नवी दिल्ली, 28 एप्रिल : केंद्र सरकारने 1 मेपासून लसीकरणासाठीचा तिसरा टप्पा सुरू करण्याची घोषणा केली आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोरोना लस घेता येणार आहे. लसीकरणासाठीचं रजिस्ट्रेशन आज संध्याकाळी 4 वाजल्यापासून सुरू झालं. परंतु कोविन अॅपवर (CoWIN) रजिस्ट्रेशन सुरू होण्याच्या काही मिनिटांतच कोविन अॅपचा सर्व्हर क्रॅश झाला. कोविन अॅप सर्व्हर डाउन झाल्याची माहिती अनेकांनी सोशल नेटवर्किंग साईट्सवर शेअर केली आहे.
कोरोनाचा कहर सुरू असून, या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान 18 वर्षाहून अधिक वय असलेल्या व्यक्ती कोरोना लस घेऊ शकतात. यासाठीचं रजिस्ट्रेशन सुरू झालं. परंतु हेवी ट्रॅफिकमुळे वेबसाईटमध्ये अनेक समस्या, अडथळे येऊ लागले. आज 28 एप्रिल संध्याकाळी 4 वाजल्यापासून कोविन, आरोग्य सेतू आणि उमंग अॅपवर लसीकरणासाठीचं रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 4 च्या सुमारास 17 कोटी 88 लाख भारतीय आरोग्य सेतू अॅपचा वापर करत होते. आरोग्य सेतू अॅपवर रजिस्ट्रेशन केलं जात असलं, तरी युजर्सला कोविन अॅपवर मूळ रजिस्ट्रेशन करण्यासाठी रिडायरेक्ट केलं जातं. अशात एकाच वेळी लसीकरणाच्या नोंदणीसाठी अनेक लोक सक्रिय राहिल्याने सर्व्हर क्रॅश झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सर्वासाठी लसीकरण सुरू झाल्याने गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 18 ते 44 वयोगटातील लोकांना सर्वात आधी कोविन पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणं आणि लस घेण्यासाठी वेळ घेणं गरजेचं आहे. सुरुवातीला या वयोगटातील लोकांना थेट वॅक्सिन घेण्यासाठी येण्यास परवानगी देण्यात आली नाही.
अनेक राज्यांनी 1 मेपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरण फ्री करण्याची घोषणा केली. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मोफत कोरोना लशीची घोषणा केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.