नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर : आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाचं आधार कार्ड असणं आवश्यक आहे. आधार कार्डमुळे (Aadhaar Card) नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यास मदत मिळते. बँकेमध्ये खातं उघडण्यासाठी, मतदान करण्यासाठी, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आधार कार्डचा पुरावा ग्राह्य धरला जातो. तुम्ही तुमचं आधार कार्ड ओळखपत्र म्हणून देखील वापरू शकता. कुठल्याही शासकीय किंवा खासगी ई-सेवा केंद्रामध्ये आधार कार्ड बनवून घेता येतं. आधार कार्ड काढल्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. पूर्वी ऑनलाइन पद्धतीनं हे व्हेरिफिकेशन करावं लागत असे; मात्र आता ऑफलाइन (Offline) पद्धतीनेदेखील आधार व्हेरिफिकेशन (Aadhaar Verification) करणं शक्य होणार आहे.
हे काम युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) दिलेलं डिजिटल स्वाक्षरी असलेलं कागदपत्र सादर करून होऊ शकेल. या कागदपत्रामध्ये तुमच्या आधार क्रमांकातले शेवटचे चार अंक असतील. सरकारनं लागू केलेल्या नियमांवरून ही माहिती मिळाली आहे. नवभारत टाइम्सनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
वाचा : Aadhaar Card द्वारे Loan हवंय? सोप्या पद्धतीने असा करा Online अर्ज
8 नोव्हेंबर रोजी आधार (प्रमाणीकरण आणि ऑफलाइन पडताळणी) विनियमन 2021 मध्ये व्हेरिफिकेशनबाबत सूचित करण्यात आलं आहे. नुकतीच अधिकृत वेबसाइटवर याची माहिती प्रकाशित करण्यात आली. ई-केवायसी प्रक्रियेसाठी, आधारची ऑफलाइन पडताळणी सक्षम करणं गरजेचं होतं. त्यामुळे आता नवीन तपशीलवार प्रक्रिया तयार करण्यात आली आहे. यूआयडीएआयनं (UIDAI) सध्याच्या ऑनलाइन आधार व्हेरिफिकेशन यंत्रणेव्यतिरिक्त क्यूआर (QR) कोड पडताळणी, आधार पेपरलेस ऑफलाइन ई-केवायसी व्हेरिफिकेशन, ई-आधार व्हेरिफिकेशन, ऑफलाइन पेपरबेस्ड व्हेरिफिकेशन आणि प्राधिकरणानं वेळोवेळी सादर केलेल्या ऑफलाइन व्हेरिफिकेशनचे इतर प्रकारही सुरू केले आहेत.
आजच्या काळात आधार व्हेरिफिकेशन ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. ऑनलाइन पद्धतीनं आधार नोंदणी करताना काही चुका होत असल्याचं दिसून येतं. त्यामुळे त्या चुका सुधारण्यासाठी आणि शोधण्यासाठी आधार व्हेरिफिकेशन करणं आवश्यक आहे. वेळीच व्हेरिफिकेशन केल्यास भविष्यात कागदपत्राशी संबंधित अडचणी येणार नाहीत.
वाचा : आधार कार्डमध्ये नाव आणि DOB किती वेळा करता येते अपडेट?...पाहा प्रोसेस
आधार कार्ड बनवून घेण्यासाठी...
आता आधार कार्ड घेण्यासाठी घरबसल्याही ऑनलाइन अपॉइंटमेंट (Online Appointment) घेता येते. ही सेवा पूर्णपणे मोफत आहे. यासाठी प्रथम तुम्हाला UIDAI च्या https://uidai.gov.in/ या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर ‘My Aadhaar’ टॅबवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर अपॉइंटमेंट बुक करण्याचा पर्याय मिळेल. तो निवडल्यानंतर तुम्हाला शहराच्या स्थानाचा पर्याय मिळेल. ते निवडल्यानंतर ‘प्रोसेस टू बुक अॅन अपॉइंटमेंट’ वर क्लिक करावं. आता एक नवीन पेज उघडेल. त्यावर न्यू आधार, आधार अपडेट आणि मॅनेज अपॉइंटमेंट असे तीन पर्याय असतील.
तुम्ही तुमच्या गरजेनुसार यापैकी कोणताही पर्याय निवडू शकता. योग्य पर्याय निवडल्यानंतर, तुम्हाला नोंदणीकृत मोबाइल नंबर, कॅप्चा कोड आणि ओटीपी टाकावा लागेल. त्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल. तुम्हाला भेटीसाठी उपलब्ध वेळेचा स्लॉटदेखील निवडावा लागेल. हे सर्व झाल्यानंतर ‘सबमिट’वर क्लिक करावं. तुमची अपॉइंटमेंट बुकिंगची प्रक्रिया पूर्ण झालेली असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aadhar card, Aadhar card link