नवी दिल्ली, 27 जानेवारी : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि रोबन बोपण्णा यांनी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतील मिश्र दुहेरीच्या फायनलमध्ये धडक मारली होती. 36 वर्षांच्या सानियानं 42 वर्षांच्या रोहनसोबत राफेल माटोस आणि लुईसा स्टेफनी या ब्राझिलियन जोडीचा सामना केला. फायनल मॅचमध्ये ब्राझिलियन जोडीनं भारतीय जोडीचा 6-7, 2-7 असा पराभव केला. त्यामुळे सानिया आपल्या कारकिर्दीतील शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्यात अपयशी ठरली. आज (27 जानेवारी) ऑस्ट्रेलियातील रॉड लेव्हर एरिना येथे झालेल्या फायनलनंतर सानियाला अश्रू अनावर झाले. ‘इंडिया टुडे’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. फेब्रुवारी (2023) महिन्यामध्ये दुबईत होणारी डब्ल्यूटीए 1000 स्पर्धा ही सानियाच्या कारकिर्दीतील शेवटची टेनिस स्पर्धा असेल. त्यामुळे ऑस्ट्रेलियात सुरू असलेली ‘ऑस्ट्रेलियन ओपन’ ही तिची शेवटची ग्रँडस्लॅम स्पर्धा होती. सानियानं मिश्र दुहेरीत चमकदार कामगिरी करून फायनलमध्ये प्रवेश केला होता. फायनल मॅचनंतर, आपल्या कारकिर्दीतील आठवणींना उजाळा देताना तिला अश्रू अनावर झाले. तिनं आपल्या किशोरवयातील आणि महान सेरेना विल्यम्सविरुद्ध झालेल्या मॅचेसच्या आठवणी सांगितल्या. ही स्पर्धा तिच्यासाठी आणखी विशेष होती कारण, या वेळी तिचा मुलगा इझान मिर्झा मलिक तिच्यासोबत होता. मॅचनंतर बोलताना सानिया म्हणाली, “माझं कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे. मी माझ्या मुलासमोर ग्रँड स्लॅम फायनल खेळू शकेन, असं मला कधीच वाटलं नव्हतं.” भावूक झालेली सानिया पुढे म्हणाली, “मी रडत आहे पण हे दु:खाचे अश्रू नाहीत तर आनंदाचे आहेत.” तीनं असंही सांगितलं की, व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती स्वीकारण्यापूर्वी ती आणखी काही दिवस टेनिस खेळणार आहे. “मी अजून काही स्पर्धा खेळणार आहे. माझ्या करिअरची सुरुवात 2005 मध्ये मेलबर्नपासून झाली होती. तेव्हा मी वयाच्या 18व्या वर्षी सेरेनाचा सामना केला होता. ‘रॉड लेव्हर अरेना’ला खरोखरच माझ्या आयुष्यात विशेष स्थान आहे. माझं शेवटचं ग्रँडस्लॅम पूर्ण करण्यासाठी मी यापेक्षा चांगल्या मैदानाची कल्पना करू शकत नाही,” असं सानिया म्हणाली.
हेही वाचा - रणजी ट्रॉफीत जडेजाची कमाल, तामिळनाडुच्या फलंदाजांची उडाली भंबेरी 2005 मध्ये, किशोरवयीन सानियानं मेलबर्न पार्क येथे ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत सेरेना विल्यम्सचा सामना केला होता. सेरेनानं हा सामना 6-1, 6-4 अशा फरकानं जिंकला होता. तेव्हा सानिया पराभूत झाली असली तरी भारतीय टेनिसमधील सर्वात उज्ज्वल भविष्य असलेली खेळाडू म्हणून तिचं सर्वत्र कौतुक झालं होतं. सानियाला आपल्या कारकिर्दीमध्ये एकही एकेरी ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवता आलं नसलं तरी दुहेरीमध्ये तिनं सहा विजेतेपदे जिंकली आहेत. या शिवाय, डब्ल्युटीए स्तरावर तिनं 40 हून अधिक विजेतेपद जिंकली आहेत. ऑगस्ट 2007 मध्ये तिच्या कारकिर्दीतील सर्वोच्च कामगिरी केली होती. त्यावेळी ती एकेरी क्रमवारीत 27व्या क्रमांकांवर पोहचली होती. एप्रिल 2015 मध्ये, सानिया दुहेरीमध्ये जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहचली होती.