मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

धक्कादायक! 53.3 कोटी फेसबुक युझर्सचा डेटा लीक; Facebook चं उत्तर पटणारं नाही कारण...

धक्कादायक! 53.3 कोटी फेसबुक युझर्सचा डेटा लीक; Facebook चं उत्तर पटणारं नाही कारण...

Facebook Representative Image

Facebook Representative Image

Explainer: 533 दशलक्ष फेसबुक युझर्सची माहिती हॅकरच्या एका फोरमवर मोफत उपलब्ध झाली आहे. FB ने यावर त्यांचं म्हणणंही मांडलं आहे. काय आहे हे प्रकरण?

नवी दिल्ली, 5 एप्रिल: बहुतांश जणांच्या रोजच्या जगण्याचा भाग असलेलं फेसबुक (Facebook) पुन्हा एकदा वाईट कारणांसाठी चर्चेत आलं आहे. एका नव्या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे, की 533 दशलक्ष फेसबुक युझर्सची माहिती हॅकरच्या एका फोरमवर मोफत उपलब्ध झाली आहे. हडसन रॉक (Hudson Rock) या सायबरक्राइम इंटेलिजन्स फर्मचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर अॅलॉन गल (Alon Gal) यांनी सर्वप्रथम ही माहिती दिली आणि बिझनेस इन्सायडरने त्याविषयीचं वृत्त सगळ्यात आधी प्रसिद्ध केलं.

गल यांच्या दाव्यानुसार, या खुल्या झालेल्या माहितीमध्ये 106 देशांमधल्या फेसबुक युझर्सच्या वैयक्तिक माहितीचा (Personal Information) समावेश आहे. त्यात भारतातल्या 60 लाख युझर्सच्या माहितीचा समावेश आहे. ती माहिती मोफत उपलब्ध करण्यात आली आहे. अशाच प्रकारचा डेटा जानेवारी 2021मध्येही लीक झाला होता आणि गल यांनीच ते सर्वप्रथम लक्षात आणून दिलं होतं. फेसबुक युझर्सचे फोन नंबर्स, फेसबुक आयडी, पूर्ण नावं, लोकेशन्स, जन्मतारखा, बायोज आणि काही वेळा ई-मेल अॅड्रेस अशी माहिती थोडेफार पैसे घेऊन हॅकर्सकडून त्या वेळी विकली जात होती. बिझनेस इन्सायडर टीम आणि गल यांनी यांनी लीक झालेला डेटा आणि अनेक ओळखीच्या फेसबुक युझर्सचा डेटा तपासून पाहिला, तेव्हा यावर शिक्कामोर्तब झालं. हे सगळं प्रकरण काय आहे?

WhatsApp ओपन न करताच समजेल कोण ऑनलाईन आहे; जाणून घ्या ही सोपी ट्रिक

दावा काय आहे?

अॅलॉन गल यांनी काही ट्विट्स करून असा दावा केला आहे, की 533 दशलक्ष फेसबुक युझर्सचा (Facebook Users) डेटा लीक (Data Leaked) करून मोफत उपलब्ध करण्यात आला आहे. 'तुम्ही फेसबुकवर असाल, तर तुमचाही डेटा यात असण्याची शक्यता आहे,' असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

व्हाइस मदरबोर्ड या टेलिग्राम बॉटच्या म्हणण्यानुसार, युझरनेम, ई-मेल आयडी किंवा फोन नंबर अशा ज्ञात क्रेडेन्शियल्सचा वापर करून युझरची माहिती हॅकर्सकडून शोधली जाते.

जुन्या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 'अमेरिका, कॅनडा, यूके, ऑस्ट्रेलिया आदी देशांतल्या फेसबुक युझर्सचा डेटा लीक झाला आहे. एक माहिती साधारण 20 डॉलरला (म्हणजे 1500 रुपये) उपलब्ध होती. 10 हजार प्रकारची माहिती पाच हजार डॉलर्सला उपलब्ध होती.'

गल यांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार, हॅकर फोरमवर अमेरिकेतल्या 32 दशलक्ष, ब्रिटनमधल्या 11 दशलक्ष आणि भारतातल्या 60 लाख रेकॉर्ड्सची माहिती आहे.

फेसबुकचं म्हणणं काय?

जानेवारीत घडलेल्या प्रकाराबद्दल, तसंच आत्ताच घडलेल्या प्रकाराबद्दलही फेसबुकने 'तो डेटा जुनाच आहे,' असं उत्तर दिलं आहे. 'ऑगस्ट 2019मध्ये सुरक्षिततेमध्ये आलेल्या अडचणीमुळे तो डेटा लीक झाला होता आणि त्यावर उपाययोजना केली आहे,' असं स्पष्टीकरण फेसबुककडून देण्यात आलं आहे; मात्र कंपनीकडून सुरक्षिततेसाठी काय करण्यात आलं आहे, याची माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

'एवढी माहिती लीक होणं म्हणजे खासगीपणावर मोठाच परिणाम आहे. तुमच्या माहितीकडे एवढं दुर्लक्ष केल्याची कबुली फेसबुककडून दिली गेल्याचं मी तरी अजून पाहिलं नाही,'असं गल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

यातून काय धडा घ्यायचा?

हे प्रकरण 2019मधलं असल्याचा दावा फेसबुककडून करण्यात आला असला, तरी त्यांच्याकडून ही बाब स्वीकारण्यात आलेली नाही, की युझर्सचा डेटा कायमसाठी तोच असू शकतो. कंपनीकडून त्यांच्या युझर्सना याबद्दल कोणतीही कल्पना दिली गेलेली नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युझर्सची पर्सनल माहिती अशी लीक झाली असेल, तर त्यांच्यावर सोफिस्टिकेटेड फिशिंग अॅटॅक होऊ शकतो. तो अॅटॅक झाला, तर फोटोज, बँकिंग डिटेल्स वगैरे सगळी माहिती खुली होऊ शकते.

दरम्यान, अनेक क्राउडफंडेड वेबसाइट्स (Crowdfunded Websites) युझर्सना त्यांचा डेटा लीक झाला आहे का, हे तपासण्यासाठी मदत करतात. HaveIBeenPwned.com ही त्यापैकीच एक वेबसाइट. ट्रॉय हंट या सिक्युरिटी अॅनालिस्टकडून तयार करण्यात आलेला हा डेटाबेस आहे. तिथे व्हिजिटर्सनी आपला ई-मेल अॅड्रेस दिला, की तिथल्या डेटाबेसमधल्या 10 अब्ज अकाउंट्समधल्या माहितीशी तो ताडून पाहिला जातो. पूर्वी ज्या ज्या वेळी डेटा चोरी झालेली आहे, त्या वेळी कोणत्या अकाउंट्सची माहिती चोरण्यात आली होती, याचा तो डेटाबेस आहे.

First published:

Tags: Facebook, Technology