जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / 3 पैकी 1 महिला शारीरिक-लैंगिक अत्याचाराची बळी, WHO चा धक्कादायक अहवाल; देशांना केलं असं आवाहन

3 पैकी 1 महिला शारीरिक-लैंगिक अत्याचाराची बळी, WHO चा धक्कादायक अहवाल; देशांना केलं असं आवाहन

3 पैकी 1 महिला शारीरिक-लैंगिक अत्याचाराची बळी, WHO चा धक्कादायक अहवाल; देशांना केलं असं आवाहन

जगभरातील जवळपास तीनपैकी एक महिला आयुष्यात एकदा तरी शारीरिक (Physical) किंवा लैंगिक हिंसाचाराला (Sex Abuse) बळी पडलेली असते, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 11 मार्च: जगभरातील जवळपास तीनपैकी एक महिला आयुष्यात एकदा तरी शारीरिक (Physical) किंवा लैंगिक हिंसाचाराला (Sex Abuse) बळी पडलेली असते, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. सध्याच्या कोरोना साथीच्या काळात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढलेली दिसत आहे, असं मत WHO ने व्यक्त केलं आहे. हिंसाचार रोखण्यासाठी, पीडितांना मिळणाऱ्या सेवा सुधारण्यासाठी आणि आर्थिक विषमतेमुळं सांभाळाव्या लागणाऱ्या अपमानास्पद नात्यातील तडजोडीतून महिलांची सुटका करण्यासाठी सर्व देशांच्या सरकारांनी प्रयत्न करावेत असं आवाहन या संघटनेनं केलं आहे. मुलांना नात्यातील परस्पर आदर (Respect In Relationship) आणि लैंगिक संबंधात परस्पर संमतीविषयी शाळेत शिकवलं पाहिजे, असंही जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक Tedros Adhanom Ghebreyesus म्हणाले की, ‘प्रत्येक देशात आणि संस्कृतीत महिलांवरील हिंसाचाराची पाळमुळं असून, त्यामुळं कोट्यवधी महिला आणि त्यांच्या कुटुंबाचं नुकसान झालं आहे. कोविड 19 साथीच्या (Covid 19 Pandemic) काळात तर ही स्थिती अधिक गंभीर झाली आहे.’ जगभरातील 15 ते 49 वर्षे वयोगटातील जवळपास 31 टक्के म्हणजे 852 दशलक्ष महिलांना शारीरिक किंवा लैंगिक अत्याचाराला बळी पडावं लागलं आहे. असा धक्कादायक निष्कर्षही जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) नोंदवला आहे. 2000 ते 2018 अशा प्रदीर्घ कालावधीतील राष्ट्रीय डेटा आणि सर्वेक्षणावर आधारीत सर्वांत मोठ्या अभ्यासातून या संघटनेनं हे निष्कर्ष नोंदवले आहेत. (हे वाचा- 7th Pay Commission: खुशखबर! एक एप्रिलपासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढ ) गरीब देशांमध्ये अशा अत्याचारांना बळी पडलेल्या महिलांची संख्या मोठी असून, त्यांचे पती (Husband) किंवा अत्यंत जवळची व्यक्तीच (Intimate Partner) यात सहभागी असतात. मात्र अशा अत्याचारांविरुद्ध तक्रार करण्याचे प्रमाण खूपच कमी असल्यानं प्रत्यक्ष झालेले गुन्हे आणि नोंदवण्यात आलेल्या तक्रारी यात प्रचंड तफावत आहे, असंही आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटलं आहे. ‘ही आकडेवारी अत्यंत धक्कादायक असून, हिंसाचार रोखण्यासाठी प्रत्येक देशाच्या शासनानं अधिक प्रयत्न करणं अत्यावश्यक आहे,’ असं या अहवालाच्या लेखिका क्लॉडिया गार्सिया-मोरेनो (Claudia Garcia Moreno) यांनी म्हटलं आहे. ओशिनिया, सब-सहारा आफ्रिका आणि दक्षिण आशियाचा हवाला देत, काही क्षेत्रांमध्ये अर्ध्याहून अधिक स्त्रियांना हिंसाचाराचा सामना करावा लागत असल्याचंही क्लॉडिया यांनी स्पष्ट केलं आहे. महिलांवरील अत्याचारांचं सर्वाधिक प्रमाण किरीबाती, फिजी, पापुआ न्यू गिनी, बांगलादेश, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये असल्याचं तर सर्वांत कमी दर युरोपमध्ये 23 टक्के इतका असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या डेटावरून (WHO data) स्पष्ट झालं असून, महिलांवरील अत्याचाराची सुरुवात खूपच लहान वयात होते, असंही आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. (हे वाचा- बाईकपेक्षाही कमी खर्चात चालवा या Top 4 Car, जाणून घ्या या जबरदस्त गाड्यांबद्दल ) ‘15 ते 19 वर्ष वयोगटातील किशोरवयीन चार मुलींपैकी एकीला शारीरिक किंवा लैंगिक हिंसाचाराला बळी पडावं लागतं. ही मुलींच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाची आणि शारीरिक जडणघडणीची वेळ असते. या वयात त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचे परिणाम आयुष्यभरासाठी होऊ शकतात. त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर याचा मोठा परिणाम होतो. यातून नको असलेलं मातृत्व आणि इतर गुंतागुंतही होऊ शकते’, असंही गार्सिया-मोरेनो यांनी नमूद केलं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात