नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर : सध्या फेस्टिव्ह सीजनमध्ये अनेक शॉपिंग साइट्सवर स्मार्टफोनवर मोठ्या ऑफर्स दिल्या जातात. पण या ऑफर्स, डिस्काउंटवर अगदी पूर्ण विश्वास ठेवणं महागात पडू शकतं. असंच एक प्रकरण समोर आलं आहे, ज्यात युजरला 18 हजार रुपयांच्या किंमतीचा स्मार्टफोन 4500 रुपयांत ऑफर केला जात होता. ज्या युजर्सने या ऑफरअंतर्गत स्मार्टफोन ऑर्डर केला, त्यांना फोनच्याऐवजी साबण डिलीव्हर करण्यात आला.
फेक कॉल सेंटरद्वारे होत होती फसवणूक -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक युजर्सची फेक कॉल सेंटरद्वारे फसवणूक केली गेली. या फेक कॉल सेंटरमधील महिला आपण एक्झिक्युटिव्ह बोलत असल्याचं सांगत युजर्सला कॉल करुन त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचं काम करत होत्या. यात युजर्सला कॉम्बो डिल्सअंतर्गत 18 हजार रुपयांचा स्मार्टफोन केवळ 4500 रुपयांत ऑफरमध्ये दिला जात असल्याचं सांगितलं जात होतं. तसंच युजर्सला ही डिल केवळ काही काळासाठी असून लवकरात लवकर निर्णय घेण्याचं सांगितलं जात होतं.
या फेक कॉल सेंटरमधून करण्यात येणाऱ्या कॉलमध्ये युजर्सला असं सांगितलं जात होतं, की त्यांचा नंबर एका नव्या मोबाइल फोनसाठी सिलेक्ट झाला आहे आणि ही खास ऑफर केवळ एक दिवसासाठी आहे. परंतु एका टिप्स्टरने पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर हे संपूर्ण फेक जाळं समोर आलं.
पोलिसांना या फेक कॉल सेंटरची महिती मिळाल्यानंतर त्यांनी या कॉल सेंटरवर धाड टाकली आणि 26 महिलांसह दोन पुरुषांना ताब्यात घेतलं.
4500 रुपयांत कॉम्बो पॅकमध्ये स्मार्टफोन ऑफर करण्याचं सांगत हे फ्रॉड करणारे डिलीव्हरीसाठी इंडिया पोस्टचा वापर करत होते. ऑफर्सवर विश्वास बसण्यासाठी कॅश ऑन डिलीव्हरीचाही पर्याय देण्यात आला होता. परंतु डिलीव्हरीवेळी स्मार्टफोनऐवजी साबण, बेल्ड सारख्या वस्तू ठेवल्या जात होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Online fraud, Smartphone