मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /सानिया मिर्झाकडे कोट्यवधींची संपत्ती, टेनिस अकादमीची मालकीण अन् लक्झरी कार्सचा छंद

सानिया मिर्झाकडे कोट्यवधींची संपत्ती, टेनिस अकादमीची मालकीण अन् लक्झरी कार्सचा छंद

sania mirza

sania mirza

भारतीय टेनिसपटू असलेल्या सानियाने तिच्या करिअरमध्ये सहा ग्रँडस्लॅम स्पर्धांसह अनेक स्पर्धांमध्ये पदकांवर नाव कोरलं. सानियाने नुकतीच ग्रँडस्लॅममधून निवृत्त होण्याची घोषणा केली.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 28 जानेवारी : सानिया मिर्झा हे टेनिस जगतातलं एक महत्त्वाचं नाव. भारतीय टेनिसपटू असलेल्या सानियाने तिच्या करिअरमध्ये सहा ग्रँडस्लॅम स्पर्धांसह अनेक स्पर्धांमध्ये पदकांवर नाव कोरलं. सानियाने नुकतीच ग्रँडस्लॅममधून निवृत्त होण्याची घोषणा केली. ऑस्ट्रेलियन ओपन 2023मध्ये मिक्स्ड डबलच्या अंतिम सामन्यात तिला पराभव पत्करावा लागला. तो तिचा शेवटचा सामना होता. सानियाने क्रीडा क्षेत्रात यशस्वी करिअर केलं. या कारकिर्दीत तिनं नाव, पैसा कमावला. या कालावधीत तिला काही वादांनाही तोंड द्यावं लागलं. सानियाची एकूण संपत्ती, करिअर आणि तिच्याशी संबंधित वादविवादांबाबत सविस्तर जाणून घेऊ या.

    भारताची टेनिस क्वीन सानिया मिर्झा नुकतीच ऑस्ट्रेलियन ओपन 2023मधल्या मिक्स्ड डबलच्या अंतिम सामन्यात पराभूत झाली. टेनिस करिअरमधला हा तिचा शेवटचा ग्रँडस्लॅम सामना होता. सामन्यानंतर निरोपाच्या भाषणात सानियाला अश्रू अनावर झाले. `ग्रँड स्लॅममधल्या करिअरची समाप्ती करण्यासाठी मेलबर्नपेक्षा अधिक चांगली जागा नाही. मला कोर्टवर घराप्रमाणे वातावरण उपलब्ध करुन दिल्याबद्दल सर्वांचे आभार,` असं सानियाने या वेळी सांगितलं. ग्रँडस्लॅम टुर्नामेंटचा प्रवास थांबला असला तरी सानिया लवकरच तिचा शेवटचा व्यावसायिक सामना खेळेल.

    हेही वाचा : अल नस्रने पराभवाचे खापर फोडले रोनाल्डोवर, तर चाहत्यांनी मेस्सी-मेस्सी म्हणत डिवचलं; Video Viral

    सानियाने आतापर्यंत सहा ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये विजय मिळवला आहे. त्यात तीन सामने डबल्सचे, तर तीन मिक्स डबल्सचे होते. 2016मध्ये झालेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये सेमीफायनलिस्ट ठरली. 2015ला झालेल्या वुमेन्स डबल्समध्ये ती जागतिक पातळीवर अव्वल ठरली होती. 36 वर्षांच्या सानिया मिर्झाने 2003मध्ये व्यावसायिक टेनिस करिअरला सुरुवात केली. 27 जानेवारी 2023ला करिअरमधली शेवटची ग्रँडस्लॅम मॅच ती खेळली. `19 फेब्रुवारीपासून सुरू होणारा डब्ल्यूटीए 1000 इव्हेंटम्हणजे माझ्या व्यावसायिक टेनिस करिअरमधली शेवटची टुर्नामेंट असेल. त्यानंतर मी निवृत्त होणार आहे,` असं सानियाने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

    sania mirza

    sania mirza

    सानिया मिर्झाचा जन्म 15 नोव्हेंबर 1983 रोजी मुंबईत झाला. सानियाच्या जन्मानंतर काही वर्षांनी तिचे कुटुंबीय हैदराबादला शिफ्ट झाले. हैदराबादमध्ये सानिया तिची लहान बहीण अनमसोबत मोठी झाली. हैदराबादमध्ये सानियाने टेनिसचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. हैदराबादमधल्या नासर स्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिनं सेंट मेरी कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. सानियाचं आणि क्रीडाविश्वाचं नातं खूप जुनं आहे. तिचे वडील इमरान मिर्झा क्रीडा पत्रकार होते. ते सानियाचे मेंटर आणि सुमारे 20 वर्षं कोच होते. तिची बहीण अनम ही माजी क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीन यांची सून आहे.

    डिसेंबर 2019मध्ये मोहम्मद असदुद्दीनशी अनमचा विवाह झाला. सानियाची आजी भारतीय क्रिकेट टीमचे माजी कॅप्टन गुलाम अहमद यांची मावशी होती. गुलाम यांच्या बहिणीचे पुत्र आसिफ इक्बाल काही वर्षांपूर्वी पाकिस्तान क्रिकेट टीमचे कॅप्टन होते. सानिया पाकिस्तान टीमचा कॅप्टन शोएब मलिकशी विवाहबद्ध झाली. अशा पद्धतीनं एकूण चार इंटरनॅशनल क्रिकेट कॅप्टन हे तिचे नातेवाईक आहेत. पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकशी सानिया 12 एप्रिल 2010 रोजी विवाहबद्ध झाली. विवाहसोहळ्याचे विधी हैदराबादमधल्या एका हॉटेलमध्ये आणि तिच्या घरी पार पडले. 15 एप्रिलला पाकिस्तानमधल्या लाहोरला रिसेप्शन पार पडलं.

    हेही वाचा : मुलाच्या उपस्थितीत ग्रँडस्लॅम खेळण्याची संधी मिळाली, सानियाच्या डोळ्यात आले आनंदाश्रू

    2018मध्ये इजहानचा जन्म झाला. तिनं तिचं आत्मचरित्र 'एस अगेन्स्ट ऑड्स'मध्ये लिहिलं आहे, की 'मी जेव्हा प्रोफेशनल लाइफमध्ये अडचणींचा सामना करत होते, त्या वेळी माझ्या आयुष्यात शोएब आला.' विवाहापूर्वी सानिया वादात सापडली होती. लग्नापूर्वी शोएब सानियाच्या घरी वास्तव्यास होता. लग्नापूर्वी वराने वधूच्या घरी राहणं इस्लामच्या विरुद्ध आहे, असं वक्तव्य त्या वेळी मु्स्लिम धर्मगुरूंनी केलं होतं. त्यावेळी शोएबने हॉटेलमध्ये राहावं, असा निर्णय तिच्या घरातल्या ज्येष्ठ मंडळींनी घेतला; मात्र मीडियामुळे शोएबला घरातून बाहेर पडणं मुश्किल झाला. त्या वेळी सानियाचे काका जोरजोरात ओरडू लागले. घरात भांडणं सुरू आहेत, असं लोकांना वाटलं. मीडियाचा रोख तिच्या काकांकडे वळाला आणि दुसरीकडे शोएब गुपचूप एका छोट्या कारमध्ये बसून हॉटेलमध्ये पोहोचला.

    सानियाने वयाच्या सहाव्या वर्षी सर्वप्रथम टेनिस खेळण्याची इच्छा व्यक्त केली. त्या वेळी तिची आई तिला हैदराबादमधल्या टेनिस अकादमीत प्रवेशासाठी घेऊन गेली. त्या वेळी तिथल्या कोचने प्रवेश देण्यास नकार दिला. तिची उंची टेनिसच्या रॅकेटपेक्षा कमी आहे, ही टेनिस काय खेळणार असा प्रश्न कोचनं उपस्थित केला. तिच्या आईने विनंती केल्यावर सानियाला प्रवेश मिळाला. काही दिवसांनी हेच कोच सानियाच्या घरी गेले आणि एवढ्या लहान वयात इतकं चांगलं टेनिस खेळताना आम्ही कोणालाच पाहिलं नाही, असं त्यांनी तिच्या आईला सांगितलं. त्यानंतर सानियाने मागे वळून पाहिलं नाही.

    sania mirza

    sania mirza

    सानिया मिर्झाने ज्यूनिअर लेव्हलवर 10 सिंगल्स आणि 13 डबल्स टायटल जिंकली. 2001मध्ये सीनिअर लेव्हलवर प्रवेश केल्यानंतर तिनं 2003पासून व्यावसायिक टेनिस करिअरला सुरुवात केली. 16व्या वर्षी टेनिस करिअरला सुरुवात केल्यानंतर सानियाने 20 वर्षं सिंगल्स, वुमेन्स डबल्स, मिक्स्ड डबल्समध्ये चांगली कामगिरी केली. यात तिनं 6 ग्रँडस्लॅम आणि एकूण 43 पदकांवर आपलं नाव कोरलं. 2005मध्ये तिनं पहिल्यांदा डब्ल्यू टीए सिंगल्स टायटल जिंकलं. याशिवाय ती दोन वेळा फ्रेंच ओपन आणि तीन वेळा ऑस्ट्रेलियन ओपनची रनर अप ठरली.

    करिअरच्या शेवटच्या टप्प्यात सानिया दोन ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या अगदी जवळ पोहोचली; पण तिला त्यात विजेतेपद मिळवता आलं नाही. मागच्या वर्षी विंबल्डनमध्ये मॅट पोविकसोबत ती मिक्स्ड डबलची सेमीफायनल खेळली. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ती मिक्स्ड डबल इव्हेंटमध्ये विजेतेपदाच्या जवळ पोहोचली होती; पण ब्राझीलच्या जोडीकडून तिला पराभव पत्कारावा लागला. सानियाने 2004 मध्ये वुमेन्स सिंगल्समधून व्यावसायिक टेनिस करिअरला सुरुवात केली. डबल्समध्ये मिळत असलेलं यश आणि दुखापतीमुळे तिनं 2013पासून सिंगल्स खेळणं बंद केलं. तिनं करिअरच्या शेवटच्या दहा वर्षांत वुमेन्स आणि मिक्स्ड डबल्स खेळण्यावर लक्ष केंद्रित केलं.

    हेही वाचा : One Match Wonder: पदार्पणातील टेस्टमध्ये हॅट्ट्रिक घेऊनही अवघ्या 5 मॅचमध्येच करिअर संपुष्टात!

    जगप्रसिद्ध टेनिसपटू सेरेना विल्यम्सविरुद्ध सानियाचा दोन वेळा सामना झाला. या दोन्ही सामन्यांत सानिया पराभूत झाली. 21 जानेवारी 2005 रोजी वयाच्या 18व्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये वुमेन्स सिंगल्समध्ये तिचा सामना सेरेनाविरुद्ध झाला. तेव्हा सानिया 6-1,6-4ने पराभूत झाली. फेअरवेल स्पीचवेळी याबाबत बोलताना सानिया म्हणाली, की `सेरेनाविनरद्धची मॅच ही खरी माझ्या टेनिस करिअरची सुरुवात होती, असं मी मानते.`

    सानिया मिर्झाने तिच्या टेनिस करिअरमध्ये 6 ग्रँडस्लॅम किताब जिंकले. यात तीन मिक्स्ड डबल आणि तीन वुमेन्स डबलमध्ये ती विजेती ठरली. मिक्स्ड डबल्समध्ये 2009ची ऑस्टेलियन ओपन, 2012ची फ्रेंच ओपन आणि 2014चं यूएस ओपन टायटल यांचा समावेश आहे. वुमेन्स डबलमध्ये तिनं 2015मध्ये विंबल्डन, 2015मध्ये यूएस ओपन आणि 2016 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन टायटल जिंकलं. याशिवाय वुमेन्स आणि मिक्स्ड डबल खेळताना सर्व चार ग्रँडस्लॅम किताब आपल्या नावावर केले. 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये सानिया भारतासाठी मेडल जिंकण्याच्या जवळ पोहोचली होती; पण सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्याने मेडल मिळाले नाही. ऑलिम्पिकव्यतिरिक्त तिने एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. एशियन गेम्समधल्या वेगवेगळ्या सामन्यांत तिनं भारतासाठी दोन सुवर्ण, तीन सिल्व्हर आणि तीन ब्रॉन्झ पदकं मिळवली. 2010मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिने सिंगल्समध्ये सिल्व्हर आणि वुमेन्स डबल्समध्ये ब्रॉन्झ पदक जिंकलं. 2003मध्ये आफ्रोआशियन गेम्समध्ये वेगवेगळ्या सामन्यांमध्ये चार सुवर्णपदकं पटकावली.

    सानिया वयाच्या 14 वर्षी पहिल्यांदा मिक्स्ड डबल खेळण्यासाठी कोर्टवर उतरली. तेव्हा 22 वर्षांचा रोहन बोपण्णा तिचा टेनिस पार्टनर होता. 27 जानेवारी 2023 रोजी ती शेवटची ग्रँडस्लॅम मॅच खेळली तेव्हादेखील भारताचा बोपण्णा तिचा टेनिस पार्टनर होता. सानिया आणि बोपण्णाने सहा वर्षांपूर्वी 2017 मध्ये फ्रेंच ओपनचा मिक्स्ड डबल किताब जिंकला होता. 2009च्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सानिया महेश भूपतीसोबत चॅम्पियन ठरली होती. भारतीय पार्टनरशिवाय तिनं विदेशी पार्टनरसोबत खेळूनही ग्रँडस्लॅम जिंकले आहेत.

    20 वर्षांच्या टेनिस करिअरमध्ये सानिया मिर्झाने अनेक लहान-मोठे पुरस्कार मिळवले. यात पाच पुरस्कार खास होते. टेनिस सुरू केल्यानंतर 2004 मध्ये तिला अर्जुन पुरस्कार मिळाला. 2005 मध्ये शानदार प्रोफेशनल डेब्यूसाठी तिला वर्ल्ड टेनिस असोसिएशनकडून न्यूकमर पुरस्कार दिला गेला. 2006मध्ये तिला पद्मश्री पदकाने सन्मानित केलं गेलं. 2015मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न (तेव्हाचा राजीव गांधी खेलरत्न) पुरस्कार आणि 2016मध्ये भारत सरकारने तिला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं.

    सानिया मिर्झाने टेनिस करिअरमध्ये सुमारे 58.65 कोटी रुपये बक्षिसांमधून मिळवले. अनेक मोठ्या कंपन्यांची ती ब्रँड अँबेसेडर होती. तिची एकूण संपत्ती सुमारे 205 कोटी रुपये आहे. टेनिस करिअरदरम्यान ती एअर इंडिया, टाटा टी, आदिदास, हॅथवे केबल, टीव्हीएस स्कूटी आणि विल्सनसारखे टॉप ब्रँड्स प्रमोट करत होती.

    लक्झरी लाइफसह सानियाला लक्झरी कार्सचा छंद आहे. तिच्याकडे बीएमडब्ल्यू 7 सीरीज, जग्वार एक्सई, मर्सिडीज बेंज, बीएमडब्ल्यू 5 सीरिज आणि रेंज रोव्हर इव्होक आहे. हैदराबादमध्ये मुर्तजागुडमध्ये सानिया मिर्झा टेनिस अकादमी आहे. ही अकादमी तिने 2013मध्ये सुरू केली होती. तिच्या अकादमीची एक शाखा दुबईतही आहे. दुबईतल्या पाम जुमेराह इथे द आयलँड बंगलोमध्ये सानिया तिचा पती शोएब मलिक आणि मुलगा इजहानसोबत राहते. याशिवाय हैदराबादमधल्या फिल्मसिटीत तिचं एक आलिशान घर आहे.

    सानिया मिर्झाशी निगडीत अनेक वाद चर्चेत राहिले. 2008मध्ये सानिया मिर्झाने टेबलवर पाय ठेवल्याचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्या टेबलावर तिरंगा होता. ध्वजाचा अवमान केल्यासंदर्भातल्या बातम्या त्यावेळी माध्यमामध्ये होत्या. त्यानंतर तिनं भारतात टेनिस टुर्नामेंट खेळण्यास नकार दिला; पण नंतर 2010 मध्ये ती पुन्हा भारतात टेनिस खेळू लागली. तेलंगण सरकारने सानियाला राज्याची ब्रँड अँबेसेडर घोषित केलं; पण तिचा पती पाकिस्तानी असल्याने `पाकिस्तानची सून` असं म्हणत ती या पदासाठी अयोग्य असल्याची चर्चा झाली. तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांनी तिला दोन वेळा एक-एक कोटी रुपये दिले होते. त्यामुळे आयकर विभागाने तिची चौकशी केली होती. `हे पैसे मला ट्रेनिंग इन्सेंटिव्ह म्हणून दिले गेले, अँबेसेडर म्हणून नाही, ` असा खुलासा तेव्हा सानियाने केला होता.

    मुस्लिम मुलगी असल्याने हैदराबादमध्ये तिला बऱ्याचदा धर्मगुरूंची टीका सहन करावी लागली. टेनिस खेळताना टी-शर्ट आणि स्कर्ट परिधान करण्यापासून तिला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला; पण कुटुंबीयांच्या पाठिंब्यावर तिनं टेनिस खेळणं सुरूच ठेवलं. `जोपर्यंत मी भारतासाठी टेनिस खेळून विजयी होत राहीन, तोपर्यंत लोकांना माझ्या स्कर्टसाइजची चिंता करण्याची गरज नाही,` असं तिनं सांगितलं होतं.

    गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात शोएब मलिकशी तिने घटस्फोट घेतल्याचं वृत्त आलं होतं; पण यावर सानिया आणि शोएबने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर सानियाने शोएबसोबतचा एक फोटो शेअर केला होता. तसंच `मलिक - मिर्झा` नावाचा एक टॉक शो या दोघांनी सुरू केला आणि घटस्फोटाची चर्चा आपोआप थांबली.

    सानिया मिर्झाच्या शेवटच्या ऑस्ट्रेलियन ओपन फायनल मॅचनंतर मेलबर्नमधल्या रॉड लेवर एरिनामध्ये तिला तिच्या भावना व्यक्त करण्यासाठी बोलावण्यात आलं. त्या वेळी बोलताना तिला अश्रू अनावर झाले. `हे आनंदाश्रू आहेत. 18 वर्षांपूर्वी मेलबर्नच्या या कोर्टवर मी आंतरराष्ट्रीय टेनिस करिअरला सुरुवात केली होती. आता निवृत्त झाल्यानंतर मी कुटुंबीयांसोबत वेळ घालवणार आहे. तसंच हैदराबाद आणि दुबईतली टेनिस अकादमी आणखी चांगली व्हावी, यावर लक्ष केंद्रित करणार आहे,` असं सानियाने त्या वेळी सांगितलं.

    First published:

    Tags: Sania mirza, Shoaib akhtar