नवी दिल्ली, 23 जुलै: भारतात पेगासस स्पायवेअर (Pegasus Spyware) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. इंटरनेटवर या स्पायवेअरची मोठी चर्चा असून अनेकांनी या पेगाससद्वारे एखाद्याचा मोबाईल कसा हॅक केला जाऊ शकतो, तसंच हा स्पायवेअर कुठून डाउनलोड करता येऊ शकतो हे जाणून घेण्याचाही प्रयत्न केला. याचदरम्यान तमिळनाडूतील एक कोचिंग सेंटर चांगलंच चर्चेत आलं आहे.
पेगासस स्पायवेअर कसा मिळेल याच प्रयत्नात असणाऱ्या अनेक युजर्सच्या सर्चदरम्यान, कोझिकोड येथील कोचिंग सेंटरची मोठी चर्चा सुरू झाली. धोकादायक पेगासस स्पायवेअर आणि कोझिकोडमधील कोचिंग सेंटरचा काय संबंध? असा प्रश्न पडला असेल ना? कोझिकोडमधील लोक सेवा आयोगाची तयारी करणाऱ्या या कोचिंग सेंटरचं नावही पेगासस आहे. त्यामुळे ज्यावेळी अनेकांनी पेगासस सर्च केलं, त्यावेळी त्यांना या कोचिंग सेंटरचं हे अॅप मिळालं. अनेकांनी हेच पेगासस स्पायवेअर संबंधित अॅप असल्याचं समजून ते डाउनलोड केलं.
पेगासस पीएससी कोचिंग सेंटरचं पेगासस ऑनलाईन हे अॅप एकामागे एक धडाधड अचानक डाउनलोड होऊ लागलं. कोचिंग सेंटर या प्रकाराने हैराण झालं, की अचानक अॅप इतक्या मोठ्या प्रमाणात कसं डाउनलोड होऊ लागलं. परंतु त्यांना काही वेळाने याबाबत संपूर्ण माहिती मिळाली.
पेगासस स्पायवेअर समजून अनेकांनी मागील आठवड्यात हे या कोचिंग सेंटरचं अॅप जवळपास 1000 वेळा डाउनलोड केलं. त्यानंतर काही दिवसांत हा आकडा 2110 वर पोहोचला. पण डाउनलोड केल्यानंतर अनेकांना हे अॅप कोचिंग सेंटरचं असल्याचं लक्षात आल्यानंतर ते लगेचच अनस्टॉलही होऊ लागलं.
पेगासस पीएससी कोचिंग सेंटरचे मालक पीसी सनूप यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, आमच्या कोचिंग सेंटरचं पेगासस ऑनलाईन हे अॅप डाउनलोड केल्यानंतर अनेकांनी कॉल केले. कॉल करणाऱ्यांमध्ये उत्तर भारतीयांची मोठी संख्या होती. अनेकांनी पेगाससचा वापर करुन कॉल कशाप्रकारे मॅनेज केले जातात असे प्रश्नही विचारले. आमचं अॅप एक कोचिंग इन्स्टिट्यूट असून आम्ही, हेरगिरी करणाऱ्या पेगासस स्पायवेअर संबंधीत नसल्याचं अनेकांना आम्ही सांगत असल्याचं ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Spyware, Tech news, Technology