मुंबई, 23 डिसेंबर : फर्निचर चेन आयकियाचं (IKEA) दुसरं स्टोअर नवी मुंबईत सुरू होणार आहे. आयकिया कंपनीची महाराष्ट्रात पुढच्या 10 वर्षात जवळपास 6000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात त्यांचं हे पहिलं मोठ्या स्वरूपातील स्टोअर आहे. हे स्टोअर 5.3 लाख चौरस फूट जागेत असून तुर्भे रेल्वे स्टेशनजवळ आहे.
या स्टोअरमध्ये घरात वापरल्या जाणाऱ्या 7000 हून अधिक वस्तू असणार आहेत. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, IKEA ची मुंबईत दोन सिटी सेंटर स्थापित करण्याची योजना आहे. IKEA सिटी सेंटर स्टोअर नवी मुंबईतील प्रमुख स्टोअरहून लहान असेल. महाराष्ट्रात 2030 पर्यंत 6000 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसह राज्यात 2.5 कोटी लोकांपर्यंत पोहचणं हे IKEA चं लक्ष्य आहे. यासाठी IKEA 6000 हून अधिक नोकऱ्या देणार आहे. त्यापैकी 50 टक्के नोकऱ्या महिलांसाठी दिल्या जाणार असल्याची माहिती, कंपनीकडून देण्यात आली आहे.
आयकिया बेंगळुरूमध्ये आपल्या तिसऱ्या स्टोअरवर काम करत असून त्यानंतर दिल्लीतही स्टोअर सुरू केले जाणार आहेत. भारतात मुंबईमध्ये IKEA चा मोठा बाजार आहे. लोक क्लिक अँड कलेक्ट सर्व्हिसद्वारे आमच्या स्टोअरमधून किंवा ऑनलाईन शॉपिंगद्वारे आपल्या पसंतीच्या आणि परवडणाऱ्या किंमतीत उत्पादनं खरेदी करू शकतात, असं IKEA इंडियाचे सीईओ पीटर यांनी सांगितलं.
Sweden ची फर्निचर होम एक्सेसरीज निर्माता कंपनी IKEA ने, 2018 मध्ये भारतात त्यांच्या एन्ट्रीवेळी, 3 वर्षात 3000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचं सांगितलं होतं. कंपनी येणाऱ्या काळात अनेक शहरांत स्टोअर्स सुरू करणार आहे. 2025 पर्यंत देशभरात स्टोअर्सची संख्या 25 करण्याची IKEA ची योजना आहे. येणाऱ्या वर्षात अहमदाबाद, सुरत, पुणे, चैन्नई, कोलकाता सारख्या शहरात ऑनलाईन आणि ऑफलाईन स्टोअर सुरू करण्यात येणार आहेत.
9 ऑगस्ट 2018 रोजी भारतात IKEA ने आपलं पहिलं स्टोअर हैदराबादमध्ये सुरू केलं होतं. स्टोअर सुरू केल्याच्या काही दिवसांतच ते लोकप्रिय झालं होतं. सुरुवातीच्या दिवसात हैदराबादच्या या स्टोअरमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. आता तुर्भेतील स्टोअरला कसा प्रतिसाद मिळतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.