसाठी बरेच प्रयत्न केले. या कार्यक्रमांतर्गत 2024पर्यंत चंद्रावर पुढचा मनुष्य आणि पहिली महिला उतरणार आहे. ''नासा'चा संचालक म्हणून काम करायला मिळणं हे माझं मोठं भाग्य होतं. अत्यंत सुंदर अशा 'नासा फॅमिली'ला मी 'मिस' करीन. या अत्यंत उत्तम अशा संस्थेबद्दल मी आजन्म कृतज्ञ राहीन,' असं ट्विट ब्रिडेन्स्टाइन यांनी 20 जानेवारी रोजी केलं होतं.

'आर्टेमिस कार्यक्रमाची शाश्वतता दीर्घ काळ राहावी, यासाठी आवश्यक ती सहमती मिळवण्यासाठी आवश्यक ती प्रत्येक गोष्ट आम्ही केली. एकमताने पुढे जाण्यासाठी आम्ही गेल्या तीन वर्षांत जे प्रयत्न केले आहेत, त्यावरून आम्ही चांगल्या स्थितीत आहोत, असं मला वाटतं,' असं ब्रिडेन्स्टाइन यांनी 'दी व्हर्ज'ला सांगितलं.

'नासा'चे हंगामी अॅडमिनिस्ट्रेटर (Asministrator) म्हणून जो बायडेन यांच्या प्रशासनाने सध्या स्टीव्ह जुर्स्झिक (Steve Jurczyk) यांची नियुक्ती केली आहे. पूर्ण वेळ अॅडमिनिस्ट्रेटरची नियुक्ती होईपर्यंत स्टीव्ह जुर्स्झिक हा कार्यभार सांभाळतील. 'नासा'च्या वेबसाइटवर दिल्या माहितीनुसार, स्टीव्ह जुर्स्झिक 1988पासून 'नासा'मध्ये कार्यरत असून, मे 2018पासून ते असोसिएट अॅडमिनिस्ट्रेटर म्हणून काम पाहत आहेत.

जो बायडेन-कमला हॅरिस यांनी नवे राष्ट्राध्यक्ष-उपराष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतरच्या काही तासांत त्यांनी 34 जणांकडे विविध महत्त्वाच्या पदांचा हंगामी कार्यभार सोपवला. त्यापैकी स्टीव्ह जुर्स्झिक हे एक आहेत.

बायडेन-हॅरिस यांचं मंत्रिमंडळ वैविध्यपूर्ण असून, त्यात महिलांची संख्या विक्रमी आहे. कॅबिनेट आणि कॅबिनेट पातळीवरील पदांसाठी बायडेन यांनी 12 महिलांची नावं सुचवली आहेत. त्यापैकी आठ महिला कृष्णवर्णीय आहेत. या सगळ्यांची नावं मंजूर झाली, तर तो नवा विक्रम ठरेल. कारण यापूर्वी बिल क्लिंटन यांच्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात एकाच वेळी नऊ महिला कार्यरत होत्या.

कोलोरॅडो विद्यापीठामध्ये अॅस्ट्रोफिजिक्स आणि प्लॅनेटरी सायन्स या विषयांचे प्राध्यापक जॅक बर्न्स (Jack Burns) यांनी सांगितलं, 'बायडेन-हॅरिस यांचं प्रशासन नासाच्या प्रमुखपदी पहिल्यांदाच महिलेची नियुक्ती करण्याचा निर्णय घेईल, असं मला वाटतं. तसा निर्णय घेतला जाणं दीर्घ काळापासून प्रलंबित आहे आणि तसं झालं तर ते खूपच एक्सायटिंग असेल. त्या संदर्भात विचारासाठी पुढे ठेवण्यात आलेली नावं खरंच खूप उच्चविद्याविभूषित आहेत.'

बर्न्स यांनी नासाच्या अनेक पॅनेल्सवरही काम केलं असून, ट्रम्प यांनी कार्यभार स्वीकारला तेव्हा ते ट्रान्झिशन टीमचे सदस्य होते आणि 'नासा'च्या कामांना वेग मिळावा म्हणून कार्यरत होते.

बर्न्स यांनी कोणाचंही नाव उघड केलं नाही; मात्र एलेन स्टोफन (Ellen Stofen), पॅम मेलरॉय (Pam Melroy) यांसारख्या काही उच्चविद्याविभूषित महिलांचा बायडेन यांच्या प्रशासनात 'नासा'च्या आठ जणांच्या ट्रान्झिशन टीममध्ये समावेश आहे.

स्टोफन या प्लॅनेटरी जिऑलॉजिस्ट असून, 'नासा'च्या प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी ऑगस्ट 2013 ते डिसेंबर 2016 या काळात काम पाहिलं आहे. स्मिथसॉनियन इन्स्टिट्यूशनच्या नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियमच्या त्या सध्या संचालक असून, त्या पदावरच्या त्या पहिल्या महिला आहेत.

हे देखील वाचा - जो बायडेन यांच्या 'या' निर्णयाचा होणार पाच लाख भारतीयांना फायदा!

मेलरॉय या अमेरिकेच्या हवाई दलातून निवृत्त झालेल्या अधिकारी असून, 'नासा'च्या माजी अंतराळवीरही आहेत. तीन अंतराळ मोहिमांमध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. यूएस डिफेन्स अॅडव्हान्स्ड रिसर्च प्रोजेक्ट्स एजन्सीमधील टॅक्टिकल टेक्नॉलॉजी ऑफिसच्या डेप्युटी डायरेक्टर म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे.

हवामानशास्त्रज्ञ शॅनॉन व्हॅली, तंत्रज्ञान आणि धोरण विश्लेषक भव्या लाल, अॅस्ट्रोफिजिसिस्ट जेदीदाह आयलर या अन्य तीन महिलाही नासाच्या ट्रान्झिशन टीममध्ये आहेत. या महिलाही उच्चविद्याविभूषित आहेत.

असं असलं तरी 'नासा'च्या नव्या प्रमुखाचं नाव जाहीर व्हायला 2021चे काही महिने तरी नक्कीच लागतील. कारण त्यापूर्वी नव्या सरकारच्या प्राधान्यावर कोरोना महामारी, त्यामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था आणि दुही माजलेला देश अशी अनेक आव्हानं आहेत. मागील राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा शपथविधी झाल्यानंतर 'नासा'चे प्रमुख म्हणून ब्रिडेन्स्टाइन यांच्या नावाची घोषणा व्हायला 18 महिने लागले होते.

Published by: Aditya Thube
First published: January 23, 2021, 7:32 AM IST

ताज्या बातम्या