नवी दिल्ली, 15 जून : जर तुम्ही टीव्ही, फ्रीज, एसी, लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर जूनमध्येच खरेदी करणं फायद्याचं ठरेल. कारण पुढच्या महिन्यात, कंज्युमर ड्युरेबल्सच्या किंमतीत वाढ होणार आहे. वस्तूंच्या किमतीत वाढ आणि आवश्यक घटकांच्या कमतरतेमुळे कंपन्यांकडून किमतीत वाढ करण्यात येणार आहे. वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन शाळांमुळे लॅपटॉपच्या किमतीमध्ये जबरदस्त वाढ सुरू आहे. जवळपास दोन महिन्यांनंतर लॉकडाउननंतर पुन्हा एकदा रिटेलर्सने दुकानं सुरू केली आहे, त्यामुळे ग्राहकांकडे मोठ्या डिस्काउंटचा पर्यायही उपलब्ध आहे. 10 टक्क्यांपर्यंत किंमती वाढण्याची शक्यता - जानेवारी 2021 पासून TV, AC, फ्रीज आणि लॅपटॉपसारख्या कंज्युमर ड्युरेबल्सच्या किमतीत वाढ होत आहे. पुढच्या महिन्यापासून कंपन्या 10 टक्क्यांपर्यंत किमती वाढवण्याच्या तयारीत आहेत. मायक्रोप्रोसेसर आणि पॅनलसारख्या आवश्यक कंपोनेंटची कमतरता, रॉ मटेरिअल आणि मेटलमध्ये कॉपरच्या किमतीत वाढ, तसंच कस्टम ड्युटी वाढल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून किमतीत वाढ झाली असून येणाऱ्या महिन्यांतही ही वाढ सुरू राहणार आहे.
(वाचा - दोन दिवसानंतर 50 रुपये लीटरपर्यंत स्वस्त होऊ शकतं खाद्य तेल; हे आहे कारण )
विजय सेल्सचे एमडी निलेश गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, टीव्हीच्या किमती अधिक वाढू शकतात. त्याशिवाय सलग दुसऱ्या वर्षी शाळा सुरू न झाल्याने आणि वर्क फ्रॉम होम कल्चर वाढल्यानेही लॅपटॉप सेगमेंटमध्ये मोठी मागणी आहे. लॅपटॉपच्या किमती 5 ते 7 टक्क्यांनी वाढल्या असून पुढेही महाग होणार आहेत.
(वाचा - स्कॅम अॅड्सद्वारे युजर्सची फसवणूक, News Feed वर बनावट जाहिराती कशा ओळखाल? )
रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे सीईओ कुमार राजगोपालन यांनी सांगितलं, की दोन महिन्यांच्या लॉकडाउननंतर कमी झालेल्या मागणीत वाढ झाली आहे, परंतु अद्यापही उलाढाल अधिक होत नाही. कंपन्यांकडे पुरेसा साठा आहे, परंतु तरीही पुढील दोन-तीन महिने खरेदी कमी राहील. सध्या केवळ दुकानं सुरू करणार असून स्ट्रॅटेजीवर नंतर काम करणार असल्याचं ते म्हणाले.