नवी दिल्ली, 29 मे : सोशल मीडिया आल्यानंतर लोकांना आपली मतं मांडायला, आपल्या समस्यांना वाचा फोडायला हक्काचं साधन मिळालं. सिटीझन जर्नालिझम (Citizen Journalism) अर्थात नागरी पत्रकारिता हा आतापर्यंत मर्यादित स्वरूपात असलेला विषय त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला, वापरता येऊ लागला, पण असं असलं तरीही यातल्या माहितीची सत्यता पडताळणारी यंत्रणा प्रभावी नसल्याने अनेक प्रकारच्या अफवा, चुकीची, दिशाभूल करणारी आणि खोटी माहिती या माध्यमांवरून प्रसारित केली जाते. अनेक लोक या माहितीची शहानिशा न करताच ती पुढे पाठवतात. त्यामुळे अशी माहिती व्हायरल होते. त्यातून कधी लोकांच्या भावना दुखावतात, तर कधी हिंसाचार होतो, तर कधी लोक उगाचच पॅनिक होतात, काळजी करत राहतात. याच पार्श्वभूमीवर, चुकीची माहिती पसरवली जाऊ नये म्हणून आता अखेर सोशल मीडियाकडून काही पावलं उचलली गेली आहेत. चुकीची माहिती असलेली ट्विट्स फ्लॅग करण्याची सुविधा अलीकडेच ट्विटरने दिली होती. आता फेसबुकनेही (Facebook) माहितीची सत्यता दर्शवण्यासाठी एक उपक्रम हाती घेतला आहे. कोविड-19 आणि त्यावरील लशी, हवामानबदल, निवडणुका आणि अन्य अनेक विषयांबद्दल चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती फेसबुकवर शेअर केली गेली असेल, तर ती कमीत कमी लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी फेसबुकने एका तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. फेसबुककडून ब्लॉगमध्ये याबद्दल माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे फेसबुकचे युजर्स एखाद्या पेजवरची किंवा प्रोफाइलवरची पोस्ट वाचत असतील, तर त्याबद्दल फॅक्ट-चेकरचं (Fact Checker) काय मत आहे, हे त्यात दिसणार आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने त्याबद्दलची अधिक माहिती दिली आहे.
(वाचा - Paytm मधून चुकून दुसऱ्यालाच पैसे झाले ट्रान्सफर? जाणून घ्या कसे मिळवाल परत )
फॅक्ट चेकिंग (Fact Checking) अर्थात शेअर केल्या जाणाऱ्या माहितीची सत्यता पडताळण्यासाठी फेसबुकने जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संस्थांशी भागीदारी केली आहे. भारतात एएफपी-हब, बूम, फॅक्ट क्रेसेंडो, फॅक्टली, इंडिया टुडे फॅक्ट चेक, न्यूजचेकर, न्यूजमोबाइल फॅक्टचेकर, द क्विंट आणि विश्वास डॉट न्यूज या नऊ संस्था फेसबुकसाठी फॅक्टचेकर म्हणून काम करतील. अमेरिकेतही अशाच 10 वेगवेगळ्या संस्था फॅक्टचेकर म्हणून काम करणार आहेत. हे फॅक्ट-चेकर्स फेसबुकवर शेअर केल्या जाणाऱ्या माहितीची सत्यता पडताळून खोटी, चुकीची माहिती शेअर करणारी पेजेस त्यांच्याकडून फ्लॅग (Flag) केली (दर्शवली) जातील. जेव्हा एखादा युजर संबंधित पेजवर जाईल, तेव्हा त्याला ‘हे पेज वारंवार चुकीची माहिती शेअर करत आहे,’ (This Page has repeatedly shared false information) असा संदेश मिळेल. त्यावर क्लिक केल्यानंतर युजर्सना अधिक माहिती मिळेल. तसंच, त्या पेजवरच्या कोणत्या पोस्ट्स फ्लॅग करण्यात आल्या होत्या, ही यंत्रणा कशी आहे, याबद्दलची माहिती युजरला (User) मिळेल. त्यामुळे त्या पेजवरची माहिती वाचायची की नाही, ते पेज फॉलो करायचं की नाही, याचा निर्णय युजर सद्सद्विवेकबुद्धीने घेऊ शकेल.
(वाचा - खरंच सरकार तुमचे WhatsApp कॉल, मेसेज चेक करणार?वाचा त्या व्हायरल मेसेजमागचं सत्य )
खोट्या माहितीला आळा घालण्यासाठी फेसबुकने आणखी एक पाऊल उचललं आहे. खोटी माहिती शेअर करणाऱ्या आणि त्याबद्दल फॅक्ट-चेकरकडून फ्लॅग करण्यात आलेल्या अकाउंटवरून केल्या जाणाऱ्या पोस्ट्सचं न्यूज फीडमधलं डिस्ट्रिब्युशन कमी केलं जाणार आहे. म्हणजेच अशा पोस्ट्स न्यूजफीडमध्ये जास्त लोकांना दिसणारच नाहीत. पूर्वी अशी कारवाई पेजेस, ग्रुप्स, इन्स्टाग्राम अकाउंट्स आणि डोमेन्सवर केली जायची. आता पर्सनल फेसबुक अकाउंट्सवरही अशी कारवाई केली जाणार आहे. या सगळ्या उपायांमुळे फेसबुकवरून खोट्या माहितीच्या प्रसाराला काही प्रमाणात आळा बसू शकणार आहे.