नवी दिल्ली, 6 एप्रिल : सध्या व्हॉट्सअॅपवर (WhatsApp) एक मेसेज व्हायरल (Viral message) होत आहे, ज्यात केंद्र सरकार पुढील 3 महिन्यांसाठी मोफत इंटरनेट सेवा (Free internet Service) देणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा मेसेज वाचून तुम्हालाही खरं वाटू शकतं. कारण यात सरकार ऑनलाईन शिक्षणासाठी (online Education) पुढील 3 महिन्यांपर्यंत फ्री इंटरनेट सेवा देणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
काय आहे संपूर्ण मेसेज?
व्हायरल होणाऱ्या या मेसेजमध्ये लिहिलंय की, 'भारत सरकारद्वारा ऑनलाईन शिक्षणासाठी 100 मिलियन युजर्सला 3 महिन्यांचा रिचार्ज प्लॅन फ्री देण्याचं सांगण्यात आलं आहे. जर तुमच्याकडे जिओ, एअरटेल किंवा वोडाफोन-आयडियाचं सिम असेल, तर युजर्स या ऑफरचा फायदा घेऊ शकतात. मला फ्री रिचार्ज मिळाला असून तुम्हीही ही ऑफर मिळवू शकता', असं या मेसेजमध्ये लिहिलं आहे.
या मेसेजखाली एक लिंकही देण्यात आली आहे आणि त्या लिंकवर क्लिक करुन रिचार्ज मिळवता येईल असं सांगण्यात आलं आहे. तसंच ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे, असंही त्या मेसेजमध्ये लिहिलं आहे.
काय आहे मेसेजमागचं सत्य?
व्हॉट्सअॅपवर आलेला हा व्हायरल मेसेज पूर्णपणे फेक आहे. PIBFactCheck मध्ये हा दावा बनावट असल्याचं सांगितलं आहे. भारत सरकारकडून अशी कोणतीही घोषणा केली गेलेली नाही. PIBFactCheck ने आपल्या ट्वीटमध्ये सांगितलं की, #FraudAlert एका #WhatsApp मेसेजमध्ये दावा केला जात आहे की, भारत सरकार 3 महिन्यांसाठी 100 मिलियन युजर्सला मोफत इंटरनेट देत आहे. परंतु हा दावा खोटा असून सरकारकडून अशी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
होऊ शकते फसवणूक -
PIBFactCheck मध्ये सांगण्यात आलं की, सरकारची अशी कोणतीही स्किम नाही, ज्यात 10 कोटी लोकाना मोफत 3 महिने इंटरनेट सर्विस मिळेल. त्यामुळे मेसेजसोबत दिलेल्या कोणत्याही लिंकवर अजिबात क्लिक करू नका. या लिंकवर क्लिक केल्यानंतर युजर्सची फसवणूक होण्याची शक्यता असून मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागू शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Whatsapp