नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी :तुम्ही वापरलेला, रिफर्बिश्ड किंवा अगदी नवा फोन (Mobile Phone) घ्यायचा विचार करताय का? तर मग ही गोष्ट नक्की लक्षात घ्या. फोनची ऑथेंटिसिटी अर्थात सत्यता पडताळून घ्यायला हवी. तुम्ही घेत असलेला स्मार्टफोन चोरीचा आहे का, तसंच तुम्ही घेणार असलेला फोन खरा आहे का, या गोष्टी नागरिकांना पडताळून पाहता येण्यासाठी सरकारने एक सुविधा आता उपलब्ध केली आहे. सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (CEIR) हा नवा प्लॅटफॉर्म सरकारने सादर केला आहे. त्यावर फोनचा IMEI नंबर तपासता येतो. फोन विकत घ्यावा की नाही, याचा निर्णय त्याआधारे करणं शक्य होतं. त्या माध्यमाची माहिती आता घेऊ या. 'गॅजेट्स नाऊ'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
प्रत्येक मोबाइल फोनला 15 आकड्यांचा IMEI नंबर असणं कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक असतं. IMEI नंबरशिवाय मोबाइल फोन विकणं भारतात बेकायदा आहे. IMEI नंबर मिळवण्यासाठी त्या मोबाइलवरून *#06# हा कोड दाबावा. त्यानंतर IMEI नंबर फोनच्या स्क्रीनवर दिसतो. सर्व कायदेशीर फोन्सवर हा कोड चालतो. हा कोड एखाद्या फोनवर चालला नाही, तर तो भारतात बेकायदा विकला जात आहे, याची खात्री बाळगावी.
हे वाचा - Instagram Alert! मित्रांना असा मेसेज केल्यास थेट बंद होणार तुमचं अकाउंट
IMEI नंबर कळण्यासाठी फोन आधी विकत घ्यावा लागत नाही. फोनच्या बिलवर, पावतीवर, पॅकिंग बॉक्सवर, तसंच काही वेळा नव्या फोन्सच्या पाठीही IMEI नंबर दिलेला असतो. फोन विकत घेण्यापूर्वी एखादी व्यक्ती त्या फोनचा IMEI नंबर द्यायला टाळाटाळ करत असेल, तर तो फोन विकत घेणं तुम्ही टाळा.
IMEI नंबर मिळाल्यानंतर सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टरच्या https://ceir.gov.in/Home/index.jsp या वेबसाइटला भेट द्या. त्यानंतर डिव्हाइस व्हेरिफिकेशन पेजला https://ceir.gov.in/Device/CeirIMEIVerification.jsp या लिंकवर भेट द्या. IMEI नंबर वैध आहे की नाही, हे त्याद्वारे कळेल. अवैध IMEI नंबर असलेल्या किंवा ब्लॉक केलेला IMEI नंबर असलेला फोन विकत घेऊ नका. असे फोन चोरीचे असल्याची शक्यता जास्त असते. हे टूल वापरण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर द्यावा लागतो आणि ओटीपीद्वारे नंबर व्हेरिफाय करावा लागतो.
या पेजवर तुम्हाला संबंधित IMEI नंबरचं स्टेटस ब्लॅकलिस्टेड, डुप्लिकेट किंवा ऑलरेडी इन यूझ असं दिसत असेल, तर तो फोन विकत घ्यायचं टाळा, असं सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टरची वेबसाइट सांगते. IMEI is valid असं स्टेटस असलेला फोनच विकत घ्यावा.
तुम्ही विकत घेऊ इच्छित असलेल्या फोनचा IMEI नंबर तुमच्याकडे असेल तर एसएमएसद्वारेही तुम्ही IMEI नंबरचं स्टेटस तपासू शकता. त्यासाठी “KYM <15 digit IMEI number> असा एसएमएस 14422 या क्रमांकावर पाठवावा.
एवढंच नव्हे, तर यासाठी KYM - Know Your Mobile हे ऑफिशियल अॅपही सादर करण्यात आलं आहे. दी सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (C-DOT) या संस्थेने हे अॅप सादर केलं आहे. या अॅपद्वारे IMEI नंबरचं स्टेटस तपासता येतं. तसंच फोनचा उत्पादक, ब्रँड नेम, मॉडेल नेम आदी गोष्टीही त्यात दिल्या जातात.
CEIR हे माध्यम अवैध आणि चोरीच्या मोबाइल फोनच्या बाजारपेठेला लगाम घालण्यासाठी विकसित करण्यात आलं आहे. सगळ्या मोबाइल ऑपरेटर्सचा IMEI डेटाबेस जोडण्यासाठी ते तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे एका नेटवर्कमध्ये ब्लॅकलिस्ट करण्यात आलेला फोन सिमकार्ड बदललं तरीही चालणार नाही, असं त्या वेबसाइटवर म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mobile, Money, Original mobile phone, Smartphone, Stolen mobile phone, Tech news, Verification of mobile phones