नवी दिल्ली, 7 मार्च : जर तुम्ही तुमच्या गाडीमध्ये फास्टॅग लावला आहे किंवा फास्टॅग खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. FASTag मध्ये आता फ्रॉडची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) लोकांना नकली FASTag बाबत इशारा दिला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, काही फ्रॉडस्टर्सनी नकली FASTag ची ऑनलाईन विक्री करण्यास सुरुवात केली आहे. हे नकली फास्टॅग खऱ्या फास्टॅगप्रमाणे तयार करून विक्री होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे ग्राहकांना अशाप्रकारच्या फ्रॉडपासून वाचण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सावधानतेचा इशारा दिला आहे.
नकली फास्टॅगबाबत येथे करा तक्रार -
NHAI ने दिलेल्या माहितीनुसार, जर ग्राहकांनी चुकून नकली फास्टॅग खरेदी केल्यास, त्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या हेल्पलाईन क्रमांक 1033 वर कॉल करून तक्रार दाखल करू शकतात. सरकारने 15 फेब्रुवारी 2021 पासून देशभरात FASTag अनिवार्य केला आहे. त्यामुळे ज्या वाहनांना अद्यापही फास्टॅग लावण्यात आलेला नाही, त्यांना टोल प्लाझावर दुप्पट शुल्क भरावं लागेल.डिजिटल व्यवहाराला प्राधान्य देण्यासाठी तसंच वेळेची आणि इंधनाची बचत करण्याच्या उद्देशाने हा फास्टॅगचा निर्णय घेण्यात आला आहे.
येथे खरेदी करा FASTag -
FASTag खरेदीसाठी ग्राहक https://ihmcl.co.in/ वर किंवा MyFastag App चा वापर करू शकतात. तसंच ग्राहक लिस्टेड बँक आणि अथॉराइज्ड एजेंट्सकडून फास्टॅग खरेदी करू शकतात. अॅमेझॉन, paytm द्वारेही FASTag खरेदी करता येतो. मोठ्या पेट्रोल पंपावरही फास्टॅग खरेदी करण्याची सुविधा आहे.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) दिलेल्या माहितीनुसार, FASTag तिथेच रिचार्ज करा, जेथे तो खरेदी केला आहे. म्हणजेच ज्या बँकेतून तो खरेदी केला आहे, त्याच बँकेतून तो रिचार्ज करावा लागेल. ग्राहकाने दुसऱ्या बँकेतून FASTag रिचार्ज केल्यास, त्याला 2.5 टक्के लोडिंग चार्ज द्यावा लागेल. म्हणजेच 1 हजार रुपयांचा रिचार्ज केल्यास, त्यावर 25 रुपये अधिक द्यावे लागतील.
तसंच एखाद्या बँकेची FASTag सुविधा आवडली नसल्यास, मोबाईल नंबरप्रमाणे पोर्टही करता येईल. ग्राहक FASTag आधी घेतलेल्या बँक किंवा एजेन्सीला रिटर्न करू शकतो आणि दुसऱ्या बँकेतून तो घेता येऊ शकतो. अशाप्रकारे FASTag पोर्ट केल्यानंतर यात नंबर आधीचाच राहतो. परंतु एकदा FASTag घेतल्यानंतर, ग्राहक 3 महिन्यांनंतरच, port सर्व्हिस वापरू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fastag