नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी : देशभरातील हायवेवरून वाहन चालवणाऱ्या चालकांना गाडीवर फास्टॅग (
FASTag) स्टिकर लावणं 15 फेब्रुवारी 2021 पासून बंधनकारक करण्यात आलं आहे. 15 फेब्रुवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून हा नियम लागू होणार आहे. हायवेवरील टोल प्लाझामध्ये स्वतंत्र फास्टॅग लेन असेल जे वाहन फास्टॅग स्टिकर न लावता किंवा अवैध स्टिकर वाहनावर लावून त्या लेनमधून जाईल त्याला दुप्पट टोल भरावा लागेल. हा नियम एम (M) आणि एन (N) कॅटेगरीतील वाहनांना लागू आहे, असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि हायवे मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केलं आहे.
FASTag काय आहे आणि ते किती काळ वैध आहे?
तुमच्या कारच्या विंडशील्डला आतल्या बाजूने हे फास्टॅग स्टिकर लावलेला असतो. या स्टिकरवर रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) बारकोड छापलेला असतो. यामध्ये तुमच्या वाहनाच्या सरकारी नोंदणीसंबंधी सगळी माहिती साठवलेली असते. फास्टॅग स्टिकर घेतल्याच्या तारखेपासून पाच वर्षांपर्यंत ते वैध असतं.
हे काम कसं करतं?
हायवेवरील टोल प्लाझामधल्या फास्टॅग लेनमध्ये फास्टॅग रीडर्स बसवलेले असतील. तुम्ही त्या लेनमधून वाहन घेऊन जाताना हा रीडर तुमच्या वाहनावरील स्टिकर स्कॅन करेल आणि त्यानुसार तुमच्या बँक खात्यातून तुमच्या टोलची रक्कम वजा केली जाईल. यामुळे टोल प्लाझावर रांगांमध्ये थांबणं, तिथल्या माणसांशी संभाषण करणं तसंच रोख पैसे देणं या सगळ्या गोष्टी होणार नाहीत.
फास्टॅग खरेदीसाठी कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत?
फास्टॅग स्टिकर खरेदीसाठी वाहन चालकाकडे वाहनाच्या नोंदणीची कागदपत्रं आणि बंधनकारक KYC प्रक्रियेच्या पूर्ततेसाठी स्वत: ची ओळख पटवणारी कागदपत्रं असणं गरजेचं आहे. जर तुमचं खातं असलेल्या बँकेने फास्टॅग सेवा दिली असेल तिथून तुम्ही स्टिकर घेतलंत, तर तुम्हाला फक्त RC रिपोर्ट लागेल. जर तुम्ही एअरटेल किंवा पेटीएममधून अर्ज करत असाल तरीही तुम्हाला केवळ RC द्यावी लागेल.
याचे फायदे कोणते?
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि हायवे मंत्री नितीन गडकरींनी सांगितल्याप्रमाणे या पुढे प्रवाशांना टोल प्लाझावर रोख टोल भरावा लागणार नाही आणि टोलवरच्या लांबलचक रांगांमध्ये थांबावं लागणा नाही. या ऑटोमॅटिक टोल यंत्रणेमुळे आपोआप वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे.
फास्टॅग कुठं मिळेल?
तुम्हाला फास्टॅग घरपोच देण्यासाठी सरकारनी अनेक बँका, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मशी सहकार्य करार केला आहे. सध्या HDFC Bank, ICICI Bank, State Bank of India, Kotak Bank, Axis Bank, Bank of Baroda या बँकांमध्ये फास्टॅग मिळू शकतो. नुकतंच गूगल पेने ICICI Bank शी करार केल्यामुळे अर्जदार Google Pay च्या माध्यमातून फास्टॅग शुल्क भरू शकतात.
Amazon, PayTM, Airtel Payment App इथंही फास्टॅग उपलब्ध आहे. त्याचबरोबर देशातील सर्व टोल प्लाझांच्या अलीकडे फास्टॅगची विक्री करण्याची सोय उपलब्ध असेल. त्यामुळे तुम्ही फास्टॅग करायला विसरलात तर घाबरायची गरज नाही. तुम्ही टोल प्लाझाच्या अलीकडेही ते खरेदी करू शकता.
FASTag मधील शिल्लक रक्कम कशी तपासायची आणि रिचार्ज कसं करायचं?
फास्टॅग घेतलेल्या बँकेचा ई-कॉमर्स पार्टनर तुमच्यासाठी एक फास्टॅग वॉलेट तयार करेल त्यात तुम्ही पैसे भरायचे आहेत. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने बँकेकडून फास्टॅग खरेदी केलं असेल तर थेट बँक खात्यातून टोलची रक्कम वजा केली जाईल. त्यामुळे त्या बँक खात्यात शिल्लक राहील हे तुम्हाला बघायला हवं. मोबाईल पेमेंट्स बँका तुम्हाला debit card, credit card, UPI व इतर पेमेंट पर्यायांच्या माध्यमातून फास्टॅग रिचार्ज करण्याची सोय उपलब्ध करून देणार आहेत. म्हणजे जर तुम्ही एअरटेलकडून फास्टॅग घेतलं तर तुम्ही एअरटेल पेमेंट्समधून ते रिचार्ज करू शकाल.
FASTag ची सक्ती कुणाला लागू नाही?
ज्या व्यक्तींना टोल भरणं बंधनकारक नाही, त्यांना FASTag ची गरज नाही. यात न्यायमूर्ती, आमदार, खासदार, मंत्री, उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकारी, सैन्यदलांतील उच्चपदस्थ अधिकारी, अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारी या सर्वांना फास्टॅग लागू नसेल.
या सर्व कारनामुले आनि माहितीनुसार, FASTag स्टीकर नेशनल हाईवेवरून प्रवास करणार गाडयावर स्टीकर लावणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीने याचे लाभ घ्यावे आणि नियम पालन करावे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.