कोलकाता, 17 जून : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Covid-19 Pandemic) ऑक्सिजन कमतरतच्या अनेक घटना समोर आल्या. ऑक्सिजन अभावी (Oxygen Shortage) अनेक रुग्णांचा मृत्यूही झाला. याचदरम्यान पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकातामधील एक वैज्ञानिक रामेंद्र लाल मुखर्जी यांनी ऑक्सिजनबाबतचा एक शोध लावला आहे. त्यांनी श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या रुग्णांसाठी एक पोर्टेबल वेंटिलेटर तयार केलं आहे, ज्याचं वजन केवळ 250 ग्रॅम आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या वेंटिलेटरचा उपयोग कोणत्याही वयोगटातील लोक करू शकतात. विशेष बाब म्हणजे हे पोर्टेबल वेंटिलेटर मोबाईल चार्जरनेही चार्ज करता येतं आणि आठ तासांपर्यंत त्याचा वापर केला जाऊ शकतो. मुखर्जी यांनी सांगितलं, की ही कल्पना त्यांना अशावेळी आली, जेव्हा कोरोना रुग्ण मृत्यूच्या दाढेत असताना त्यांना ऑक्सिजनची अत्यंत आवश्यकता होती. त्यानंतर त्यांनी या वेंटिलेटरवर काम करण्यास सुरुवात केली. 20 दिवसांच्या मेहनतीनंतर त्यांनी पॉकेट वेंटिलेटर तयार केलं. कसं करेल काम - एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या डिव्हाईसमध्ये दोन पार्ट्स आहेत. जिथे एक पॉवर यूनिट आणि एक वेंटिलेटर यूनिट माउथपीसशी जोडलेलं आहे. एक बटण दाबून पॉवर सुरू केल्यानंतर वेंटिलेटर बाहेरुन हवा खेचून प्यूरिफाय करणाऱ्या अल्ट्रा वॉयलेट (UV) चेंबरद्वारे जाते. त्यानंतर शुद्ध हवा माउथपीसपर्यंत पोहचते.
(वाचा - विद्यार्थ्याने Instagram मध्ये सांगितली मोठी त्रुटी,Facebookने दिले 22 लाख रुपये )
मुखर्जी यांनी सांगितलं, की कोणीही व्यक्ती कोरोनासंक्रमित असला, तरी हे UV चेंबर हवा शुद्ध करुन ती जर्म्समुक्त करेल. या उपकरणात एक कंट्रोल नॉब आहे, जो लोकांना ऑक्सिजनच्या गरजेनुसार वेंटिलेटर वापरण्याची सुविधा देतं. हे पॉकेट वेंटिलेटर कोरोना रुग्णांव्यतिरिक्त अस्थमा आणि इतर श्वासासंबंधी समस्या असणाऱ्या लोकांसाठीही मदतशीर ठरू शकतं. तसंच अनेक अमेरिकी कंपन्या बाजारात वाढत्या मागणीमुळे पॉकेट वेंटिलेटरसाठी त्यांच्याशी संपर्कात आहेत. या शोधामुळे अनेक लोकांचा जीव वाचू शकतो, असा विश्वासही मुखर्जी यांनी व्यक्त केला आहे.