नवी दिल्ली, 27 डिसेंबर : कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने वाहन चालकांना मोठा दिलासा दिला आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Road Transport and Highways) रविवारी ड्रायव्हिंग लायसन्ससह, गाडीशी संबंधीत सर्व कागदपत्रांची वैधता 31 मार्चपर्यंत वाढवली आहे. हा नव्या घोषणेची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय, सर्व प्रकारच्या गाड्यांचे परमिट (Vehicle Permit), व्हिकल फिटनेस सर्टिफिकेट (Fitness Certificate), गाडीचं रजिस्ट्रेशन (RC validity) जे फेब्रुवारी 2020 ते मार्च 2021 दरम्यान एक्सपायर होणार होतं, त्या सर्वांची वैधता 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोना संकटात सामान्यांना दिलासा देत सरकारने काही महिन्यांपूर्वी मोटर व्हिकलसंबंधी सर्व कागदपत्रांची वैधता 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यात फिटनेस सर्टिफिकेट, ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (आरसी) सह प्रमुख कागदपत्रांचा समावेश आहे. मात्र आता त्यात वाढ करून गाड्यांच्या कागदपत्रांसाठीची वैधता 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना या नियमाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून कोणत्याही वाहन चालकाला त्रास होऊ नये.
कमर्शियल वाहन मालकांनी सरकारकडे आणखी काही सवलती देण्याचं आवाहन केलं होतं. व्यावहारिक अडचणींमुळे अद्यापही रस्त्यावर न येणाऱ्या वाहनांना आणखी दिलासा द्यावा, असं आवाहन सरकारला करण्यात आलं आहे. यात स्कूल बस ऑपरेटर्सचाही समावेश होता. त्यानंतर आता सरकारने वाहनांच्या रिन्यूवलसाठीची मुदत वाढवून सर्वसामन्यांना मोठा दिलासा दिला आहे.