मुंबई, 29 डिसेंबर : भारतीय क्रिकेट टीममधील आक्रमक बॅटर अशी ऋषभ पंतची ओळख आहे. टीम इंडियाचं भविष्य समजल्या जाणाऱ्या पंतची कारकिर्द धोक्यात आलीय. पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 व वन-डे क्रिकेट सीरिजसाठी निवडण्यात आलेल्या टीममध्ये पंतचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या वन-डे वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेतूनसुद्धा पंतला वगळलं जाईल, अशी चर्चा सुरू झालीय. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिलंय. बांगलादेशपाठोपाठ आता भारतीय क्रिकेट टीम श्रीलंकेविरुद्ध वन-डे आणि टी-20 सीरिज खेळणार आहे. बीसीसीआयनं यासाठी टीम इंडियाचीही घोषणा केली आहे. पण या टीममध्ये विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंतला स्थान मिळालेलं नाही. वन-डे आणि टी-20 अशा दोन्ही फॉरमॅटमधून वगळलं जाणं, हा पंतसाठी मोठा धक्का आहे. पंत केवळ टेस्ट फॉरमॅटपुरताच मर्यादित राहणार का? पंतला वन-डे वर्ल्ड कपसाठी संधी दिली जाणार नाही का? असा प्रश्नही उपस्थित होतोय. दुखापतीमुळे टीमच्या बाहेर? खराब फॉर्ममुळे पंतला श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजमधून वगळण्यात आलं, असेही म्हणता येणार नाही. कारण बीसीसीआयनं त्यांच्या प्रसिद्धीपत्रकात पंतला वगळण्याचं कोणतेही कारण स्पष्ट केलेलं नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ पंत दुखापतग्रस्त आहे. त्यामुळेच त्याची श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजसाठी निवड झालेली नाही. ऋषभ पंतच्या गुडघ्याला दुखापत झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्याला स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी पाठवले जाणार आहे. मात्र, पंतला बरं होण्यासाठी किती काळ लागेल, याबद्दल अद्याप काहीही माहिती उपलब्ध नाही.
पंतची कामगिरी ऋषभ पंतने बांगलादेशविरुद्धच्या मीरपूर टेस्ट मॅचमध्ये त्याने 93 रन केले होते. तर, या पूर्वी त्याने चितगाव कसोटीत 46 रन केले होते. मात्र, त्या पूर्वीच्या ऋषभ पंतच्या 8 मॅचमधील 7 इनिंगवर नजर टाकली, तर तो यात पूर्णपणे फ्लॉप झालेला दिसला. या डावांमध्ये पंतला 20 रनांचा आकडा एकदाही गाठता आला नाही. वन-डे वर्ल्ड कपसाठी अवधी दरम्यान, वन-डे वर्ल्ड कपला अजून बराच वेळ आहे. या स्पर्धेचं यजमानपद भारताला दिलं जाऊ शकतं. तर त्यापूर्वी टीम इंडियाला द्विपक्षीय सीरिजअंतर्गत जानेवारी 2023 पासून एकूण 15 वन-डे मॅच खेळायच्या आहेत. तसेच आशिया कप क्रिकेट स्पर्धा देखील वन-डे फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल, ज्या अंतर्गत फायनल मॅचसह एकूण 13 मॅच होतील. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला दिलं जाणार आहे. ही सर्व परिस्थिती पाहता, पंतला आगामी वन-डे वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेसाठी निवडण्यात येणाऱ्या टीममधून वगळण्यात येईल, असं म्हणणं योग्य ठरणार नाही. तर, श्रीलंकेनंतर भारतीय टीमला न्यूझीलंडविरुद्ध वन-डे आणि टी-20 सीरिज खेळायची आहे. त्या सीरिजमध्ये पंतचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. राहुल द्रविडला साईडलाईन केलं जाणार? समोर आला BCCI चा गेमप्लान! श्रीलंकेच्या सीरिजसाठी निवडण्यात आलेली टीम वन-डे टीम : रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या ( व्हाईस कॅप्टन), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीपसिंग, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक. टी 20 टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), सूर्यकुमार यादव ( व्हाईस कॅप्टन), राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शुभमन गिल, दीपक हुडा, इशान किशन, ऋतुराज गायकवाड, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीपसिंग, शिवम मावी मुकेश कुमार, उमरान मलिक, हर्षल पटेल.