मुंबई, 1 एप्रिल : नवं आर्थिक वर्ष (Financial Year) आजपासून (1 एप्रिल 2022) सुरू झालं आहे. या नव्या वर्षात बॅंकिंग, तसंच काही आर्थिक बाबींच्या नियमांमध्ये बदल होत आहे. हे बदल 1 एप्रिलपासून लागू झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून इंधन, एलपीजी, खाद्य तेल आदींच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel) आणि गॅस सिलिंडरच्या (Gas) दरात वाढ झाल्यानं देशातले नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यात 1 एप्रिलपासून रोजच्या वापरातल्या अन्य काही वस्तूदेखील महाग होत आहेत. यामध्ये कार, रेफ्रिजरेटर, प्रीमियम हेडफोन्स, वायरलेस इयरबड्स या वस्तूंचा समावेश आहे. दुसरीकडे, 1 एप्रिलपासून स्मार्टफोन, स्मार्टवॉच आणि फिटनेस बॅंडच्या किमती कमी होणार आहेत. ग्राहकांना महागाईचा चटका नक्कीच सहन करावा लागणार आहे. `दैनिक भास्कर`ने याविषयीचं वृत्त दिलं आहे.
आजपासून (1 एप्रिल) रोजच्या वापरातल्या काही वस्तू महागणार आहेत, तर काही वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत. या वस्तूंवरचे टॅक्सेस आणि कस्टम ड्युटी अर्थात सीमा शुल्कात बदल करण्यात आले आहेत. या बदलाची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ( Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी 2022-23 चं बजेट सादर करताना केली होती.
इंधन दरवाढीमुळे मुंबईतील प्रवास महागला, Uber कडून भाडेवाढीची घोषणा
1 एप्रिलपासून इयरबड्सच्या (Earbuds) किमतीत वाढ होणार आहे. सरकारने इयरबड्सच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या पार्ट्सच्या आयात शुल्कात (Import Duty) वाढ केली आहे. अशा स्थितीत आजपासून इयरबड्सचा उत्पादन खर्च वाढू शकतो. उत्पादन खर्च वाढल्याने वायरलेस इयरबड्स, नेकबॅंडच्या किमतीतही वाढ होणार आहे.
भारतीय बाजारपेठेत प्रीमियम हेडफोनच्या (Premium Headphone) किमती तुलनेनं जास्त आहेत. त्यातच सरकारने या हेडफोनच्या आयात शुल्कावर 20 टक्क्यांहून अधिक शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे इंपोर्टेड प्रीमियम हेडफोनसाठी युझर्सना जास्त किंमत मोजावी लागणार आहे.
कार (Car) खरेदी पुन्हा एकदा महागणार आहे. टाटा, बीएमडब्ल्यू (BMW), टोयोटा, मर्सिडिज बेंझ आणि ऑडी यांसारख्या कंपन्यांनी कारच्या किमतीत वाढ करत असल्याची घोषणा केलेली आहे. `कच्च्या मालाच्या किमती वाढल्यानं आमच्यावरचा बोजा वाढत आहे. या कारणास्तव आम्हाला कारच्या किमती 4 टक्क्यांपर्यंत वाढवाव्या लागत आहेत,` असं या कंपन्यांचं म्हणणं आहे. इनपुट कॉस्टमुळे अनेक ऑटोमोबाइल कंपन्यांनी या वर्षी जानेवारीमध्ये कारच्या किमती वाढवल्या होत्या.
सध्या उन्हाळा सुरू आहे. या काळात रेफ्रिजरेटर (Refrigerator) ही अत्यावश्यक वस्तू आहे; पण आजपासून फ्रीजखरेदी महागणार आहे. सरकारने फ्रीजमध्ये वापरल्या जाणाऱ्या कॉम्प्रेसर आणि अन्य पार्ट्सवरचं आयात शुल्क वाढवण्याबाबत घोषणा केली होती. हा बदल आजपासून लागू होत आहे. त्यामुळे फ्रीजच्या किमती वाढणार हे आता जवळपास नक्की आहे.
एकीकडे या वस्तूंच्या किमती वाढत असताना दुसरीकडे फिटनेस बॅंड, स्मार्टफोन आणि स्मार्टवॉचेस आजपासून स्वस्त होत आहेत. फिटनेस बॅंडच्या किमतीत कपात होण्याची शक्यता आहे. फिटनेस बॅंड (Fitness Band) हा स्मार्टवॉच श्रेणीचा एक भाग आहे. 31 मार्च 2023 पर्यंत फिटनेस बॅंड उत्पादक कंपन्यांना कस्टम ड्युटीमध्ये सूट मिळणार आहे. सरकारने 31 मार्च 2023 पर्यंत स्मार्टवॉच (Smartwatch) उत्पादक कंपन्यांना कस्टम ड्युटीत सूट देण्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत आजपासून देशांतर्गत प्लांटमध्ये उत्पादित होणाऱ्या स्मार्टवॉचेसच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे.
आजपासून मोबाइल फोनच्या चार्जरच्या ट्रान्सफॉर्मरचे पार्ट्स, मोबाइल कॅमेरा मॉड्युलच्या कॅमेरा लेन्स आणि इतर अॅक्सेसरीजवर कस्टम ड्युटीत 5 ते 12.5 टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आली आहे. यामुळे स्मार्टफोन (Smartphone) निर्मितीचा खर्च कमी होणार आहे. उत्पादन खर्च कमी झाल्यास कंपन्या स्मार्टफोनच्या किमती कमी करू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Smartphone, Tech news