मुंबई, 10 ऑगस्ट**:** सध्या व्यावसायिक क्रिकेटचं वेळापत्रक खूपच व्यस्त झालं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने, वेगवेगळ्या देशातल्या टी20 लीग, देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा यामुळे खेळाडूंवर मोठा ताण पाहायला मिळतोय. काही दिवसांपूर्वी अतिक्रिकेटमुळे इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सनं वन डे क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती. आणि काल मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेन्ट बोल्टही काही काळ क्रिकेटपासून लांब जाण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं बोल्टला सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून वगळलं आहे. अचानक सोडलं सेंट्रल काँट्रॅक्ट ट्रेन्ट बोल्टचा सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या किवी संघात समावेश आहे. पण या दौऱ्यानंतर तो फार कमी क्रिकेट खेळताना दिसणार आहे. आपल्या कुटुंबाला वेळ देता यावा यासाठी बोल्टनं हा निर्णय घेतला आहे. असं असलं तरी स्थानिक क्रिकेटमध्ये खेळणार असल्याचं त्यानं स्पष्ट केलं आहे. त्यानंतर जेव्हा तो उपलब्ध असेल तेव्हा न्यूझीलंड संघात त्याची निवड केली जाऊ शकते. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल 548 विकेट्स नावावर असणारा बोल्ट अचानकपणे सेंट्रल काँन्ट्रॅक्टमधून बाहेर पड़ल्यानं पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या अती व्यस्त कार्यक्रमांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आणि हाच मुद्दा आता आणखी तापणार आहे. हेही वाचा - Ravindra Jadeja: पंतप्रधान मोदींनी का केलं जाडेजा आणि त्याच्या पत्नीचं कौतुक? जाणून घ्या कारण कुटुंबाला वेळ देण्यासाठी क्रिकेटला ब्रेक सेंट्रल काँट्रॅक्टमधून बाहेर पडताना बोल्टनं म्हटलंय की ‘देशासाठी खेळणं माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. ते एक स्वप्न होतं जे पूर्ण झालं. मी गेली 12 वर्ष सलग खेळतोय. पण आता असं वाटतंय की मला माझ्या कुटुंबाला वेळ द्यायला हवा. हा निर्णय मी माझी पत्नी आणि तीन मुलांसाठी घेतला आहे. माझं कुटुंब माझ्यासाठी सगळं काही आहे आणि आता त्यांना माझी गरज आहे.’ ‘सेंट्रल काँट्रॅक्ट सोडण्याचा निर्णय मी विचारपूर्वक घेतला आहे. मी संघात नसल्यानं नक्कीच त्याचा परिणाम होईल. पण एका वेगवान गोलंदाजाचं करिअर फार मोठं नसतं. त्यामुळे हीच योग्य वेळ आहे पुढच्या योजना आखण्याची आणि त्या पूर्ण करण्याची’ असंही बोल्ट म्हणाला. बेन स्टोक्सचीही वन डेतून निवृत्ती काही दिवसांपूर्वी इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सनही वन डे क्रिकेटमधून अचानकपणे निवृत्तीची घोषणा केली होती. सलगपणे तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणं शक्य नसल्यानं स्टोक्सनं अवघ्या 31व्या वर्षी हा निर्णय घेतला होता. यापुढे तो केवळ कसोटी आणि टी20 फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.