मुंबई, 18 डिसेंबर : बांगलादेशला पहिल्या कसोटी सामन्यात 188 धावांनी पराभूत केल्यानंतर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या पराभवाचा भारताला फायदा झाला आहे. जर भारताने बांगलादेशला क्लीन स्वीप केलं तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यात दिलासा मिळू शकतो. तरीही भारताला चार पैकी तीन सामने जिंकावे लागतील आणि एक ड्रॉ झाल्यास अंतिम सामन्यात खेळता येईल. जर बांगलादेशचा संघ दुसरा कसोटी सामना ड्रॉ करण्यात यशस्वी ठरला तर भारताच्या अडचणी वाढू शकतात. तसंच भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामने जिंकावे लागतील.
आता भारतीय संघाची विजयाची टक्केवारी 55.7 टक्के इतकी झाली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिली कसोटी हारल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची विजयाची टक्केवारी 54.44 टक्के झालीय. जर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका गमावली तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये त्यांना खेळता येणार नाही.
हेही वाचा : बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीत भारताचा दणदणीत विजय, मालिकेत आघाडी
श्रीलंकेच्या संघाची विजयाची टक्केवारी 55.33 टक्के इतकी आहे. इंग्लंडच्या संघाची टक्केवारी 44.44 टक्के इतकी असून ते पाचव्या स्थानी आहेत. पहिल्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा संघ असून त्यांची विजयाची टक्केवारी ही 76.92 टक्के इतकी आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या पराभवाचा भारताला फायदा झाला असून पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी पोहोचले आहे. आता उर्वरित कसोटींमध्ये भारताने विजय मिळवला तर भारत सहज फायनलमध्ये पोहोचू शकेल. पण ऑस्ट्रेलिया सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यांची विजयाची टक्केवारीसुद्धा इतर संघांच्या तुलनेत जास्त असून भारतासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका महत्त्वाची असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia, Cricket, South africa, Sri lanka, Team india