उत्तराखंड, 30 डिसेंबर : भारतीय टीमचा खेळाडू ऋषभ पंत च्या कारला भीषण अपघात झाल्यामुळे क्रिकेट क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ऋषभ पंत लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी त्याचे चाहते प्रार्थना करत आहे. ज्यावेळी ऋषभचा अपघात झाला त्यावेळी त्याला रस्त्यावर मदत करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. उत्तराखंडमध्ये आईला भेटून घराकडे निघालेल्या ऋषभ पंतच्या BMW कारला भीषण अपघात झाला. भरधाव कार डिव्हायडरला धडकली आणि त्यानंतर कारने पेट घेतला. या अपघातात पंत जखमी झाला पण थोडक्यात बचावला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. कारला जेव्हा अपघात झाला होता, त्यानंतर कारने अवघ्या काही क्षणात पेट घेतला. या व्हिडीओमध्ये पंत हा डिव्हायडर्सवर पडलेला आहे. त्याला दोन व्यक्ती मदत करत आहे. तिसरी व्यक्ती ही व्हिडीओ रेकॉर्ड करत समोर आली आहे.
#RishabhPant च्या कारला अपघात, बचावकार्य करत असतानाचा व्हिडीओ समोर pic.twitter.com/bEsxWdZnSx
— ram rajesh patil (@RamDhumalepatil) December 30, 2022
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतच्या कारला उत्तराखंडमधील मंगलोरजवळ आज पहाटे 5.15 वाजेच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात ऋषभ पंत सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे.या अपघातानंतर त्यांची कार जळून खाक झाली आहे. पुढील तपासणीसाठी त्याला डेहराडूनला आणले जात आहे.
प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, पंतच्या कारला पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास अपघात झाला. कोतवाली मंगलोर क्षेत्रांतर्गत मोहम्मदपुरजवळ हा अपघात झाला. पंतला अचानक डुलकी लागली आणि कार अनियंत्रित झाली आणि डिव्हायडरला धडकली. पंत हा दिल्लीतील रुडकी भागात राहतोय. त्यामुळे तो घराकडे निघाला होता. त्याच दरम्यान हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, धडक दिल्यानंतर कारने लगेच पेट घेतला. स्थानिकांनी धाव घेऊन पंतला कारच्या बाहेर काढलं आणि लगेच 108 रुग्णवाहिकेला फोन केला. घटनास्थळावर पोलिसांनी धाव घेतली. सर्वात आधी पंतला रुड़की येथील रुग्णालयात दाखल केले, त्यानंतर आता त्याला डेहरादून इथं पाठवले आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुकं साचलं होतं, त्यामुळे समोर काही दिसत नव्हतं अशातच पंतच्या कारला अपघात झाला असावा असंही सांगितलं जात आहे. (ऋषभ पंतच्या कारकिर्दीला मोठा सेटबॅक, वर्ल्ड कपमधूनही होणार पत्ता कट?) विशेष म्हणजे, 9 फेब्रुवारीपासून भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिज सुरू होणार आहे. भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी ही 4 टेस्टची सीरिज चांगल्या फरकानं जिंकणे आवश्यक आहे. पंत या सीरिजसाठी फिट होईल अशी शक्यता कमी आहे. (नवीन वर्षात दिसणार नवी टीम इंडिया, पंत आणि राहुलबाबत आली मोठी बातमी) तर, भारतीय टेस्ट टीमसाठी फॉर्मचा विचार केला तर पंत सध्या रोहित आणि कोहलीपेक्षाही महत्त्वाचा खेळाडू असल्यानं पंतचा अपघात हा टीम इंडियासाठी मोठा धक्का आहे. तर दुसरीकडे, आयपीएलचा हंगाम येऊ घातला आहे. पंत दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन आहे. तो आयपीएलसाठी पूर्ण फिट होणार का याबाबत त्या फ्रँचायझीचंही आता टेन्शन वाढलं आहे.