नवी दिल्ली, 17 मे : सध्या इंटरनेटच्या डिजीटल जगात जवळपास प्रत्येकजण स्मार्टफोनचा वापर करतो. स्मार्टफोनवरुन अनेक लहान-मोठी काम केली जातात, त्यामुळे फोनवर अवलंबून राहणं वाढलं आहे. पण नुकताच स्मार्टफोनबाबतचा एक रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टनंतर युजर्समध्ये खळबळ उडाली असून यात भीतीदायक खुलासा करण्यात आला आहेत.
Sapien Labs ने एक रिसर्च केलं होतं. त्याचा रिपोर्ट समोर आला आहे. या रिसर्चमध्ये 18 ते 24 वयोगटातील तरुणांमध्ये बिघडत्या मानसिक आरोग्यामागे मोठं कारण स्मार्टफोन असून शकतो असं म्हटलं आहे. रिपोर्टनुसार, ज्यावेळी आधी इंटरनेटचा वापर होत नव्हता, त्यावेळी 18 वर्षांपर्यंतच्या तरुणांनी आपल्या मित्रांसोबत, कुटुंबियांसोबत 15 ते 18 हजार तास घालवले असतील. आता ही वेळ 1500 वरुन कमी होऊन 5 हजार तासांवर आली आहे.
Sapien Labs च्या रिसर्च रिपोर्टमधून एक भीतीदायक खुलासा करण्यात आला आहे. जे लोक स्मार्टफोनचा अधिक वापर करतात त्यांच्या मनात आत्महत्या करण्याचे विचार येत असल्याचं रिसर्चच्या संशोधकांनी म्हटलं आहे. Sapien Labs चे प्रमुख संशोधक तारा थिआगराजन (Tara Thiagarajan) यांनी सांगितलं, की स्मार्टफोनचा वापर इतका वाढला आहे, की लोक आपापसात बोलणंच विसरले आहेत. ज्यावेळी लोक एकमेकांना भेटत नाहीत, त्यावेळी ते चेहऱ्यावरील भाव, शरीराची हालचाल, लोकांच्या भावनांवर लक्ष देण्यात तसंच खऱ्या आयुष्यात समस्या सोडवण्यास सक्षम नसतात. यामुळे ते समाजाशी जोडले जाऊ शकत नाहीत आणि त्यांच्या मनात आत्महत्येसारख्या गोष्टी येतात.
या रिसर्चमध्ये एकूण 34 देशांतील डेटा एकत्र करण्यात आला आहे. यात स्मार्टफोनवर लोकांच्या अवलंबून राहण्याला 2010 पासून सुरुवात झाल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे स्मार्टफोनचे गुलाम बनू नका. स्वत: याकडे लक्ष द्या, की तुम्हाला किती वेळ स्मार्टफोनवर घालवायचा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Smartphone