• Home
  • »
  • News
  • »
  • videsh
  • »
  • वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाही घेणार मोठा निर्णय! भारतातून येणाऱ्या विमानांवर बंदीचा विचार

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाही घेणार मोठा निर्णय! भारतातून येणाऱ्या विमानांवर बंदीचा विचार

ऑस्ट्रेलियाही भारतातल्या विमानांना (Indian Flights) येण्यास बंदी घालण्याचा विचार करत आहे. देशात पसरत असलेल्या विषाणूचा व्हेरियंट अधिक संसर्गजन्य आहे. त्यामुळे असा विषाणू आपल्या देशात येऊ नये, यासाठीचा प्रयत्न म्हणून ऑस्ट्रेलियाकडून हे पाऊल उचललं जाण्याची शक्यता आहे.

  • Share this:
सिडनी, 27 एप्रिल: ब्रिटन, न्यूझीलंड, हाँगकाँग यांसारख्या काही देशांनंतर आता ऑस्ट्रेलियाही भारतातल्या विमानांना (Indian Flights) येण्यास बंदी घालण्याचा विचार करत आहे. मंगळवारी (27 एप्रिल) त्याबाबतचा अंतिम निर्णय अपेक्षित आहे. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने रौद्र रूप (Corona Second Wave) धारण केलं असून, देशात पसरत असलेल्या विषाणूचा व्हेरियंट अधिक संसर्गजन्य आहे. त्यामुळे असा विषाणू आपल्या देशात येऊ नये, यासाठीचा प्रयत्न म्हणून ऑस्ट्रेलियाकडून हे पाऊल उचललं जाण्याची शक्यता आहे. 'एनडीटीव्ही'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या (Australia) हॉटेल क्वारंटाईन यंत्रणेमध्ये (Hotel Quarantine System) भारतातला सध्याचा अधिक संसर्गक्षम कोरोना विषाणू येऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी क्वीन्सलँड (Queensland) राज्यानं ऑस्ट्रेलियाच्या केंद्र सरकारला भारतीय विमानांना प्रवेश नाकारण्याची विनंती केली आहे. 'गेल्या आठवड्यात मी तशी मागणी करणारं पत्र पंतप्रधानांना लिहिलं आहे. त्यावर आज निर्णय घेतला जाणार आहे, असं समजतं,' असं क्वीन्सलँडच्या प्रीमिअर अॅन्नास्टासिया पलस्झझुक (Premier Annastacia Palaszczuk) यांनी ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनला सांगितलं. ऑस्ट्रेलियातल्या माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार, ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक मंगळवारी (27एप्रिल) होणार असून, भारतीय विमानांना ऑस्ट्रेलियात प्रवेश नाकारण्याबरोबरच भारताला वैद्यकीय मदत पुरवण्याच्यादृष्टीनेही काही बाबींवर त्या बैठकीत चर्चा होणार आहे. या वृत्तावर पंतप्रधान कार्यालयाकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही.

(वाचा - सर्वांनाच कोरोनाबाधित मानण्याचा सल्ला देतात अमेरिकेतील तज्ज्ञ; काय आहे कारण?)

कोरोना संसर्ग पसरू नये म्हणून भारत आणि रेड-झोनमधल्या अन्य देशांतून ऑस्ट्रेलियात परतणाऱ्या नागरिकांच्या संख्येवर निर्बंध घालण्यात येणार असल्याचं ऑस्ट्रेलियाने गेल्या आठवड्यात जाहीर केलं होतं. ऑस्ट्रेलियाने नागरिकत्व नसलेल्यांसाठी मार्च महिन्यातच आपल्या सीमा बंद केल्या आहेत. तसंच, परतणाऱ्या सर्वांना स्वतःच्या खर्चाने दोन आठवडे हॉटेलमध्ये क्वारंटाईन राहणं बंधनकारक करण्यात आलं आहे. क्वारंटाईन यंत्रणेमुळे ऑस्ट्रेलियाला कोरोनाबाधितांची संख्या कमी राखण्यात यश आलं आहे. तिथल्या कोरोनाबाधितांची संख्या सुमारे 29,700 असून, 910 जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी (26एप्रिल) भारतात 3,52,000 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. एकाच दिवसात एवढ्या रुग्णांची नोंद होण्याचा हा जागतिक विक्रम असून, सलग पाचव्यादिवशी दररोजच्या आकड्याने तीन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या 24तासांत 2800 हून अधिक भारतीयांचा मृत्यू झाला आहे. या संख्येचाही हा उच्चांक आहे.

(वाचा - जग कोरोनाने हादरलं! आता अन्य विषाणूजन्य आजारांवरही पुन्हा संशोधन सुरू)

ब्रिटन, जर्मनी, अमेरिका आदी देशांनी कोरोनाग्रस्त भारताला वैद्यकीय मदत पुरवण्याची ग्वाही दिली आहे. या पार्श्वभूमीवर, भारताने सैन्य दलालाही या कठीण प्रसंगात मदतीसाठी उभं राहण्यास सांगितलं आहे.
First published: