नवी दिल्ली, 20 डिसेंबर : भारतात विक्री होणाऱ्या सर्व कार्ससाठी, कार फीचर्सअंतर्गत ड्रायव्हिंग सीटसह, फ्रंट पॅसेंजरसाठीही एअरबॅग अनिवार्य करण्याच्या दिशेने केंद्र सरकार तयारी करत आहे. वाहनांच्या मानकांबाबतच्या सरकारच्या तांत्रिक समितीने नुकताच एक प्रस्ताव सादर केला आहे, या प्रस्तावात असं सांगण्यात आलं आहे की, सर्वात स्वस्तातील स्वस्त कारमध्येही, ड्युअल एअरबॅग्स अनिवार्य असाव्यात, जेणेकरून अपघात झाल्यास चालक आणि इतर प्रवाशांचे प्राण वाचण्यासाठी मदत होऊ शकेल.
भारतात रस्ते अपघातात दरवर्षी एक लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. ओवर स्पीडिंग किंवा कारच्या धडकेत मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे. कारमध्ये लोकांच्या सुरक्षेसाठी कार कंपन्या मागील काही वर्षांपासून कार सेफ्टी फीचर्सकडे विशेष लक्ष देत आहेत. तसंच ग्राहकांचाही कार खरेदी करताना, कारमधील सेफ्टी फीचर्सकडे कल वाढतो आहे.
परंतु आताही केवळ एन्ट्री लेवलच्या स्वस्त कार्समध्ये ड्रायव्हिंग सीटसाठी एअरबॅग आहे, आणि थोडे अधिक पैसे भरून ड्युअल एअरबॅग्ससारखे फीचर्स मिळतात.
एअरबॅग्स आवश्यक -
भारतात विक्री होणाऱ्या सर्व कार्समध्ये ड्युअल एअरबॅग्स अनिवार्य करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. म्हणजेच ड्रायव्हिंग सीटसह, फ्रंट सीटवर बसलेल्या व्यक्तीसाठीही एअरबॅग अनिवार्य करण्याच्या दिशेने काम सुरू आहे. एअरबॅग्स कोणत्याही कारच्या सर्वात प्रमुख सेफ्टी फीचर्सपैकी एक मानल्या जातात. परंतु याबाबत कार वापरकर्त्यांसह, कार निर्मात्यांमध्येही अतिशय उदासिनता होती. 1 जुलै 2019 पर्यंत कार चालवण्यासाठी एअरबॅग अनिवार्य नव्हते. परंतु त्यानंतर सरकारने सर्व कार्ससाठी एअरबॅग अनिवार्य केल्या.
लाईफ सेव्हिंग फीचर्स -
अधिकतर कार्समध्ये आता रिवर्स पार्किंग सेंसर, स्पीड अलर्ट आणि सीट बेल्ट रिमाइंडरसारखे फीचर्स मिळतात, परंतु एअरबॅगसारख्या लाईफ सेव्हिंग फीचरला अद्यापही तितकंस महत्त्व दिलं जात नाही. जर 10 लाख आणि त्याहून अधिक रुपयांची कार खरेदी केल्यास, त्यात मल्टीपल एअरबॅग मिळतात. परंतु 5 लाख रुपयांहून कमी किंवा अधिकची कार खरेदी केल्यास त्यात एक किंवा दोन एअरबॅग मिळतात.
त्यामुळे आता स्वस्तातल्या स्वस्त कारमध्येही ड्युअल एअरबॅग्स असणं अनिवार्य करण्याचा रस्ते वाहतूक मंत्रालयाचा प्रयत्न आहे. हा प्रस्ताव लवकरात लवकर लागू करण्याचंही बोललं जात आहे. त्याशिवाय कारमध्ये चाईल्ड लॉक सिस्टमही अनिवार्य करण्याच्या दिशेने विचार सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Car, Road accidents in india