मुंबई, 28 जानेवारी : सौदी सुपर कपच्या सेमीफायनलमध्ये अल नस्र क्लबला अल इतिहादविरुद्ध ३-१ ने पराभूत व्हावं लागलं. या पराभवाचं खापर अल नस्रचे मॅनेजर रुडी गार्सिया यांनी स्टार क्रिकेटर ख्रिस्तियानो रोनाल्डोवर फोडलं आहे. रोनाल्डोने सामन्यात गोल करण्याची एक चांगली संधी गमावली होती. त्यामुळे गार्सियाने यांनी रोनाल्डो संघाच्या पराभवाचं कारण ठरल्याचं म्हटलं आहे. नव्या क्लबकडून दोन सामने खेळलेल्या रोनाल्डोला अजून एकही गोल करता आलेला नाही. अल नस्रने रोनाल्डोला विक्रमी किंमतीत करारबद्ध केलं आहे. अल नस्रचे मॅनेजर गार्सिया यांनी म्हटलं की, सामन्याचं चित्र बदलणारा क्षण पहिल्या हाफमध्ये रोनाल्डोने गोल करण्याची संधी गमावणं हा होता. प्रतिस्पर्धी संघाने पहिल्या हाफमध्ये आमच्यापेक्षा चांगला खेळ केला.’ हेही वाचा : अर्शदीपचं बेसिक गंडलंय, माजी क्रिकेटपटूंनी नो बॉलचं कारण सांगताना दिला सल्ला रोनाल्डोला त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात एकही गोल करता आला नाही. यानंतर चाहत्यांनी मैदानावर रोनाल्डोला ट्रोल करायला सुरुवात केली. यातला एक व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सामन्यात पराभवानंतर रोनाल्डो आणि संघातील इतर खेळाडू मैदानाबाहेर ड्रेसिंग रूमच्या दिशेने जाताना दिसतात. अल इत्तिहाद संघाचे चाहते रोनाल्डो मैदानाबाहेर जाताना मेस्सी-मेस्सी असं जोरजोरात ओरडताना दिसतात. यावेळी रोनाल्डो थोडा लंगडत चालतो. फीफा वर्ल्ड कपमध्ये गेल्या वर्षी मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने विजेतेपद पटकावलं होतं. कतारमध्ये हा वर्ल्ड कप झाला होता. मेस्सी फ्रान्सच्या पीएसजीकडून खेळतो. १९ जानेवारीला पीएसजी आणि रियाद इलेव्हन यांच्यात एक मैत्रीपूर्ण लढत झाली होती. त्यात रोनाल्डो आणि मेस्सी आमने सामने आले होते. रोनाल्डो सौदी ऑल स्टार इलेव्हनचं कर्णधारपद भूषवत पॅरिस सेंट जर्मनविरुद्ध खेळला होता. त्या सामन्यात रोनाल्डोने दोन गोल केले होते. पण लियोनेल मेस्सीच्या पीएसजी संघाने ५-४ असा विजय मिळवला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.