ढाका, 09 ऑगस्ट: गेल्या आठवड्यात पाकिस्तानातील (Pakistan) भोंग शहरातील एका गणपती मंदिरावर काही समाजकंठकांनी हल्ला (Attack on hindu temple) केला होता. जवळपास 150 हून अधिक जणांच्या जमावानं या मंदिरावर हल्ला करत मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती. हे प्रकरण ताजं असताना आता बांगलादेशातही (Bangladesh) कंट्टरपंथीयांची मुजोरी समोर आली आहे. बांगलादेशातील खुलना (Khulana District) जिल्ह्यातील अल्पसंख्याक हिंदूंच्या घरावर आणि मंदिरावर हल्ला करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जमावानं मंदिरांमध्ये बसवलेल्या मूर्तींची तोडफोड केली आहे. यासोबतच हिंदू लोकांच्या घरांवरही हल्ले केले आहेत. खुलना जिल्ह्यातील शियाली, मल्लिकपुरा आणि गोवर गावांमध्ये शेकडोच्या संख्येनं आलेल्या जमावानं परिसरातील सहा मंदिरांवर हल्ला केल्याचं सांगण्यात आलं आहे. एवढेच नाही तर कट्टरपंथीयांनी मंदिरांच्या मूर्तींचंही बरंच नुकसान केलं आहे. हल्लेखारांनी संबंधित गावातील 57 हून अधिक हिंदू कुटुंबांना टार्गेट केलं आहे. तसेच शियाली गावातील हिंदू समाजाच्या 6 दुकानांचीही तोडफोड केली आहे. हेही वाचा- खुलेआम AK-47 रायफल घेऊन फिरत होती महिला; Video समोर आल्यानंतर पोलीस अलर्ट हल्ल्यामागचं नेमकं कारण काय? शुक्रवारी, रात्री नऊच्या सुमारास महिला भाविकांच्या एका समूहानं पूर्वा पारा मंदिरापासून शियाली स्मशानभूमीपर्यंत एक मिरवणूक काढली होती. दरम्यान वाटेतील एका मशीदीपासून मिरवणूक जात असताना, मशिदीच्या इमामनं मिरवणुकीला विरोध केला. यामुळे हिंदू भक्त आणि इस्लामिक मौलवींमध्ये जोरदार वादावादी झाली. यातूनच हा हल्ला झाल्याचं सांगितलं जात आहे. पण वृत्तसंस्था IANS नुसार, एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, ही घटना शनिवारी दुपारी घडली, त्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला. त्यामुळे अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आलं होतं. हेही वाचा- अफगाणी सैन्याची मोठी कारवाई, 24 तासांत 300 तालिबानींचा खात्मा शनिवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास शंभर हल्लेखोर गावात पोहोचले होते. हिंसाचारादरम्यान त्यांनी मंदिरांची नासधूस केली तसेच घरांची तोडफोडही केली. त्याचबरोबर शियाली गावात हिंदू समाजाच्या सहा दुकानांची तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेत आतापर्यंत 30 लोकं जखमी झाल्याची माहिती समोर आली असून सर्व जखमी लोकांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी 10 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिली आहे. हेही वाचा- Pakistan: मंदिराची तोडफोड करणारे 50 समाजकंठक जेरबंद; 150हून अधिकांवर गुन्हा दाखल नमाजादरम्यान हिंदू गात होते? दुसरीकडे असाही दावा केला जात आहे की, शुक्रवारी सायंकाळी मुस्लीम समाज मशिदीत नमाज पठन करताना हिंदू समुदायानं गाणं म्हणायला सुरुवात केली होती. यामुळे दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. पण हा प्रकार गैरसमज झाल्यामुळे घडल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. IANS वृत्तसंस्थेच्या मते, संबंधित प्रकरण त्याच दिवशी शांत करण्यात आलं होतं. शनिवारी झालेल्या हल्ल्याचा या घटनेशी काहीही संबंध नाही. संबंधित गांवात आता शांतता प्रस्थापित करण्यात आल्याची माहिती खुलना जिल्ह्याचे एसपी महबूब हसन यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.