मराठी बातम्या /बातम्या /विदेश /मी नाही तुम्हीच आयुष्यभर करा माझं पालनपोषण! 41 वर्षाच्या इसमाने पालंकावरच भरला खटला

मी नाही तुम्हीच आयुष्यभर करा माझं पालनपोषण! 41 वर्षाच्या इसमाने पालंकावरच भरला खटला

unemployed son

unemployed son

फैझ सिद्दिकी हा लंडनमधील हाईड पार्क (Hyde Park) या उच्चभ्रू भागात एका अलिशान फ्लॅटमध्ये राहतो, जो त्याच्या आई-वडिलांच्या मालकीचा आहे. त्यासाठी तो त्यांना काहीही भाडं देत नाही, उलट आई-वडील दर महिन्याला त्याला 400 युरो म्हणजे साधारण 40 हजार 548 रुपये देतात.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 12 मार्च: भारतात (India) आई-वडील अगदी मुलं शिकून-सावरून नोकरी-धंद्याला लागेपर्यंत त्यांचं पालनपोषण करतात. अनेकदा व्यसनी मुलं असतील, तर जन्मभर आई-वडील त्याची जबाबदारी घेत असल्याचं पाहिलं गेलं आहे. तसंच वृद्धापकाळी आई-वडिलांची देखभाल करणं ही मुलांची जबाबदारी मानली जाते. आई-वडिलांची संपत्ती ही मुलांचीच असं गृहीत धरलं जातं. अनेकदा मुलं आई-वडिलांकडून सगळा पैसा काढून घेतात आणि त्यांनाच घराबाहेर काढतात किंवा उपजीविकेचं कोणतंही साधन नसलेल्या आई-वडिलांच्या पालनपोषणाची जबाबदारी झटकून टाकत असल्याच्या अनेक घटना पाहायला मिळतात.

अलीकडच्या काळात मात्र चित्र थोडं बदल्याचं दिसतं. वृद्ध आई-वडीलांना सांभाळण्याची जबाबदारी टाळणाऱ्या मुलांविरुद्ध पालक कायदेशीर दाद मागताना दिसतात, पण याचं  प्रमाण अगदीच अल्प आहे. परदेशात मात्र पूर्वापार याच्या अगदी उलट संस्कृती असल्याचं दिसतं. विशेषतः अमेरिका, युरोप आदी देशांमध्ये वयाच्या 16 ते 18 वर्षानंतर मुलं स्वतंत्र असतात. त्यांची जबाबदारी आई-वडिलांची नसते. आता लंडनमध्ये (London) एका 41 वर्षांच्या व्यक्तीने (Son) आयुष्यभर आपल्या पालनपोषणाची जबाबदारी आई-वडीलांची (Parents) आहे, त्यासाठी त्यांनी पैसे द्यावे म्हणून त्यांच्याविरुद्ध खटला भरला आहे. इथं अशाप्रकारचा हा पहिलाच खटला असल्यानं खळबळ माजली आहे.

ऑक्सफर्डमधून (Oxford) शिक्षण घेतलेल्या पेशानं वकील (Lawyer) असलेल्या मुलानं आपल्या पालकांनी आयुष्यभरासाठी आपल्याला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करत त्यांना न्यायालयात खेचलं आहे. फैझ सिद्दिकी (Faiz Siddiqui) असं त्याचं नाव असून, त्याची आई- रक्षंदा (69)  आणि वडील जावेद (71) सध्या दुबईत वास्तव्यास आहेत. फैझ सिद्दिकी हा लंडनमधील हाईड पार्क (Hyde Park) या उच्चभ्रू भागात एका अलिशान फ्लॅटमध्ये राहतो, जो त्याच्या आई-वडिलांच्या मालकीचा आहे. त्यासाठी तो त्यांना काहीही भाडं देत नाही, उलट आई-वडील दर महिन्याला त्याला 400 युरो म्हणजे साधारण 40 हजार 548 रुपये देतात.

फैझ सिद्दिकी यानं आतापर्यंत अनेक वकिली कंपन्यांमध्ये (Law Firms) काम केलं आहे. पण सध्या तो बेरोजगार आहे. आपले आई-वडील श्रीमंत असून, आजारपणामुळे अतिशय वाईट पद्धतीनं त्याचं पालनपोषण झालं आहे, त्यामुळे आई-वडिलांनी जन्मभर त्याला पोसणं ही त्यांची जबाबदारी आहे, असा दावा त्यानं केला आहे. आई-वडिलांनी आपल्याला योग्य भरपाई दिली नाही, तर ते मानवाधिकाराचं (Human Rights) उल्लंघन होईल, असंही त्यानं म्हटलं आहे.

(वाचा  - 'या' देशात कोविड-19 व्हायरस पासपोर्ट लाँच; ही सुविधा देणारा ठरला पहिलाच देश)

फैझ सिद्दिकीनं या आधी चक्क ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीवरच (Oxford University) दावा ठोकला होता आणि दहा लाख युरोच्या नुकसान भरपाईची मागणी केली होती. या संस्थेत अतिशय रटाळ पद्धतीनं शिकवलं जातं, शिकवण्याची पध्दत वाईट आणि अपुरी आहे. इन्सोमेनिया (Insomnia) आणि नैराश्य (Depression) असताना देखील त्याला त्याच्या शिक्षकांनी परीक्षा देण्यास भाग पाडलं. त्यामुळे त्याच्या बेरोजगारीला (Unemployment) ही संस्था जबाबदार असून, संस्थेनं नुकसान भरपाई द्यावी असा दवा त्यानं तीन वर्षांपूर्वी केला होता. त्याची मानसिक अवस्था त्या काळात बिघडलेली होती याचे कोणतेही पुरावे नसल्यानं न्यायालयानं त्याचा हा दावा फेटाळून लावला होता.

अशा या सतत मागणी करणाऱ्या, चंचल वृत्तीच्या मुलाच्या वागण्याला त्याचे आई-वडीलही कंटाळले असून, त्याला देण्यात येणारी आर्थिक मदत बंद करण्याचा ते विचार करत आहेत. गेल्या वर्षी फॅमिली कोर्टात त्याचा दावा फेटाळला गेला होता, आता कोर्ट ऑफ अपीलमध्ये त्यावर सुनावणी होणार आहे.

(वाचा - 3 पैकी 1 महिला शारीरिक-लैंगिक अत्याचाराची बळी, WHO चा धक्कादायक अहवाल)

द सन वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार, अशाप्रकारचा हा पहिलाच खटला असल्यानं तो अतिशय महत्त्वाचा आहे. ब्रिटनमधील पालकांच्या हक्कांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. लहान मुलांच्या पालनपोषणा संदर्भात इथं अनेक कायदे आहेत, ज्यामध्ये मुलांना पालकांनी कसं वागवावं याबद्दल कठोर नियम आहेत. मात्र मोठ्या वयाच्या मुलांबाबत अशी कोणतीही कायदेशीर तरतूद नाही.

First published:
top videos

    Tags: Law, London, Oxford, Uk