मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /काय आहे Digital Detox? तुमच्या आयुष्यावर असा होतो परिणाम, या गोष्टी लक्षात ठेवाच

काय आहे Digital Detox? तुमच्या आयुष्यावर असा होतो परिणाम, या गोष्टी लक्षात ठेवाच

फोन जास्त वेळ वापरल्याने शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवतो. डिजिटल डिटॉक्स (Digital Detox) किंवा फोनचा वापर कमी करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.

फोन जास्त वेळ वापरल्याने शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवतो. डिजिटल डिटॉक्स (Digital Detox) किंवा फोनचा वापर कमी करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.

फोन जास्त वेळ वापरल्याने शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवतो. डिजिटल डिटॉक्स (Digital Detox) किंवा फोनचा वापर कमी करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.

    नवी दिल्ली, 2 मे : कोरोना महामारी (Corona Pandemic) आल्यापासून वर्क फ्रॉम होम (Work From Home) ही संकल्पना मोठ्या प्रमाणात लागू झाली. या महामारीनंतर आपण जास्त प्रमाणात डिजिटल झालो आहोत, त्यामुळे इंटरनेट, लॅपटॉप आणि फोनवरील अवलंबित्व वाढलंय. फोनशिवाय वेळच जात नाही. अगदी घरचं वीजेचं बिल भरण्यापासून ते शॉपिंग (Shopping) आणि इतर बरीच कामं फोनवरून केली जातात. तसंच गेल्या काही काळापासून वाढलेल्या शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप्सचा ट्रेंड (Short Video Apps) लोकांना सोशल मीडियावर सवय लावत आहे. परिणामी, लोक तासन् तास शॉर्ट व्हिडिओ पाहत बसलेले असतात. फोन जास्त वेळ वापरल्याने शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवतो, शिवाय फोनवर जास्त वेळ घालवणं आरोग्यासाठी चांगलं नाही.

    रिपोर्ट्सनुसार, फोनमधून निघणाऱ्या ब्लू लाईटमुळे आपल्या मेंदूला रात्रीही दिवस असल्याचा भास होतो. स्मार्टफोन आणि सोशल मीडिया अ‍ॅप्सवरील काही अभ्यासांतून असं दिसून आलंय की, तंत्रज्ञान कंपन्या बिहेवियर सायकोलॉजीवर काम करतात. ज्यामुळे लोकांना स्मार्टफोन आणि अ‍ॅप्स अधिक वापरण्यास भाग पाडलं जाऊ शकतं. बऱ्याच जणांना फोनची इतकी सवय असते की ते पाच मिनिटंही फोन लांब ठेवत नाहीत. पण सोशल मीडिया आणि स्मार्टफोनची (Smartphone) वाढती सवय तुम्ही ठरवल्यास कमी करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या घरात ‘नो फोन’ हा नियम लागू करावा लागेल. तसंच डिजिटल डिटॉक्स (Digital Detox) किंवा फोनचा वापर कमी करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. काय आहे नो-फोन नियम आणि डिजिटल डिटॉक्स, ज्यामुळे स्मार्टफोन वापरण्याची सवय कमी होऊ शकते, ते जाणून घेऊया. याबाबत आज तकनं वृत्त दिलं आहे.

    नो-फोन नियम -

    खरं तर असा कोणताही नियम कुठेही नाही. पण स्मार्टफोनचा वापर कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरात हा नियम लागू करावा लागेल. एका ठराविक वेळेत कोणीही फोन वापरणार नाही, असा नियम तुम्ही करू शकता. उदाहरण म्हणून रात्री जेवताना कोणीही फोन वापरणार नाही किंवा घरात सायंकाळी 7 ते 8 या वेळेत कोणीही फोन वापरणार नाही, असे नियम तुम्ही ठरवू शकता.

    नोटिफिकेशन बंद करा -

    आपल्या फोनमधील नोटिफिकेशन (Notification) पर्याय ऑन असतो. त्यामुळे फोनवर वारंवार येणारी नोटिफिकेशन्स आपलं लक्ष वेधून घेतात. फोनच्या नोटिफिकेशनची टोन वाजली की आपण लगेच फोन बघतो. जवळपास प्रत्येक नोटिफिकेशननंतर आपण फोन चेक करत असतो. त्यामुळे फोनची सवय लागते. तुम्हाला स्मार्टफोनपासून दूर राहायचं असेल, तर सर्वांत आधी नोटिफिकेशन बंद करा. नोटिफिकेशन बंद असतील, तर तुम्हाला मेसेज आलेले कळणार नाही आणि तुम्ही फोन वारंवार बघणार नाही.

    स्क्रीन टाइम कमी करा -

    फोनची सवय कमी करण्यासाठी स्क्रीन टाइम (Screen Time) कमी करणं सर्वांत महत्त्वाचं आहे. स्मार्टफोन कंपन्या सोशल वेलबीइंगसारखी फीचर्सही देतात, त्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर सर्वाधिक वेळ कोणत्या अ‍ॅप्सवर घालवता याची माहिती मिळते. तुम्ही सर्वाधिक वापरत असलेल्या अ‍ॅप्सची लिस्ट पाहून कोणते अ‍ॅप कमी वेळ वापरायचे, हे ठरवून स्क्रीन टाइम कमी करू शकता.

    हे वाचा - विकणार आहात तुमचा Smartphone?,मग करा आधी 'हे' काम; नाहीतर मोजावी लागेल मोठी किंमत

    फोन स्विच ऑफ करा किंवा फ्लाइट मोडवर ठेवा -

    जेव्हा तुम्ही फोन वापरत नसाल किंवा कुटुंबासोबत वेळ घालवत असाल तेव्हा फोन बंद किंवा फ्लाइट मोडवर ठेवा. तुमचा फोन बंद असेल, त्यामुळे तुमचं लक्ष सतत फोनवर राहणार नाही. फोन बंद करून ठेवणं हे अवघड काम आहे, त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला थोडा त्रास होईल. मात्र एक ठराविक वेळ फोन बंद ठेवून तुम्ही रोज थोडा वेळ वाढवत स्वतःला फोनपासून दूर ठेवण्याची सवय लावू शकता.

    ऑडिओ अ‍ॅप्स वापरा -

    अनेकांना गाणी ऐकण्यासाठीही यूट्यूब वापरण्याची सवय असते. हे एक व्हिडिओ स्ट्रिमिंग अ‍ॅप आहे आणि तुम्हाला गाणी ऐकण्यासाठी या अ‍ॅपची गरज नाही. यासाठी तुम्ही ऑडिओ अ‍ॅप्स वापरू शकता. Google Play Store आणि Apple App Store वर अनेक मोफत ऑडिओ अ‍ॅप्स उपलब्ध आहेत जे तुम्ही वापरू शकता. ऑडिओ अ‍ॅप्स तुम्हाला सोशल मीडियापासून दूर राहण्यास मदत करतील.

    डिजिटल डिटॉक्स का गरजेचं आहे?

    तुमचा फोन अगदी काही वेळ न मिळाल्यास तुम्हाला अस्वस्थता आणि तणाव जाणवू लागतो, फोन कुठे असेल याचं टेन्शन येऊ लागतं. वारंवार काही मिनिटांनंतर फोन चेक करण्याची सवय लागते. फोन चेक न केल्याने ट्रेंडबाहेर किंवा मागे पडण्याची भीती वाटते, असा प्रकार तुमच्या बाबतीत होत असेल तर तुम्हाला डिजिटल डिटॉक्सची गरज आहे.

    डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय?

    सोशल मीडिया हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे आणि आपण या प्लॅटफॉर्मवर विनाकारण आपला वेळ वाया घालवत असतो. काही काम नसलं की फोन घेऊन पडून राहतो आणि सतत सोशल मीडिया चाळत बसतो. रोजरोज हेच काम केलं, की याची सवय लागते. ही सवय मोडण्यासाठी फोनपासून लांब राहणं किंवा फोन दूर ठेवणं आणि सोशल मीडिया अ‍ॅप्सचा वापर कमी करणं, याला डिजिटल डिटॉक्स म्हणतात.

    तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार निर्णय घेऊ शकता नो फोन नियम की डिजिटल डिटॉक्स करायचं ते विचार करा आणि निर्णय घ्या.

    First published:

    Tags: Smartphone, Tech news