नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : काही दशकांपूर्वी केवळ एक संकल्पना वाटणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्या आता बऱ्यापैकी सर्वसामान्य झाल्या आहेत. पेट्रोल-डिझेलऐवजी विजेवर चालणाऱ्या या गाड्या केवळ आपला खर्चच वाचवत नाहीत, तर पर्यावरण संरक्षणासही मदत करतात; पण याच गाड्यांच्या मदतीने तुमच्या घराला वीजपुरवठा (Electric cars could power house) करता येईल असं सांगितलं तर? ज्या गाड्या आपण वीजेच्या मदतीने चार्ज करतो, त्याच आपल्या घराला कशा वीजपुरवठा करतील, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, पण हे शक्य आहे. इलेक्ट्रिक कारची बॅटरी घराला जोडून, त्यातली वीज पुन्हा ग्रिडमध्ये पाठवण्याची टेक्नॉलॉजी (Electricity from car back to grid) जपानने तयार केली होती. आता याचाच मोठ्या स्तरावर वापर करण्याचा विचार ब्रिटन करत आहे. 'theconversation.com'ने याबद्दलचा लेख प्रसिद्ध केला आहे.
इलेक्ट्रिक गाड्या पर्यावरणपूरक आहेत हे आपण ऐकलं आहे. पण या गाड्यांना किंवा आपल्या घरात पुरवल्या जाणाऱ्या वीजनिर्मितीसाठी अजूनही कोळसाच जाळला जातो. त्यामुळे पर्यावरणाचं व्हायचं ते नुकसान होतंच. मग यावर उपाय काय? तर सौरऊर्जा किंवा पवनऊर्जा अशा हरित ऊर्जास्रोतांपासून वीज तयार करून ती साठवून ठेवणं आणि जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा ग्रिडमध्ये (Saving electricity in batteries and sending back to grid) तिचा पुरवठा करणं. ही योजना ऐकायला चांगली वाटत असली, तरी एवढी वीज साठवून कुठे ठेवायची हा एक मोठा प्रश्न आहे. याच प्रश्नाचं उत्तर सध्या जगभरातल्या रस्त्यांवर धावतं आहे, ते म्हणजे – इलेक्ट्रिक गाड्या!
ब्रिटनमधल्या 27 दशलक्ष कुटुंबांपैकी एक टक्का नागरिकांकडे इलेक्ट्रिक कार्स आहेत. साधारणपणे एका इलेक्ट्रिक कारमध्ये 60 किलोवॉट अवर (kWh) एवढी ऊर्जा साठवता येते. म्हणजेच, ब्रिटनमधल्या तीन लाख इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये मिळून तब्बल 18 गिगावॉट अवर (GWh) एवढी ऊर्जा साठवता येईल. गमतीची बाब म्हणजे, स्नोडोनियामध्ये असणाऱ्या डायनॉर्विग पम्प्ड स्टोरेज प्लांट या ब्रिटनमधल्या सर्वात मोठ्या वीज साठवण (UK’s largest electricity storage facility) केंद्रात केवळ 9 गिगावॉट अवर ऊर्जा साठवता येते. यावरूनच इलेक्ट्रिक गाड्यांमधील वीज किती जास्त प्रमाणात साठवता येते, याचा अंदाज येईल.
ब्रिटनमधल्या इलेक्ट्रिक गाड्यांचा खप पाहता 2030 सालापर्यंत ब्रिटनच्या रस्त्यांवर सुमारे 11 दशलक्ष इलेक्ट्रिक गाड्या असणार आहेत. यातल्या निम्म्या गाड्यांनी जरी आपल्या बॅटरीमधली न वापरलेली वीज पुन्हा ग्रिडमध्ये सोडली, तर सुमारे 5.5 दशलक्ष घरांना त्यामधून वीजपुरवठा करता येईल. विशेष म्हणजे ही सर्व वीज हरित असेल आणि यामुळे पर्यावरणाला कोणताही धोका निर्माण होणार नाही. अर्थात, ही योजना (Electricity from EV back to grid) कागदावर चांगली वाटत असली, तरी ती प्रत्यक्षात आणण्यासाठी बऱ्याच गोष्टी लक्षात घ्याव्या लागणार आहेत.
सर्वांत आधी यासाठीच्या तांत्रिक बाबी पाहणं गरजेचं आहे. इलेक्ट्रिक गाड्यांमधून वीज उलट ग्रिडमध्ये पाठवण्यासाठी गाडीच्या बॅटरीमध्ये (EV Batteries) आणि चार्जिंग पॉइंटमध्ये तशी सुविधा निर्माण करायला हवी. 2011 साली जपानच्या फुकुशिमा भागात अणुऊर्जा प्रकल्पात झालेल्या मोठ्या अपघातानंतर निर्माण झालेल्या वीज टंचाईनंतर (Fukushima Disaster) अशा प्रकारच्या सिस्टीमचा शोध लावला गेला. आता बहुतांश इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये अशी सुविधा देण्यात येते, पण फक्त गाड्यांमध्ये बदल करणं पुरेसं नाही.
घरांमध्येही गाड्यांच्या बॅटरीपासून आलेली ऊर्जा स्वीकारण्यासाठी विशिष्ट किट बसवावं लागणार आहे. तसंच, सगळीकडे समान चार्जिंग किट असणं किंवा आपण बसवत असलेलं किट कोणत्याही कनेक्टरला जोडलं जाईल अशी सुविधा असणं गरजेचं आहे. तांत्रिक बाबींमधला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्थानिक वीजपुरवठा विभागाची तयारी. कित्येक वीजपुरवठा विभागांमध्ये असणाऱ्या ग्रिडमध्ये उलट ऊर्जा घेऊन ती साठवण्याची क्षमता नसते. त्या दृष्टीनेही आवश्यक ते बदल करून घेणं गरजेचं आहे.
सर्व घरांमध्ये गाडी ते ग्रिड (V2G) चार्जर सेटअप उभारणं, गाड्यांमध्ये तसे बदल करून घेणं, वीज साठवण केंद्रांमध्ये त्याप्रकारे बदल करून घेणं यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आवश्यक आहे. तसंच, या सगळ्यात गाड्यांच्या बॅटरीची क्षमता कमी होण्याची भीती आहे, चार्जिंगचा वेळ कमी करण्याचं आव्हानही आहे. ब्रिटनमधलं इलेक्ट्रिसिटी आणि गॅस रेग्युलेटर ऑफजेम हे सगळं लक्षात घेऊन यात कोट्यवधी पौंड्सची गुंतवणूक करण्यास तयार आहे.
तांत्रिक अडथळे दूर केल्यानंतर मुद्दा राहतो तो लोकसहभागाचा. कारण मोठ्या प्रमाणात खर्च करून सगळा सेटअप उभारला आणि नागरिकांनी या योजनेकडे पाठ फिरवली, तर सगळं मुसळ केरात! त्यामुळेच इस्टर्न न्यू एनर्जी (Eastern New Energy) ही संस्था व्हेइकल-टू-ग्रिड (Vehicle to Grid) या संकल्पनेबाबत लोकांचं काय मत आहे याबाबत संशोधन करत आहे. ते याबाबत इलेक्ट्रिक गाडी वापरणाऱ्यांना जागरूकही करत आहेत. तसंच, बऱ्याच वीजनिर्मिती आणि वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्यांही या टेक्नॉलॉजीचा व्यावसायिकरित्या कसा वापर करता येईल याबाबत ट्रायल्स घेत आहेत.
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्या नागरिकांना याचा खरं तर दुहेरी फायदा होणार आहे. ब्रिटनमध्ये पेट्रोल किंवा डिझेलची किंमत पाहता, साधी गाडी वापरणाऱ्या नागरिकांचे इंधनावरच वर्षाला सरासरी दीड हजार पौंड्स खर्च होतात. इलेक्ट्रिक गाड्यांचा इंधनासाठीचा खर्च हा वर्षाला केवळ 500 पौंड्स एवढा होतो. म्हणजेच, इलेक्ट्रिक गाड्या वापरून हे नागरिक आधीच सुमारे एक हजार पौंड्सची बचत करतात. त्यालाच जोड म्हणून ही योजना अंमलात आणली गेली, तर आपल्या गाड्यांमधली राहिलेली वीज पुन्हा ग्रिडमध्ये विकून ते पैसेही कमवू शकतात. एकूण गणित केलं, तर ग्रिडला पुन्हा वीज विकून एक व्यक्ती वर्षाकाठी साधारणपणे 725 पौंड्स आरामात कमावू शकेल.
बऱ्यापैकी इलेक्ट्रिक कारमालकांनी यामध्ये सहभाग घेतला, तर ब्रिटन तब्बल दहा मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पांएवढी वीज निर्माण करू शकेल आणि त्यातून वाचलेले पैसे हे आणखी हरित ऊर्जा स्रोत तयार करण्यासाठी गुंतवू शकेल. अर्थात यासाठी नागरिकांचा, वीजनिर्मिती कंपन्यांचा आणि अर्थातच इलेक्ट्रिक गाड्या बनवणाऱ्या कंपन्यांचा समान सहभाग अपेक्षित आहे. यावर आणखी बरीच चर्चा आणि विचार विनिमय होणं गरजेचं असलं, तरी नजीकच्या भविष्यात ऊर्जेचा एक हरित स्रोत म्हणून आपण इलेक्ट्रिक गाड्यांकडे (एका वेगळ्या दृष्टीने) नक्कीच पाहू शकतो.
इलेक्ट्रिक गाड्यांमधली न वापरलेली वीज चार्जिंग पॉइंटमधून पुन्हा ग्रिडमध्ये सोडणे, एवढ्या साध्या संकल्पनेवर ही योजना बनली आहे. मात्र याचा इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांना, वीज कंपन्यांना, सामान्य नागरिकांना आणि पर्यावरणालाही मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Electric vehicles