नवी दिल्ली, 6 डिसेंबर : गुगलचं (Google) प्रत्येक डूडल (Doodle) नेहमीच हटके असतं. मात्र आजचं (6 डिसेंबर) गुगल डूडल (Google Doodle) विशेष असून, याची नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. गुगलकडून आज पिझ्झा या जगभरातल्या ( world) सर्वांत लोकप्रिय डिशला (Pizza) डूडलवर स्थान देण्यात आलं आहे.
आज गुगलने पिझ्झाचं डूडल ( pizza doodle) तयार केलं आहे. भारतासह जगातल्या अनेक देशांमध्ये ही डिश लोकप्रिय आहे. गुगलने आज हे डूडल बनवण्यामागचं कारण असं, की 6 डिसेंबर 2007 रोजी युनेस्कोच्या प्रतिनिधी सूचीत 'पिजाइउलो' या निआपोलिटन कलेचा समावेश करण्यात आला होता. तो मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा असल्याचं कारण त्यासाठी देण्यात आलं होतं. याच कारणामुळे गुगल डूडलवर आज जगप्रसिद्ध पिझ्झाचा समावेश करण्यात आला आहे.
आजच्या डूडलवर क्लिक केल्यास पिझ्झाचे 11 प्रकार दिसतील. त्यामध्ये मार्गारिटा पिझ्झा (पनीर, टमाटर, तुलसी), पेपरोनी पिझ्झा (पनीर, पेपरोनी), व्हाइट पिझ्झा (पनीर, व्हाइट सॉस, मशरूम, ब्रोकोली), कॅलाब्रेसा पिझ्झा (पनीर, कॅलाब्रेसा, कांद्याचे तुकडे, होल ब्लॅक ऑलिव्ह्ज), मोझारेला पिझ्झा (चीज, ऑरेगॅनो, होल ग्रीन ऑलिव्ह्ज), हवाईयन पिझ्झा (चीज, हॅम, अननस), मॅग्यारोस पिझ्झा (चीज, सलामी, बेकन, कांदा, चिली पेपर), टेरीयाकी मेयोनेज पिझ्झा (चीज, टेरीयाकी, चिकन समुद्री शेवाळ, मेयोनेज), टॉम यम पिझ्झा (पनीर, झींगा, मशरूम, मिरची, लिंबाची पानं), पनीर टिक्का पिझ्झा (पनीर, शिमला मिरची, कांदा, लाल शिमला मिरची), गोड पिझ्झा यांचा समावेश आहे.
हे पिझ्झा कापण्याचा ऑप्शन युजर्सना मिळेल. यानंतर युजर्सना एका खास प्रोग्रामिंग अंतर्गत स्टार्सदेखील मिळतील, जे ते शेअरही करू शकतात. स्लाइस जितकी अचूक असेल, तितके जास्त स्टार्स मिळणार आहेत.
संयुक्त राष्ट्रांची एज्युकेशन सायन्स अँड कल्चरल ऑर्गनायझेशन (UNESCO) अर्थात युनेस्कोच्या मते ही पिजाइउलो ही निओपोलिटन कला म्हणजे स्वयंपाक करण्याच्या पद्धतीचा अभ्यास आहे. त्यात पीठ तयार करणं आणि लाकडी तंदूरमध्ये शिजवण्याशी संबंधित चार वेगवेगळ्या टप्प्यांचा समावेश आहे. या चळवळीचा उगम कॅम्पानिया प्रदेशाची राजधानी नेपल्स येथे झाला.
इजिप्तपासून रोमपर्यंतच्या प्राचीन संस्कृतींनी शतकानुशतकं टॉपिंगसह फ्लॅट ब्रेड वापरला आहे. पण नेपल्स हे नैर्ऋत्य इटालियन शहर 1700 च्या उत्तरार्धापासून पिझ्झाचं (टोमॅटो आणि चीज असलेले पीठ) जन्मस्थान म्हणून ओळखलं जातं. पिझ्झा बनवण्याच्या पद्धतीत काळानुसार आतापर्यंत अनेक बदल झालेले पाहायला मिळतात.
गुगलकडून आज जगभरातली सर्वांत लोकप्रिय डिश असलेल्या पिझ्झाला डूडलवर स्थान देऊन पिझ्झाचे शौकीन असणाऱ्यांना एक प्रकारे भेटच देण्यात आली आहे. गुगल आज डूडलद्वारे पिझ्झा डे सेलिब्रेट करत आहे. त्या पार्श्वभूमीवरच त्यांनी आपल्या डूडलवर पिझ्झाला स्थान दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.