नवी दिल्ली, 17 मे : खराब टायर्सपासून देशातील वाहन चालकांची लवकरच सुटका होईल. एसी-फ्रीजप्रमाणे आता गाड्यांच्या टायर्ससाठीही स्टार रेटिंग असेल. यामुळे केवळ वाहन चालक सुरक्षित प्रवासच नाही करणार तर यामुळे गाड्यांचं मायलेजही वाढण्यास मदत मिळेल. सरकार लवकरच टायर्ससाठी स्टार रेटिंगचे नियम लागू करू शकते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाने
(ARAI) टायर बनवणाऱ्या कंपन्यांशी याबाबत चर्चा केली आहे. सध्या टायरच्या गुणवत्तेसाठी बीआयएस
(BIS) नियम लागू आहे. पण पॉवर रेटिंगप्रमाणे आता टायरसाठीही स्टार रेटिंग असेल. 5 स्टार रेटिंग टायर्समुळे इंधन वाचवण्यासाठी आणि मायलेज वाढवण्यासाठी मदत मिळेल. स्टार रेटिंगद्वारे खराब टायर्सच्या आयतीवरही बंदी आणण्याची सरकारची योजना आहे. 5 स्टार रेटिंग टायरमुळे 5 ते 10 टक्क्यांपर्यंत इंधनाची बचत होऊ शकते. सरकारच्या या निर्णयामुळे आत्मनिर्भर भारत मिशनसाठीही प्रोत्साहन मिळेल. यामुळे भारतीय कंपन्या चांगल्या क्वालिटीचे टायर बनवू शकतील.
टायर्सच्या किमतीत वाढ -
5 स्टार रेटिंग टायर्सची किंमती काही प्रमाणात अधिक असू शकते. सामान्य टायरच्या तुलनेत 5 स्टार टायरची किंमत किती जास्त असेल याबाबत कोणतीही माहिती नाही. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान टायरच्या किमतीत यावर्षी 8 ते 12 टक्क्यांपर्यंतची वाढ झाली आहे. कच्चा माल आणि कमॉडिटीच्या किमतीत वाढ झाली. याच कारणामुळे टायर उत्पादक कंपन्यांनी टायरचे दर वाढवले आहेत.
मागणी वाढणं, पुरवठा कमी होणं, कच्च्या तेलाच्या किमती वाढणं यामुळे टायर उत्पादनासाठी वापरला जाणारा नैसर्गिक रबर महाग झाला आहे. नैसर्गिक रबराच्या मागणीपैकी केवळ एक तृतीयांश मागणी देशांतर्गत उत्पादनातून भागवली जाते. 2021-22 या आर्थिक वर्षात नैसर्गिक रबराच्या देशांतर्गत किमती 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. टायर उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या इतर कच्च्या मालाच्या किमतीही वाढल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.