नवी दिल्ली, 15 जानेवारी : कोरोना काळात लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मोबाईलवर Corona Caller Tune ऐकू येत होती. त्या कॉलर ट्यूनसाठी बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा आवाज होता. पण आता बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही. बिग बींऐवजी आता प्रसिद्ध व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट जसलीन भल्ला (Jasleen Bhalla) यांच्या आवाजात कोरोनाचा नवा संदेश ऐकू येणार आहे.
कोरोना काळात अनेक गोष्टी बदलल्या, पण सर्व लोकांची कॉलर ट्यून मात्र एकसारखी होती. कोणालाही फोन केल्यानंतर भारत सरकारचा मेसेज ऐकू येत होता. आतापर्यंत बिग बींचा आवाज ऐकत होतो, आता कोरोनाचाच संदेश पण, जसलीन भल्ला यांच्या आवाजात ऐकता येईल. व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट जसलीन भल्ला या कोरोना वॅक्सिनशी संबंधीत मेसेज देतील. त्या लोकांना सतर्क राहण्याचा आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचा, तसंच कोरोनापासून वाचण्यासाठी वॅक्सिनेशन करण्याचा संदेश देतील. त्याशिवाय त्या याच संदेशात इतर सावधगिरीबाबतही सूचित करतील.
जसलीन भल्ला यांनी कोरोना काळाच्या सुरुवातीलाही अशाप्रकारच्या कॉलर ट्यूनसाठी आपला आवाज दिला होता. त्यानंतर तो बदलण्यात आला आणि पुन्हा नव्या संदेशासाठी बिग बींचा आवाज देण्यात आला. जुन्या कोरोनाच्या संदेशात जसलीन भल्ला लोकांना कोरोना व्हायरसपासून बचाव, रुग्णांसोबत भेदभाव आणि इतर काही सावधागिरीबाबत माहिती देत होत्या. 'कोरोना व्हायरस या कोविड-19 (Covid 19) से आज पूरा देश लड़ रहा है. मगर, याद रहे हमें बीमारी से लड़ना है, बीमार से नहीं. उनसे भेदभाव न करें.', हा संदेश त्या देत होत्या.
या रेकॉर्डिंगच्या मागे एक मजेशीर किस्साही आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जसलीन यांनी सांगितलं की, या संदेशातील माझा आवाज संपूर्ण देश ऐकेल, याची जराही कल्पना नव्हती. एक दिवस अचानक मला हा मेसेज रेकॉर्ड करण्याचं सांगण्यात आलं. मी हा संपूर्ण मेसेज रेकॉर्ड केला, पण याच्या वापराबाबत, हा मेसेज कसा कुठे वापरला जाणार याबाबत मला काहीच कल्पना नव्हती. त्यानंतर अचानक मला अनेक नातेवाईक, मित्र-मैत्रिणींचे फोन येऊ लागले आणि त्यांनीच माझ्या आवाजातील कॉलर ट्यूनबाबत मला सांगितलं.
व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट होण्याआधी जसलीन भल्ला एका चॅनेलमध्ये स्पोर्ट्स जनर्लिस्ट होत्या. परंतु गेल्या 10 वर्षांपासून त्या पूर्णपणे व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट आहेत. त्यांनी अनेक जाहिरातींना आपला आवाज दिला आहे. यापूर्वी दिल्ली मेट्रो, डोकोमो, हॉर्लिक्स, स्लाईस मँगो ड्रिंकच्या जाहिरातीसाठी त्यांनी आवाज दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.