काबुल, 18 नोव्हेंबर: तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर(Afghanistan) कब्जा केल्यानंतर मुलींना शाळेत जाण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र, आता काही महिन्यांनंतर येथील मुली पुन्हा शाळेत जाऊ शकणार आहेत. अफगाणिस्तानच्या घोर प्रांतात मुलींच्या शाळा (School ) उघडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सूचनेअंतर्गत इयत्ता 7 ते 12 वीच्या विद्यार्थिनींना फिरोजकोह येथील त्यांच्या शाळेत जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. अहवालानुसार, फिरोजकोह कौन्सिलने केलेल्या प्रयत्नांमुळे शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. फिरोजकोह कौन्सिलने घोर प्रांताच्या शिक्षण अधिकाऱ्यांना मुलींच्या शाळा पुन्हा सुरू करण्याचे आवाहन केले. फिरोजकोह कौन्सिलचे प्रमुख सुलतान अहमद यांनी यासंदर्भात माहिती दिली. ‘आम्ही एक करार केला आहे की घोरच्या सर्व जिल्ह्यांमध्ये मुलींसाठी हायस्कूल पुन्हा सुरू करण्यात याव्यात.’ असे अहमद यांनी यावेळी सांगितले. तसेच, “मुलींसाठी शाळा पुन्हा सुरू केल्या जातील याचा खूप आनंद होत आहे.” महिला शिक्षणापासून वंचित राहिल्या तर समाजाच्या पुढच्या पिढीचे भवितव्य उज्ज्वल होणार नाही. अशी भावना तालिबान्यांच्या या निर्णयानंतर नागरी हक्क कार्यकर्ते हबीब वाहदत यांनी व्यक्त केली. पश्चिम अफगाणिस्तानातील हेरात आणि घोर प्रांतात मुलींना माध्यमिक शिक्षणासाठी शाळेत जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. 15 ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला, त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये मुलींना शाळेत जाण्यास बंदी घालण्यात आली. एवढेच नाही तर तालिबान रोज वेगवेगळ्या प्रकारचे फर्मान जारी करत असतात. यापूर्वी 10 ऑक्टोबर 2021 रोजी कुंदुझ, बल्ख आणि सार-ए-पुल प्रांतांमध्ये मुलींसाठी शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या होत्या. याबाबत माहिती देताना प्रांत शिक्षण विभागाचे प्रमुख जलील सय्यद खिली म्हणाले की, मुलींच्या शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थिनी शाळेत येऊ लागल्या आहेत. सध्या अफगाणिस्तान गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यामुळेच अफगाणिस्तानने आदल्या दिवशी अमेरिकेला जप्त केलेली सर्व बँक संपत्ती सोडण्याची विनंती केली होती. एवढेच नाही तर येथे उपासमारीची समस्याही वाढत आहे. या देशाला मदत करण्यासाठी यूएन ने खूप योगदान दिले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.