Home /News /technology /

Facebook वर बिझनेस करणाऱ्यांना सावध होण्याची गरज, घडताहेत अनेक Cyber Frauds; वाचा हा किस्सा

Facebook वर बिझनेस करणाऱ्यांना सावध होण्याची गरज, घडताहेत अनेक Cyber Frauds; वाचा हा किस्सा

सुविधांचा गैरवापर करून मोठ्या पातळीवर सायबर घोटाळे केले जात आहेत. हे घोटाळे नेमके कसे असतात, हे जाणून घ्यायचं असेल तर ही बातमी वाचा.

हरियाणा, 27 ऑगस्ट:  फेसबुक (Facebook) हे आता केवळ सोशल मीडिया अॅप्लिकेशन (Social Media Application) नाही. अनेक जण तिथे आपल्या कामाची प्रसिद्धी करतात. फेसबुकवर आपली प्रॉडक्ट्स विकता येतात आणि ग्राहक थेट संपर्क साधून ती खरेदी करू शकतात. फेसबुकच्या या सुविधा सर्वसामान्य युझर्ससाठी खूप उपयुक्त आहेत; मात्र या सुविधांचा गैरवापर करून मोठ्या पातळीवर सायबर घोटाळे केले जात आहेत. हे घोटाळे नेमके कसे असतात, हे जाणून घ्यायचं असेल, तर हरियाणातल्या (Haryana) फतेहाबादमधल्या निर्मल नावाच्या एका व्यक्तीबाबत नेमकं काय घडलं होतं, ते जाणून घ्यायला हवं. असं काही घडू शकतं, अशी कोणी कल्पनाही करू शकत नाही. निर्मल नावाच्या व्यक्तीचं पाइप्स, वॉटर टँक्स आदींच्या विक्रीचं म्हणजेच सॅनिटरी वेअरचं शोरूम आहे. आपल्या उद्योगाची व्याप्ती वाढवण्यासाठी निर्मल यांनी फेसबुक मार्केटप्लेसवरही (Facebook Marketplace) आपल्या उत्पादनांची यादी प्रसिद्ध केली आहे. फेसबुकवरून माहिती घेऊन अनेक जण त्यांच्याशी संपर्क साधतात आणि प्रत्यक्ष येऊन सामानाची खरेदी करतात. लोकांच्या मागणीनुसार निर्मल सामानाची होम डिलिव्हरीही करतात. एके दिवशी निर्मल यांना एक फोन आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने राजेश असं आपलं नाव असल्याचं सांगितलं आणि हिस्सारमधल्या आर्मी कँटमधून (Army Cantt) बोलत असल्याचं सांगितलं. निर्मल यांचं दुकान फतेहाबादमध्ये असून, राजेश जिथून बोलत होता, ते हिस्सार शहर तिथून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर आहे. फेसबुकवर दिसत असलेल्या पाण्याच्या टाक्या (Water Tanks) सध्या दुकानात उपलब्ध आहेत का, अशी विचारणा राजेशने केली. त्यावर निर्मल यांनी सांगितलं, की टाक्या उपलब्ध आहेत; मात्र अंतर लांब असल्यामुळे प्रवासखर्च जास्त येतो आणि त्यामुळे हिस्सारमध्ये होम डिलिव्हरी होणार नाही. त्यावर राजेशने निर्मल यांना सांगितलं, की आर्मी कँटमध्ये 2000 लिटर क्षमतेच्या 10 वॉटर टँक्सची गरज आहे. डिलिव्हरी चार्जेस वेगळे दिले जातील. त्याबद्दल काही काळजी करू नये. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून आपल्याला पुन्हा कळवतो, असंही राजेशने सांगितलं.

Yahoo भारतातली ही सेवा बंद करणार, पाहा तुमच्या अकाऊंटचं काय होणार?

त्यानंतर पुन्हा राजेशने तासाभराने फोन केला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खरेदीला परवानगी दिल्याचं सांगितलं. डिलिव्हरी चार्जेसही दिले जाणार असल्याचं त्याने सांगितलं. त्यावर निर्मल यांनी राजेशला सांगितलं, की टाक्या इकडून तिकडे नेण्यापेक्षा हिस्सारमध्येच खरेदी करणं जवळ पडेल. त्यावर राजेशने सांगितलं, की हिस्सारमध्ये चौकशी केली असून, तिथे किंमती महाग आहेत. तुमच्याकडे स्वस्त दर असल्याने तुमच्याकडून खरेदी करत आहोत. निर्मल यांना शंका आली असावी, असं राजेशला वाटलं. म्हणून त्याने व्हॉट्सअॅपवर अनेक फोटोज पाठवले. ते हिस्सार आर्मी कँटचे होते. (कदाचित त्याने ते फोटो इंटरनेटवरून डाउनलोड करून पाठवले असावेत.) शिवा. आर्मीकडून 50 टक्के पेमेंट आधीच केलं जाईल, असंही त्याने सांगितलं. उर्वरित 50 टक्के पेमेंट डिलिव्हरी मिळाल्यानंतर केलं जाईल, असंही त्याने सांगितलं. त्यामुळे निर्मल यांचा विश्वास बसला.

Xiaomi Mi Smart Band 6 भारतात लॉन्च, जबरदस्त फिचर्स, किंमतही बजेटमध्ये

 आपण स्वतः आर्मीत कार्यरत असल्याचंही राजेशने सांगितलं होतं. त्याने सांगितलं, की एकूण 20 हजार रुपये किंमतीचे 10 कुपन्स दिले जातील. ही कुपन्स तुमच्या नावाचे असतील आणि ती तुम्हाला गुगल पेवरून (Google Pay) स्कॅन करायचे आहेत. एक कुपन 2 हजार रुपयांचं असेल. एकएक कुपन स्कॅन करत गेल्यावर नवनवी कुपन्स मिळत जातील, असं राजेश निर्मल यांना म्हणाला. निर्मल यांना हे थोडं विचित्र वाटलं.
राजेशने त्यांना पहिलं कुपन पाच रुपयांचं पाठवलं आणि स्कॅन करायला सांगितलं. जेवढ्या रुपयांचं कुपन स्कॅन कराल, त्याच्या दुप्पट रुपये तुम्हाला परत मिळतील, असंही त्याने सांगितलं. निर्मल यांना मिळालेल्या कुपनवर 'आर्मी कँट, हिस्सार' असं लिहिलेलं होतं आणि खाली निर्मल यांचं नावही लिहिलेलं होतं. निर्मल यांनी कुपन स्कॅन करून यूपीआय पिन (UPI Pin) टाकला, तेव्हा त्यांच्या खात्यातून पाच रुपये कापले गेले. त्यानंतर थोड्याच वेळात त्यांच्या खात्यात 10 रुपये जमा झाले. हे कुपन चाचणीसाठी असल्याचं राजेशने सांगितलं आणि 10 रुपये मिळाल्याचं कन्फर्म करायला सांगितलं. निर्मल यांनी ते कन्फर्म केलं. त्यानंतर त्यांना दुसरं कुपन 2000 रुपयांचं पाठवण्यात आलं. ते कुपन स्कॅन केल्यावर त्यांच्या खात्यातून पैसे काढले गेले; मात्र त्यांना परत काही मिळालं नाही. काही वेळ वाट पाहिल्यानंतर राजेशचा त्यांना फोन आला. त्याने सांगितलं, की हे कुपन बनवण्यात एक चूक झाली आहे. त्यामुळे आता दोन हजार रुपयांची 10 कुपन्स स्कॅन केल्यानंतरच एकदम पैसे परत मिळतील. 20 हजार रुपये तुमच्या खात्यातून काढले जातील आणि 40 हजार रुपये तुम्हाला एकदम मिळतील, असं त्याने सांगितलं.

आता आधार कार्ड धारकांना नाही मिळणार या 2 सुविधांचा लाभ; तुमच्यावर काय होणार परिणाम?

 तोपर्यंत निर्मल यांच्या लक्षात आलं होतं, की आपली फसवणूक (Cyber Fraud) होतेय. त्यानंतर निर्मल यांनी तसं राजेशला सांगितलं. त्यानंतर राजेशने त्यांची खात्री पटवण्याचा प्रयत्न केला; मात्र निर्मल यांनी त्याचं काहीही न ऐकता फोन कट केला.
आपल्या दोन हजार रुपयांवर त्यांनी पाणी सोडलं; मात्र ते परत मिळवण्यासाठी त्यांनी पुढची कुपन्स स्कॅन केली असती, तर ते 20 हजार रुपयांच्या खड्ड्यात गेले असते. हे प्रकरण म्हणजे सर्वांसाठीच एक धडा आहे. अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या कोणत्याच लिंक्स स्कॅन न करणं, अशा लिंकवर क्लिक न करणं आणि कायम सावध राहणं ऑनलाइन विश्वात वावरण्यासाठी गरजेचं आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Cyber crime, Facebook

पुढील बातम्या