नवी दिल्ली, 29 ऑगस्ट : इंटरनेट (Internet) आणि सोशल मीडियाचा (Social Media) वापर वाढत असताना, दुसरीकडे सायबर क्राईम (Cyber Crime), ऑनलाईन फ्रॉडच्या (Online Fraud) घटनांमध्येही मोठी वाढ होत आहे. इंटरनेट, सोशल मीडियामुळे जीवन सुकर होत आहे. तर सायबर क्रिमिनल्स याच गोष्टीचा फायदा घेत युजर्सची फसवणूक करत आहेत. फेसबुक, इन्स्टाग्रामसह आता व्हॉट्सअॅपवरही (WhatsApp Fraud) सायबर क्राईमची प्रकरणं समोर आली आहेत. असाच एक सायबर फ्रॉड, वेरिफिकेशन कोड स्कॅम (WhatsApp Verification Code scam) नावाने युजर्सचं अकाउंट हॅक करत आहे.
वेरिफिकेशन कोड स्कॅम -
फ्रॉड करणारे सायबर क्रिमिनल्स WhatsApp Verification Code द्वारे लोकांचं अकाउंट हॅक करतात. हा फ्रॉड करण्यासाठी कुटुंबियांच्या किंवा मित्रांच्या नावे युजरची फसवणूक केली जाते. WhatsApp वर एका मेसेजद्वारे 6 अंकी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन कोड पाठवला जातो. या कोडद्वारे व्हॉट्सअॅपवर लॉगइन करता येतं, असं मेसेजमध्ये सांगितलं जातं. तसंच हा कोड कोणासोबतही शेअर न करण्याचंही मेसेजमध्ये सांगण्यात येतं.
त्यानंतर थोड्या वेळात युजरला आपल्या मित्र किंवा कुटुंबियांच्या नंबरवरुन मेसेज येतो, की त्यांनी त्यांच्या अकाउंटचा 6 अंकी वेरिफिकेशन कोड चुकून तुम्हाला पाठवला आहे. तो कोड पुन्हा सेंड करण्याचं युजरला सांगितलं जातं. पण इथे हॅकरचं तुमचा मित्र किंवा कुटुंबिय बनून मेसेज करत असतो. हा स्कॅमचा एक भागच असतो. हा कोड दिल्यानंतर व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक केलं जातं.
तुम्हालाही असा मेसेज आला, तर सावध व्हा. व्हॉट्सअॅप कधीही एका व्यक्तीचा वेरिफिकेशन कोड, त्या व्यक्तीशिवाय इतर कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीच्या नंबरवर पाठवत नाही. अशाप्रकारे वेरिफिकेशन कोडबाबत कोणताही मेसेज आल्यास, हा हॅकिंगचा प्रकार असू शकतो.
WhatsApp Verification Code च्या नावाने तुमच्या मित्राच्या किंवा कुटुंबियांच्या नावाने कोणताही मेसेज आल्यास, त्या नंबरला लगेच ब्लॉक करा. हा नंबर तुम्हाला तुमच्या मित्राचा किंवा ओळखीतील व्यक्तीचा असल्याचं वाटू शकतं. परंतु हा हॅकिंगचा प्रकार ठरू शकतो. त्यामुळे तो नंबर ब्लॉक करुन लगेच रिपोर्ट करणं गरजेचं ठरतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tech news, Whatsapp alert, WhatsApp chats, WhatsApp user