सिल्हेट-बांगलादेश, 15 ऑक्टोबर: हरमनप्रीत कौरच्या टीम इंडियानं पुन्हा एकदा आशिया कपची ट्रॉफी भारतात आणली. 2018 साली बांगलादेशनं भारताला पराभवाचा धक्का देत आशिया चषक जिंकला होता. त्यानंतर 4 वर्षांनी पुन्हा ही झळाळती ट्रॉफी टीम इंडियाच्या शोकेसमध्ये दाखल झाली आहे. बांगलादेशच्या सिल्हेटमध्ये झालेल्या आशिया कप फायनलमध्ये वुमन्स ब्रिगेडनं श्रीलंकेचा 8 विकेट्सनी धुव्वा उडवला. या विजयासह टीमची कॅप्टन हरमनप्रीत कौरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. हरमननं महिला संघाची माजी कर्णधार मिताली राजची बरोबरी केली आहे. तर टीम इंडियाचा महान कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडीत काढला आहे. ‘कॅप्टन कौर’नं मोडला धोनीचा विक्रम महिलांच्या आशिया कपमध्ये भारतानं 8 पैकी तब्बल सात स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यात सर्वाधिक तीन वेळा स्पर्धा जिंकून देण्याचा मान मिताली राजकडे जातो. 2004 साली ममता माबेन यांच्या नेतृत्वात भारतानं पहिल्यांदा आशिया कप जिंकला. मग मितालीनं 2005, 2006 आणि 2008 साली विजेतेपदाची हॅटट्रिक केली होती. त्यानंतर 2012 साली टी20 संघाची कमान हरमनप्रीत कौरकडे आली. हरमननं 2012 आणि 2016 साली भारताला जिंकून दिलं. दुर्दैवाने 2018 साली हरमनची हॅटट्रिकची संधी हुकली. पण यंदा मात्र हरमनच्या नेतृत्वात भारतानं विजेतेपदाला गवसणी घातली आणि तिनं मितालीच्या विक्रमाची बरोबरी केली.
दुसरीकडे पुरुषांच्या आशिया कपमध्ये भारतानं सात वेळा विजेतेपद पटकावलं आहे. त्यात महेंद्रसिंग धोनी आणि मोहम्मद अजरुद्दीन यांच्या नेतृत्वात भारतानं दोन वेळा आशिया कप उंचावला होता. तर सुनील गावस्कर, रोहित शर्मा आणि दिलीप वेंगसरकर यांनी एकदा आशिया कप जिंकून दिला होता. त्यामुळे श्रीलंकेला फायनलमध्ये हरवून आज हरमनप्रीतनं धोनी आणि अझरलाही मागे टाकलं. हेही वाचा - Womens Asia Cup: आशिया कप फायनलमध्ये श्रीलंकेचा धुव्वा, हरमनप्रीतच्या टीम इंडियानं केला हा ‘भीमपराक्रम’ दोन वेळा पाकिस्तानला हरवलं 2012 आणि 2016 साली हरमनप्रीतच्या भारतीय संघासमोर आशिया कप फायनलमध्ये आव्हान होतं ते पाकिस्तानचं. पण या दोन्ही फायनलमध्ये भारतानं पाकिस्तानचा धुव्वा उडवला होता. आणि यंदा श्रीलंकेला हरवून तिसऱ्यांदा हरमनच्या नेतृत्वात भारतीय संघ चॅम्पियन ठरला.
#AsiaCup2022 𝗖𝗛𝗔𝗠𝗣𝗜𝗢𝗡𝗦 🏆
— BCCI Women (@BCCIWomen) October 15, 2022
Well done, #TeamIndia! 👏 👏#INDvSL pic.twitter.com/qYBP4t6WMV
हेही वाचा - T20 World Cup: 16 टीम्स, 45 सामने, एक ट्रॉफी… पाहा भारतात किती वाजता सुरु होणार टी20 वर्ल्ड कपचे सामने? आता लक्ष्य टी20 वर्ल्ड कप महिलांच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व राहिलं आहे. ऑस्ट्रेलियानं 2009 पासून आतापर्यंत झालेल्या सातपैकी पाच स्पर्धा जिंकल्या आहेत. तर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज प्रत्येकी एकदा विजेते ठरले. पण 2020 साली पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या वर्चस्वाला भारतानं आव्हान दिलं होतं. 2020 सालच्या वर्ल्ड कपमध्ये हरमनप्रीतची वुमन ब्रिगेड फायनलमध्ये पोहोचली. पण त्यावेळी ऑस्ट्रेलियानं भारताला विश्वविजयाची संधी मिळू दिली नाही. वन डेतही दोन वेळा फायनल खेळून भारतीय संघ एकदाही वर्ल्ड कप जिंकू शकलेला नाही. त्यामुळे हरमनप्रीत अँड कंपनीनं फेब्रुवारीत होणाऱ्या वर्ल्ड कपची तयारी आतापासूनच सुरु केली आहे.