नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : कोरोनाने जगभरात हाहाकार माजवल्यानंतर कोरोनाला प्रतिबंध करणारी लस (corona vaccine) कधी येते याकडे संपूर्ण जगाचं लक्ष होतं. जगातल्या विविध औषध कंपन्या लशीच्या संशोधनाच्या कामात रात्रंदिवस गुंतल्या होत्या. कोरोनावरची पहिली लस बनवण्याच्या शर्यतीत अनेक देश होते; मात्र ही शर्यत जिंकण्यासाठी अगदी चोरीच्या मार्गाचाही वापर झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
कोरोनावरच्या ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनेकाच्या (Oxford-Arstrazenka) लशीचा फॉर्म्युला (vaccine formula) चोरण्यासाठी इंग्लंडमध्ये (England) एक गुप्तहेर पाठवल्याचा आरोप रशियावर करण्यात आला आहे. आपल्या देशात कोरोनावरची स्पुटनिक व्ही लस बनवून जगातली पहिली लस बनवण्याची शर्यत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Russian President Vladimir Putin) यांना जिंकायची होती. त्यामुळे रशियाने लशीचा फॉर्म्युला चोरण्यासाठी एका गुप्तहेराचा वापर केला होता, असा दावा 'डेली मेल'च्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. याबाबतचं वृत्त ‘आज तक’ने दिलं आहे.
रिपोर्टमध्ये म्हटलं आहे, की यूकेमध्ये मॉस्कोचा (Moscow) एक गुप्तहेर कोरोना प्रतिबंधक लशीच्या फॉर्म्युलाची ब्लू प्रिंट हस्तगत करण्याच्या प्रयत्नात होता याबाबतचे पुरावे सुरक्षा यंत्रणांकडे आहेत; मात्र गुप्तहेर येथील दिग्गज औषध कंपनीच्या कारखान्यातून किंवा प्रयोगशाळेतून कागदपत्रं चोरत होता की तयार केलेल्या औषधाची बाटली चोरत होता हे स्पष्ट झालेलं नाही.
हे ही वाचा-राज्यात आज 2486 नवीन रुग्ण; अहमदनगर, सोलापूर, पुण्यात रुग्ण वाढल्यानं धास्ती
MI5 हेरांनी आधीच सांगितलं आहे, की ब्रिटिश शास्त्रज्ञांनी लस विकसित करण्याची घोषणा केल्याच्या जवळपास एक महिन्यानंतर रशियन हॅकर्सनी ऑक्सफर्ड विद्यापीठावर मार्च 2020 पासून वारंवार सायबर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनेकाने जाहीर केलं होतं, की ते कोरोनावरच्या पहिल्या लशीच्या मानवी चाचण्या सुरू करत आहेत. पुढच्याच महिन्यात रशियाने सांगितलं, की त्यांनी स्वतःची लस बनवली आहे. ऑगस्टमध्ये व्लादिमीर पुतीन यांनी रशियन नागरिकांना एका टीव्ही मुलाखतीत सांगितलं, की देशाने पहिली लस बनवून जागतिक स्पर्धा जिंकली आहे. या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, त्यानंतरच्या चाचण्यांमध्ये हे उघड झालं, की स्पुटनिक व्ही लस ब्रिटिश लशीप्रमाणेच कार्य करते. दोन्हीही व्हायरल व्हेक्टर प्रकारच्या लशी आहेत. घटनांची टाइमलाइन सांगते, की रशियाने ब्रिटनमधल्या पहिल्या मानवी चाचण्यांदरम्यान त्याची ब्लू प्रिंट तयार केली होती, असा दावाही या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
डेली मेलने द सनच्या हवाल्याने म्हटलं आहे, की रशियासाठी काम करणाऱ्या हेरांनी स्वतःची लस बनवण्यासाठी लशीच्या फॉर्म्युलाची ब्लू प्रिंट बहुराष्ट्रीय फार्मास्युटिकल कंपनीकडून चोरली होती. याबाबतचा पुरावा त्यांच्याकडे असल्याचं सुरक्षा यंत्रणांनी ब्रिटिश मंत्र्यांना सांगितलं होतं.
या प्रकरणावर आपण वक्तव्य करू शकत नाही; पण ते नाकारताही येत नाही, असं यूकेचे मंत्री डेमियन हिंड्स यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले, की परकीय शक्ती सतत व्यावसायिक, संवेदनशील, वैज्ञानिक रहस्यं आणि बौद्धिक संपत्ती चोरण्याचा प्रयत्न करत आहेत, हे मानणं योग्य ठरेल.
रशियाविषयक तज्ज्ञ टोरी खासदार बॉब सीली यांनी सांगितलं, ब्रिटनने रशियन आणि चिनी हेरगिरीबद्दल गंभीर होण्याची गरज आहे. चोरी करणं असो किंवा हुकूमशाही राजवटींद्वारे ब्लॅकमेल करणं असो, आपण त्यांच्याशी हुशारीने वागण्याची गरज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona spread, Corona vaccine