नवी दिल्ली, 14 डिसेंबर : बदल ही एकमेव शाश्वत गोष्ट आहे, असं म्हटलं जातं. काळाच्या ओघात आणि परिस्थितीची गरज लक्षात घेऊन प्रत्येक क्षेत्रात बदल होतात. ऑटोमोबाईल उद्योगातील तज्ज्ञांच्या मते, ऑटोमोबाईल क्षेत्रात (automobile industry) सध्या मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. वाहनांसाठी लागणारं इंधन हे या बदलांमधील सर्वात मोठं कारण आहे. गेल्या कित्येक शतकांपासून आपण मोठ्या प्रमाणात जीवाश्म इंधनावर (fossil fuels) विसंबून आहोत. आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्टीवर कुठेना कुठे इंधन ही गोष्ट परिणाम करते.
सध्या जीवाश्म इंधनाची इतक्या मोठ्या प्रमाणात गरज आहे की त्याशिवाय भविष्याची कल्पना करणंही कठीण आहे. मात्र, पृथ्वीवरील पर्यावरणीय समतोलाला (environmental balance) झालेली हानी आणि पेट्रोल किंवा डिझेलवर (petrol and diesel) चालणाऱ्या वाहनांमुळे होणारं कार्बन उत्सर्जन (Carbon emissions) पाहता, त्याला पर्याय शोधणं आवश्यक झालं. सध्या इलेक्ट्रिक वाहनं (Electric vehicles) हा सर्वांत प्रमुख पर्याय समोर आला आहे.
जवळजवळ सर्व प्रमुख ऑटोमोबाईल कंपन्यांनी हा बदल मान्य केला असून त्यानुसार त्यांनी आपल्या उत्पादनांमध्ये फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे. पेट्रोल-डिझेलवर चालणारी वाहनं कशी कार्य करतात हे आपल्याला एव्हाना माहिती झालेलं आहे. मात्र, इलेक्ट्रिक वाहनं कशी कार्य करतात? आणि ती वापरण्यासठी आपल्याला त्यांच्याबद्दल काय माहीत असणं आवश्यक आहे? हे दोन मूलभूत प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी देण्यात आली आहेत.
वाचा : या तारखेपासून सुरू होणार Ola S1 आणि S1 Pro ची डिलीव्हरी, CEO नी जबरदस्त VIDEO सह केली घोषणा
इलेक्ट्रिक वाहनं कशी कार्य करतात?
सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, इलेक्ट्रिक वाहनं लिथियम-आयन बॅटरी पॅक (lithium-ion battery pack) किंवा निकेल-मेटल हायड्राइडद्वारे (nickel-metal hydride) चालवली जातात. ज्याप्रमाणं एखादा मोबाईल फोन बॅटरीवर काम करतो, अगदी त्याच प्रमाणं ही वाहनं काम करतात. कारण, अॅपल (Apple) आणि सॅमसंगसारख्या (Samsung) मोठ्या मोबाईल कंपन्या हेच तंत्रज्ञान वापरतात. इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी युनिटमध्ये शेकडो सुटे-सुटे सेल असतात. त्यांच्यापासून चासिच्या आतमध्ये असणारी अखंड बॅटरी तयार केली जाते. या बॅटरी युनिटची क्षमता मोजण्यासाठी किलोवॅट परअवर्स (kWh) या एककाचा वापर करतात. ज्या प्रमाणं पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमध्ये इंटर्नल कॉम्ब्युशन इंजिन (ICE) क्षमतेचा विचार केला जातो अगदी त्याच पद्धतीनं इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बॅटरी क्षमतेचा विचार केला जातो. बॅटरी क्षमता जितकी जास्त असेल तितकी तिची रेंज जास्त असेल.
वाचा : नवी कार घेताय? ‘या’ कंपनीनं जाहीर केल्या धमाकेदार ऑफर्स, घ्या जाणून
या वाहनांचा टिकाऊपणा किती?
आयसीई (ICE) कार पूर्णपणे विकसित असून त्या दीर्घकाळ टिकण्याची हमी असते. इलेक्ट्रिक वाहनं (EV) सध्या संक्रमणाच्या काळात आहेत. त्यामुळे त्यांच्या टिकाऊपणाची तुलना आयसीई वाहनांशी करणं घाईचं ठरेल. चांगली बाब म्हणजे ईव्हीमध्ये पेट्रोल किंवा डिझेलवर चालणाऱ्या इंजिनपेक्षा कमी हलणारे भाग असतात. यामुळे आता फक्त त्यांचा दुरुस्ती खर्च कमी करणं आणि टिकाऊपणा वाढवणं आवश्यक आहे. या सर्व गोष्टी केवळ बॅटरी पॅकच्या क्षमतेवर अवलंबून असतात.
उदाहरणार्थ, टाटा मोटर्सनं नुकत्याच लाँच केलेल्या टिगोर (Tata Tigor) या ईव्हीवर बॅटरी पॅक आणि मोटरसाठी आठ वर्षांची किंवा एक लाख 60 हजार किलोमीटरची वॉरंटी देऊ केली आहे. पण, ईव्हीतील बॅटरी लाईफ (battery life) दहा वर्षांच्या आसपास असावी, असं बहुतेक तज्ज्ञांचं मत आहे. असं असलं तरी, हवामान, रस्त्याची स्थिती आणि बॅटरी पॅकची गुणवत्ता यासारखे अनेक घटक आहेत, जे इलेक्ट्रिक कारच्या ड्युरेबिलीटवर परिणाम करतात. एकूणचं काय तर बॅटरी युनिट जितकं मोठे असेल तितकी जास्त पॉवर आणि रेंज ईव्हीमधून मिळू शकते.
वाचा : Electric Vehicles वर किती विश्वास ठेवायचा? पाहा काय सांगतो अभ्यास
किमती जास्त का?
बहुतेक ईव्हींचे बॅटरी पॅक खूप मोठे असतात आणि हे तंत्रज्ञान अजूनही बर्यापैकी नवीन आहे. त्यामुळे या वाहनांच्या किमती जास्त आहेत. किमतींचा विचार करताना याठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. ईव्ही चालवताना कोणतेही उत्सर्जन होत नसलं तरी, लिथियम-आयन बॅटरी पॅक तयार करण्याची प्रक्रिया आणि कार अजूनही जीवाश्म इंधनावर कार्य करणार्या इतर उद्योगांवर अवलंबून आहे. दीर्घकालीन परिणामांचा विचार केल्यास ईव्ही पर्यावरणासाठी चांगले आहेत आणि भविष्यात त्यांची किंमत कमीदेखील होईल. मात्र, सध्या तरी इलेक्ट्रिक वाहनं इतर वाहनांच्या तुलनेत खूपच महाग आहेत. उदाहरणार्थ, पेट्रोलवर चालणाऱ्या टिगोर कॉम्पॅक्ट सेडानच्या बेस व्हर्जनच्या तुलनेत टाटा टिगोर ईव्हीची किंमत जवळजवळ दुप्पट आहे.
वाचा : Mahindra च्या या Cars वर बंपर डिस्काउंट, 81,500 रुपयांपर्यंत मिळेल ऑफर
केव्हा घेऊ शकता ईव्ही ?
हा प्रश्न थोडासा कठिण आहे. कारण जोपर्यंत देशात चांगल्या ईव्ही पायाभूत सुविधा विकसीत होत नाहीत तोपर्यंत अशी वाहनं खरेदी न करणंच उत्तम आहे. ईव्हींसाठी उत्तम R&D, पुरेशी चार्जिंग स्टेशन्स, भारतीय रस्त्यांवर परिपूर्ण चाचणी आणि इतर अनेक गोष्टी आवश्यक आहेत. कदाचित असंही होऊ शकतं की, जास्तीत जास्त ईव्ही रस्त्यांवर आल्यास पायाभूत सुविधादेखील लवकर उपलब्ध करून दिल्या जातील. सध्या तरी आपण इतकच लक्षात घेतलं पाहिजे, भविष्यात कधीना कधी ईव्ही खरेदी करावंच लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Car, Electric vehicles