नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर : पबजी मोबाईल (pubg mobile) आणि पबजी मोबाइल लाइट ही दोन्ही अप आजपासून (30 ऑक्टोबर 2020) भारतात गेम यूजर्सना वापरता येणार नाहीत. कंपनीने फेसबूकवर यासंबंधीची माहिती दिली आहे. चीनी ऍपच्या माध्यमातून भारतातील माहिती गोळा करत असल्याचा संशय भारत सरकारला होता. त्यामुळे महिनाभरापूर्वी अचानकपणेच भारत सरकारने 118 ऍपवर बंदी घातली होती. त्यामध्ये पबजी मोबाइल आणि पबजी मोबाईल लाइट या दोन्ही ऍप प्लॅटफॉर्मचा समावेश होता.
काही दिवसांपूर्वी पबजी मोबाईल कंपनीने लिंक्डइनवर (LinkedIn) नोकरभरतीसंबंधी एक जाहिरात दिली होती. त्यानंतर पबजी मोबाइल कंपनी लवकरच भारतात आपले गेम पुन्हा मोबाइलवर उपलब्ध करून देणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर कंपनीने अधिकृतरित्या स्पष्टीकरण देण्यासाठी पोस्ट शेअर केली आहे. भारतात अजूनही डेस्कटॉपवर पबजी गेम खेळता येतो. कंपनीच्या स्पष्टीकरणामुळे पबजी मोबाईल परतण्यासाठी उत्सुक असलेल्या गेमर्सची मात्र निराशा झाली आहे.
टेन्संट गेम्स (Tencent Games) ही कंपनी या मोबाईल गेमची मालक आहे. त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय, ‘त्यांनी अप बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल कंपनीला खूप दु:ख होत असून पबजी मोबाइल आणि पबजी मोबाईल लाइट या दोन्ही खेळांना भारतीय चाहत्यांनी आम्हाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत.’ ‘यूजरचा डाटा संरक्षित ठेवायला कंपनीने नेहमीच प्राधान्य दिलं आहे. डेटासंबंधी भारतात ज्या काही नियम आणि अटी आहेत त्यांचं आम्ही कायमच पालन केलं आहे. आमच्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व युजरची गेम प्ले माहिती आम्ही पारदर्शकपणेच प्रोसेस केली आहे,’ असं कंपनीने या पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे.
क्राफ्टन गेम युनियनची (Krafton Game Union) सबसिडरी असलेल्या पबजी कॉर्पोरेशन या कंपनीने पबजी मोबाइल गेम विकसित केला आहे. टेन्संट कंपनी या खेळासंबंधीचे सर्व अधिकार पबजी कॉर्पोरेशनला परत करत असल्याचंही या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
कोरोनामुळे (coronavirus) लॉकडाऊन (lockdown) झालं आणि सर्वांनाच घरात राहावं लागलं. यादरम्यान, पबजी मोबाईल आणि पबजी मोबाईल लाइट या कंपन्यांचे गेम खेळण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं होतं. त्यामुळे त्यांचे ग्राहक वेगाने वाढत होते. ग्राहकांची संख्या वाढत असतानाच, या दोन्ही खेळांवर बंदी घालण्यात आली. भारतातील व्हिडिओ आणि मोबाईल गेमचे चाहते आणि प्रोफेशनल गेमर्संना बंदीच्या निर्णयाने धक्का बसला होता. कारण एकूण गेमर्सपैकी 25 टक्के गेमर्स पबजी मोबाइल गेम वापरायचे.
गेल्या आठवड्यात पबजी कॉर्पोरेशनने लिंक्डइनवर एक नोकरभरतीची जाहिरात टाकली होती. त्यात भारतात असोसिएट दर्जाच्या मॅनेजरपदासाठी अर्ज मागवण्यात आले होते. आता या स्पष्टीकरणावरून असं दिसतंय की, ती नोकरी कंपनीच्या भारतातील इतर व्यवसायासाठी होती, पबजी मोबाईलसाठी नव्हती.
(वाचा -
FAU-G चा टीजर पाहून PUBG ला विसराल! मॅपमध्ये दिसणार भारतातील हे ठिकाण)
दरम्यान, पबजीचा भारतीय पर्याय म्हणून FAU-G फौजी हा मोबाइल गेम येणार असल्याचं सांगितलं जातंय. पुढच्या महिन्यात हा गेम अधिकृतपणे लाँच होण्याची शक्यता आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने नुकताच या गेमचा पहिला टिझर पोस्ट केला होता. पण हा गेम कधी लाँच होणार याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.