नवी दिल्ली, 8 मार्च : जुनी कार स्क्रॅप करुन नवी कार घेण्याची तयारी दाखवणाऱ्या ग्राहकांसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. जुनी कार स्क्रॅप करण्याच्या बदल्यात नवं वाहन खरेदी करणाऱ्या कंपन्या ग्राहकांना जवळपास 5 टक्के सूट देतील असं गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे.
यावर्षी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये (Union Budget 2021-22) जुन्या वाहनांना स्वच्छेनं स्क्रॅप करण्याचं धोरण (The voluntary vehicle scrapping policy) केंद्र सरकारनं जाहीर केलं आहे. या धोरणानुसार खासगी वाहनं स्क्रॅप करण्याची मर्यादा 20 वर्षे, तर व्यावसायिक वाहनांना स्क्रॅप करण्याची मर्यादा 15 वर्षे आहे.
या धोरणाची चार मुख्य वैशिष्ट्यं असल्याचं गडकरी यांनी स्पष्ट केलं. नव्या वाहनांसाठी सवलतीसोबतच प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर हरित कर आणि अन्य शुल्क आकारण्याची तरतूद यामध्ये आहे. वाहनांना फिटनेस आणि प्रदूषण चाचणी करुन घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यासाठी देशात सेल्फ ड्राईव्ह फिटनेस सेंटरची आवश्यकता आहे. आम्ही त्या दिशेनं काम करत आहोत, असं गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे.
सेल्फ ड्राईव्ह फिटनेस सेंटरची उभारणी सार्वजनिक खासगी भागिदारीमधून (public private partnership) केली जाईल. त्यासाठी केंद्र सरकार खासगी भागिदारांना तसंच राज्य सरकारांना आवश्यक ती मदत करेल असं आश्वासन गडकरींनी दिलं आहे.
सेल्फ ड्राईव्ह चाचणीत अनुत्तीर्ण होणाऱ्या वाहनचालकांकडून दंड वसूल केला जाईल. केंद्र सरकारचं नवं धोरण वाहन क्षेत्रासाठी (Automobile Sector) वरदान असल्याचा दावा गडकरी यांनी केला आहे. या धोरणामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल असं त्यांनी यावेळी सांगितलं.
कोरोना व्हायरस (Coronavirus) नंतर वाहन उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात मंदी आली आहे. ही मंदी दूर करण्यासाठी हे धोरण आणलं आहे. यामुळे भारतीय वाहन उद्योगामध्ये 30 टक्के वाढ होईल. सध्या 4.5 लाख कोटी टर्न ओव्हर असलेला हा उद्योग 10 लाख कोटींपर्यंत पोहचेल असा दावाही गडकरींनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Car, Discount offer, India, Nitin gadkari, Tech news