नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर : सध्या WhatsApp, Twitter, Facebook, Instagram आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा तुम्ही वापर करत असाल, तर सावध राहण्याची गरज आहे. हॅकर्स सोशल मीडियाद्वारे अनेक युजर्सची फसवणूक करत असल्याचं समोर आलं आहे. युजर्सला आपली पर्सनल माहिती देण्यास ते भाग पाडतात आणि त्यानंतर पैसे चोरी करण्याचं काम करतात. सोशल मीडियावर एक मेसेज मिळतो, ज्यात काही गिफ्ट किंवा लाभ मिळण्याचं सांगितलं जातं आणि युजर्सला काही लिंकवर क्लिक करण्यासाठी सांगितलं जातं.
ज्यावेळी युजर अशा लिंकवर क्लिक करतो, त्यावेळी काही Apps किंवा मालवेअर युजरच्या फोन किंवा कंप्यूटरवर डाउनलोड होतात. या लिंक युजरवर नजर ठेवण्यासाठी आणि फसवणूक करणाऱ्यांना माहिती पाठवण्यासाठी डिझाइन केलेल्या असतात. या लिंकवर क्लिक केल्यानंतर युजर करत असलेल्या मोबाइलमधील सर्व गोष्टींवर नजर ठेवली जाते आणि युजरची माहिती मिळवली जाते.
लिंकवर क्लिक केल्यानंतर युजर्सला काही फॉर्म्स भरायला सांगितले जातात आणि युजरनेम आणि पासवर्ड टाकण्यासाठी सांगितलं जातं. पण हे फॉर्म्स फेक असतात, ते फेक वेबसाइट्सवर आढळतात. हे फॉर्म असे डिझाइन केले जातात, की युजरला ते अधिकृत बँक किंवा इतर एखाद्या अधिकृत संस्थेसारखेच दिसतात. त्यामुळे युजर्सही हा फॉर्म खरा समजून भरतात आणि मोठं नुकसान करून घेतात.
फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात न अडकण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवाच -
- कोणतीही गोष्ट फ्रीमध्ये मिळत नाही. त्यामुळे लिंकवर क्लिक करुन मोठा फायदा किंवा गिफ्ट देण्याबाबत सांगितलं गेल्यास, त्यावर क्लिक करू नका.
- ज्यावेळी कोणत्याही लिंकवर किंवा कुठेही तुमची पर्सनल माहिती युजरनेम-पासवर्ड मागितल्यास तो घोटाळा असल्याचं समजा. कारण कोणतीही बँक किंवा इतर वैध व्यवसाय युजर्सकडून कधीही पासवर्ड, ओटीपी सारखी खासगी माहिती मागत नाही.
- कोणतेही बँकिंग डिटेल्स कोणासोबतही शेअर करू नका. त्यात क्रेडिट आणि डेबिट कार्ड नंबर, सीवीवी, पिन, इंटरनेट बँकिंग, युजर आयडी, इंटरनेट बँकिंग पासवर्ड सामिल आहे, असे डिटेल्स देऊ नका.
- कोणताही OTP शेअर करू नका. ओटीपी मागितल्यास हा फसवणुकीचा प्रकार असू शकतो. यात आधार कार्ड, ई-कॉमर्स वेबसाइटपर्यंत कोणत्याही गोष्टी असू शकतात. त्यामुळे WhatsApp सह कोणत्याही सोशल साइटवर आलेल्या गिफ्ट, ऑफरच्या लिंकवर क्लिक करू नका. चुकून क्लिक केल्यास, पुढे इतर कोणतीही माहिती देऊ नका.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.