मुंबई, 8 मार्च : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा (West Bengal Assembly Elections 2021) प्रचार सध्या जोरात सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवारी कोलकातामध्ये भव्य सभा घेतली. या सभेच्या माध्यमातून भाजपानं निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांनीही राज्यभर प्रचार दौऱ्यांना सुरुवात केली आहे. बंगालमध्ये निवडणुकीचा पारा तापलेला असतानाच देशाच्या दुसऱ्या भागाला असलेल्या जम्मू काश्मीरमधून बंगाल विधानसभा निवडणूक प्रचारासंदर्भातील एक बातमी आली आहे. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेता फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी आपल्याला फेक कॉल (Fake call) करुन फसवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप केला आहे. ‘ममता बॅनर्जी यांच्या बाजूने बंगाल विधानसभा निवडणुकीत प्रचार केला तर 50 लाख रुपये मिळतील अशी ऑफर देणारा फोन आपल्याला आला होता,’ असा अब्दुल्ला यांचा आरोप आहे. उधमपूरमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी हा खुलासा केला. कुणाचा आला होता फोन? अब्दुल्ला यांनी सांगितले की, ‘मला या महिन्यात झारखंडमधून एका व्यक्तीचा फोन आला होता. त्या व्यक्तीने झारखंडचे मुख्यमंत्री तुमच्याशी बोलणार असून सध्या ते दुसऱ्या कॉलवर व्यस्त आहेत. त्यानंतर मला अर्ध्या तासानं पुन्हा फोन आला. त्यावेळी सांगण्यात आले की, झारखंडचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना पाठिंबा देण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये जाणार आहेत. तुम्हीही ममता यांना पाठिंबा दिला तर 50 लाख मिळतील.’ ( वाचा : मोदींना कोलकातासाठी वेळ आहे, शेतकऱ्यांसाठी नाही, शरद पवारांचा हल्लाबोल ) ‘देवेगौडा यांनाही फसवण्याचा प्रयत्न’ फारुख अब्दुल्ला यांनी यावेळी आपल्याप्रमाणे माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनाही फसवण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा केला. झारखंडमधील एका खासदाराशी या विषयावर चर्चा केल्यानंतर आपल्याला ही माहिती समजल्याचे त्यांनी सांगितले. विरोधी पक्षांना फसवण्याचा हा कट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पश्चिम बंगाल विधानसभेसाठी 27 मार्च ते 29 एप्रिल या दरम्यान आठ टप्प्यात मतदान होणार असून 2 मे रोजी निकाल लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.