नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : जवळपास गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोनानं दहशत निर्माण केली आहे. कोरोना महामारीमुळं कोट्यवधी लोकांना आपला जीव गमवावा लागला. अथक प्रयत्नांनंतर लस निर्मीती करण्यात संशोधकांना यश आलं असून मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू आहे. रुग्णसंख्या काहीशी घटली आहे. तरी देखील कोरोनाचं संकट पूर्णपणे टळलेलं नाही. अशातच आता आणखी एक मोठं संकट येण्याची शक्यता आहे. ‘ब्युबोनिक प्लेग’ (Bubonic Plague) असं या संकटाचं नाव आहे. जर वाढतं ग्लोबल वॉर्मिंग कमी झालं नाही तर येत्या काळात जगभरात ब्युबोनिक प्लेगचा धोका वाढेल, असा इशारा प्रसिद्ध रशियन डॉक्टर अॅना पोपोवा यांनी दिला आहे. तापमान वाढीमुळं ब्युबोनिकचा प्रसार सतत होणारी जागतिक तापमान वाढ लक्षात घेता ब्युबोनिक प्लेग हा आजार परत येण्याची शक्यता जास्त आहे. कोरोनाचा प्रसार सुरू असताना चीन, मंगोलिया आणि रशियाच्या काही भागांमध्ये या ब्युबोनिक प्लेगचे काही रुग्ण आढळले होते. मात्र, त्यावर वेळीच नियंत्रित मिळवण्यात आलं. सायबेरियाच्या सीमेला लागून असलेल्या तुवा आणि अल्ताई येथील हजारो लोकांना ब्युबोनिक प्लेगपासून वाचवण्यासाठी लसीकरण करण्यात आलं. अल्ताईमध्ये साधारण 60 ब्युबोनिकचे रुग्ण आढळले होते. याशिवाय गेल्या काही वर्षांत रशिया, चीन आणि अमेरिकेत या रोगाचे काही रुग्ण आढळले आहेत. तापमान वाढीमुळं ब्युबोनिकचा प्रसार करणाऱ्या माशांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याच लक्षात आलं आहे, अशी माहिती डॉ. अॅना यांनी दिली. आफ्रिकेत या रोगाच सर्वात भयानक रूप दिसेल, अशी शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे. आज तक नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. वाचा : Covid लस न देताच CoWin App वर नोंदणी, मालेगावातील 10 शिक्षक निलंबित ब्युबोनिक प्लेगची लागण कशामुळे? ‘यर्सिनिया पेस्टिस बॅक्टेरियम’ (Yersinia Pestis Bacterium) या जीवाणूमुळे ब्युबोनिक प्लेगची लागण होते. सर्वात अगोदर ब्युबोनिक प्लेगची लागण जंगली उंदरांना होते. उंदरांच्या मृत्यूनंतर यर्सिनिया पेस्टिस बॅक्टेरियम हे जीवाणू पिसवा चावल्याने मानवी शरीरात प्रवेश करतात. यानंतरच व्यक्तीला प्लेगचा संसर्ग होऊ लागतो. हे जीवाणू शरीरातील लिम्फ नोड्स, रक्त आणि फुफ्फुसांवर हल्ला करतात. यामुळं व्यक्तीची बोटं आणि नाक काळं पडून हळूहळू कुजण्यास सुरुवात होते. ब्युबोनिक प्लेगला गाठीचा प्लेग असंही म्हणतात. कारण, लागण झाल्यानंतर रुग्णाच्या अंगावर गाठी तयार होतात आणि 14 दिवसांत त्या पक्व होतात. या प्लेगमुळे शरीरात असह्य वेदना होतात. अतिजास्त ताप येतो आणि पल्स रेट देखील मोठ्या प्रमाणात वाढतो. ब्लॅक डेथ ब्युबोनिक प्लेग हा एकदम नवीन रोग नाही. या प्राणघातक रोगानं यापूर्वी देखील तीन वेळा आपलं भयानक रूप जगाला दाखवलेलं आहे. या प्लेगमुळं जगभरातील कोट्यवधी लोकांचा जीव गेलेला आहे. 6 व्या आणि 8 व्या शतकात ब्युबोनिक प्लेगला जस्टिनियन प्लेग (Plague Of Justinian) असं नाव देण्यात आलं. या आजाराने त्या वेळी जगभरात सुमारे 2.5 ते 5 कोटी लोकांचा बळी घेतला होता. 1347 मध्ये या रोगानं पुन्हा डोकं वर काढलं आणि युरोपातील एक तृतीयांश लोकसंख्येचा नाश केला. त्यावेळी त्याला ‘ब्लॅक डेथ’ (Black Death) म्हटल गेलं. त्यानंतर 1894 च्या आसपास ब्युबोनिक प्लेगची तिसरी लाट आली होती. त्यावेळी जगभरातील 80 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. त्याचा सर्वाधिक प्रभाव हाँगकाँगमध्ये दिसला होता. वाचा : दोन डोस घेतलेल्या या ज्येष्ठ नागरिकांनी लशीचा तिसरा डोसही घ्यावा; WHO ने दिला सल्ला भारतात ब्युबोनिक प्लेग 1994 मध्ये भारतातील पाच राज्यांमध्ये ब्युबोनिक प्लेगची 700 रुग्ण आढळले होते. त्यापैकी 52 लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापूर्वी 1970 ते 1980 च्या काळात चीन, रशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि दक्षिण अमेरिका खंडातील देशांमध्ये देखील हा रोग आढळला. 2010 ते 2015 या पाच वर्षांच्या काळात जगभरात ब्युबोनिक प्लेगच्या सुमारे 3 हजार 248 रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी 584 लोकांचा मृत्यू झाला. यातील बहुतेक रुग्ण डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो, मादागास्कर, पेरू याठिकाणचे होते. जीवाणूची लागण कशी झाली? यर्सिनिया पेस्टिस बॅक्टेरियमची वंशवेल सात हजार वर्षे जुनी असल्याचं सांगितले जाते. काही संशोधकांच्या मते हा कालावधी पाच हजार वर्षांचा आहे. काही दिवसांपूर्वी शास्त्रज्ञांना पूर्वी रशियाचाचं एक भाग असलेल्या लॅटव्हियातील रिनुकलन्स परिसरात एका शिकाऱ्याची कवटी सापडली. त्याला RV2039 हे नाव देण्यात आलं. या कवटीमध्ये मोठ्या प्रमाणात यर्सिनिया पेस्टिसचा अंश सापडले. हा जिवाणू यर्सिनिया स्युडोट्युबरक्युलॉसिस (Yersinia pseudotuberculosis) या जीवाणूचा वंशज असल्याचं निष्पन्न झालं. मात्र, शिकाऱ्याला या जीवाणूची लागण कशी झाली हे शोधण्यात यश आलं नाही. यर्सिनिया पेस्टिस आपल्या पूर्वजांपेक्षा जास्त धोकादायक आहे. माशांच्या माध्यमातून उंदरांकडून मानवापर्यंत पोहचला होता. उंदीर मानवाला चावण्याचं प्रमाण कमी असल्यानं 5 हजार वर्षांपूर्वी त्याचा फारसा प्रसार झाला नाही. वाचा : कोरोना लशीचा ब्लू प्रिंट चोरण्यासाठी या देशाने पाठवला होता गुप्तहेर; खुलाशानंतर उडाली खळबळ इतिहासकारांच्या अंदाजानुसार, प्लेग आणि इतर घातक संसर्गजन्य रोगांच्या प्रसाराची सुरुवात ब्लक सी च्या (Black Sea) आसपास असलेल्या प्राचीन शहरांमधून झाली. कारण त्याठिकाणी मानवी वस्त्यांची घनता जास्त होती. शेती आणि पशुपालन देखील मोठ्या प्रमाणात केलं जात होतं. या प्राचीन शहरांमध्ये झूनोटिक या प्राण्याशी संबंधित रोगाचा उगम देखील झाला होता. नंतर हे रोग प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरले होते. यर्सिनिया पेस्टिसच्या (Yersinia Pestis) च्या अभ्यासातून हे स्पष्ट झालं की, त्याचे पूर्वज जीवाणू जास्त संसर्गजन्य आणि प्राणघातक नव्हते. मात्र, निओलिथिक युगात (Neolithic Age) या जीवाणूंमुळे पश्चिम युरोपमधील लोकसंख्येत मोठी घट झाली होती. मात्र, ब्युबोनिक प्लेगचा सध्या अस्तित्वात असलेला जीवाणू आपल्या पूर्वजांपेक्षा जास्त धोकादायक आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळं त्यांच्या वाढीसाठी अनूकुल वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळं त्यांचा प्रसार होण्याची शक्यता डॉक्टर अॅना पोपोवा यांनी वर्तवली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.