Google Pay चं मोठं पाऊल; आता अमेरिकेतूनही भारतात गुगल पेद्वारे पैसे पाठवता येणार

Google Pay चं मोठं पाऊल; आता अमेरिकेतूनही भारतात गुगल पेद्वारे पैसे पाठवता येणार

आंतरराष्ट्रीय पेमेंट्स आणि मनी ट्रान्स्फरच्या दृष्टीने गुगल पे अ‍ॅप्लिकेशनने मोठं पाऊल उचललं आहे. त्यामुळे अमेरिकेतल्या व्यक्ती भारत आणि सिंगापूरमधल्या आपल्या कुटुंबीयांना, मित्रमंडळींना आता गुगल पेद्वारे सहज पैसे पाठवू शकणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 मे : गुगल पे (Google Pay) सेवेचा देशांतर्गत वापर करणाऱ्यांची संख्या मोठी आहे, मात्र या सेवेद्वारे अद्याप आंतरराष्ट्रीय पेमेंट्स (International Payments) करता येत नव्हती. आता मात्र आंतरराष्ट्रीय पेमेंट्स आणि मनी ट्रान्स्फरच्या (Money Transfer) दृष्टीने गुगल पे अ‍ॅप्लिकेशनने मोठं पाऊल उचललं आहे. त्यामुळे अमेरिकेतल्या व्यक्ती भारत (India) आणि सिंगापूरमधल्या (Singapore) आपल्या कुटुंबीयांना, मित्रमंडळींना आता गुगल पेद्वारे सहज पैसे पाठवू शकणार आहेत.

या आंतरराष्ट्रीय पेमेंट्ससाठी गुगलने वेस्टर्न युनियनशी पार्टनरशिप केली आहे, असं सूत्रांनी सांगितलं आहे. चालू वर्षाच्या अखेरीपर्यंत गुगल पेच्या युजर्सना जवळपास 200 देशांत पैसे ट्रान्स्फर करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. Wise या आणखी एका प्लॅटफॉर्मसोबतही गुगल करार करणार आहे. सध्या भारतासाठी गुगल पेचं आंतरराष्ट्रीय मनी ट्रान्स्फर वेस्टर्न युनियनच्या माध्यमातून होणार आहे. ज्या देशांत वेस्टर्न युनियन (Western Union) आणि वाइज (Wise) असे दोन्ही पर्याय उपलब्ध असतील, तिथल्या युजर्सना दोन्हीपैकी कोणताही एक पर्याय निवडण्याची मुभा असेल.

गुगल पेद्वारे पैसे पाठवणं सोपं आहे. अमेरिकेत (USA) असलेल्या व्यक्ती त्यांचे भारतातले कुटुंबीय किंवा मित्रमंडळी यांचा नंबर गुगल पेवर सर्च करू शकतात. तो फोन नंबर भारतात गुगल पेवर रजिस्टर्ड असला पाहिजे आणि भारतातल्या एका बँक अकाउंटशी लिंक्ड असला पाहिजे. अमेरिकेतून केवळ डॉलरमध्येच पैसे पाठवता येऊ शकतात. व्यक्तीचे डिटेल्स सिलेक्ट केल्यावर त्याला किती डॉलर पाठवायचे आहेत, ते संबंधित व्यक्तीने तिथे लिहावं. त्यानंतर वेस्टर्न युनियन किंवा वाइजमध्ये उपलब्ध असलेला एक पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर, हे पैसे हस्तांतरित व्हायला किती वेळ लागेल याची आणि करन्सी कन्व्हर्जननंतर (चलन रूपांतरण) समोरच्या व्यक्तीला किती पैसे मिळतील, याचीही माहिती मिळेल.

(वाचा - मंदीत संधी, Tech Sector मध्ये 4000 लोकांना नोकरी देणार ही कंपनी)

आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये पैसे पाठवणाऱ्याला किंवा पैसे स्वीकारणाऱ्याला गुगलकडून कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही. वेस्टर्न युनियनने सांगितलं आहे, की जूनच्या मध्यापर्यंत या व्यवहारांवर अतिरिक्त ट्रान्झॅक्शन चार्ज (Transaction Charge) आकारला जाणार नाही. गुगल पेमध्ये (Google Pay) लिंक्ड असलेल्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्स्फर होतात. अमेरिकेतला युजर गुगल पेशी निगडित असलेल्या आपल्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे पैसे पाठवू शकेल. पैसे पाठवण्याची किमान मर्यादा नाही, मात्र कमाल मर्यादा वेगवेगळ्या कारणांवर अवलंबून असू शकतं.

(वाचा - Oxygen Level तपासण्यासाठी स्मार्टफोनमध्ये Oximeter App चा वापर धोकादायक)

गेल्या वर्षभरात 25 कोटींहून अधिक नागरिकांनी 500 अब्ज डॉलरहून अधिक रक्कम आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठवली होती. सध्या तरी आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर 6.5 टक्के व्यवहार शुल्क आकारलं जातं. ते जास्त आहे.

First published: May 14, 2021, 7:33 AM IST

ताज्या बातम्या