नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर : मागील काही वर्षात भारतात ऑनलाइन खरेदीचा कल वाढला आहे. कोरोना काळात तर यात अधिकच वाढ झाली आहे. ऑनलाइन शॉपिंगवेळी अनेकदा फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत. परंतु एका व्यक्तीसोबत घडलेल्या घडनेने सर्वच जण आश्चर्यचकित झाले आहेत. एका ग्राहकाने Amazon वरुन पासपोर्ट कव्हर ऑर्डर केल्यानंतर त्याला पासपोर्टही कव्हरसोबत, खरा पासपोर्ट डिलीव्हर झाल्याची घटना समोर आली आहे.
केरळमधील वायनाड येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने 30 ऑक्टोबर रोजी Amazon वरुन पासपोर्ट कव्हर ऑर्डर केलं होतं. 1 नोव्हेंबरला त्याची ऑर्डर डिलीव्हर झाली. Amazon वरुन आलेला बॉक्स त्यांनी ओपन केल्यानंतर, त्यांना धक्काच बसला. त्यांनी केवळ पासपोर्ट कव्हर मागवलं असताना, ऑर्डरमध्ये कव्हरसह खरोखरचा पासपोर्टही आला.
खरा पासपोर्ट ऑर्डरमध्ये आल्यानंतर, त्यांनी Amazon Customer Care ला संपर्क केला. पण त्यांना तिथेही ऑर्डरप्रमाणे उत्तरही हैराण करणारं मिळालं. कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हने असं पुन्हा होणार नाही. आपल्या विक्रेत्यांना यापुढे लक्षपूर्वक काम करण्याबाबत सांगितलं जाईल असं सांगितलं. पण ऑर्डरमध्ये आलेल्या खऱ्या पासपोर्टचं नेमकं काय करायचं हे त्यांनी सांगितलं नाही.
कस्टमर केअरकडून आलेल्या उत्तरानंतर या व्यक्तीने स्वत:चं पासपोर्टवरील डिटेल्सवरुन संबंधित व्यक्तीला कॉल केला. कित्येक दिवस संपर्क होऊ शकला नाही. परंतु काही दिवसांनी संपर्क झाला. ऑर्डरमध्ये आलेला खरा पासपोर्ट केरळमधीलच एका व्यक्तीचा असल्याचं समजलं.
नेमकं काय झालं?
त्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना आलेलं हे पासपोर्ट कव्हर आधीच त्या खरा पासपोर्ट असलेल्या व्यक्तीने ऑर्डर केलं होतं. त्यांनी आपला पासपोर्ट त्यात ठेवून चेक केलं असेल. परंतु त्यांना ते पसंत पडलं नसल्याने, ते परत रिटर्न केलं. पण त्या व्यक्तीने कव्हर रिटर्न करताना पासपोर्ट त्यातून काढलाच नाही आणि Amazon विक्रेत्यांनीही पुन्हा त्याची विक्री करताना तपासणी केली नाही. अशाप्रकारे पासपोर्ट कव्हरच्या ऑर्डरसह खरा पासपोर्टही डिलीव्हर झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amazon, Online shopping