पर्थ, 30 ऑक्टोबर: दक्षिण आफ्रिकेनं पर्थच्या मैदानात टीम इंडियाचा 5 विकेट्सनी पराभव करुन पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर केला आहे. डेव्हिड मिलर आणि एडन मारक्रमच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं सुपर 12 फेरीत ग्रुप 2 मध्ये दुसऱ्या विजयाची नोंद केली. गेल्या तीन सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं 2 विजय आणि एका अनिर्णित सामन्यासह 5 गुणांची कमाई करत पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थान गाठलं आहे. तर टीम इंडिया 4 पॉईंटसह दुसऱ्या स्थानावर आहे. पण यामुळे आता पाकिस्तानची मोठी अडचण झाली आहे. कारण पाकिस्तानला सेमी फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी आजच्या सामन्याचा निकाल भारताच्या बाजूनं लागणं गरजेचं होतं. ग्रुप 2 मध्ये काय स्थिती? सध्या दक्षिण आफ्रिका ग्रुप 2 मध्ये मजबूत स्थितीत आहे. टेम्बा बवुमाच्या या टीमनं अजून एकही सामना गमावलेला नाही. त्यांचे दोन सामने अजून शिल्लक असून पाकिस्तान आणि नेदरलँडविरुद्ध ते खेळतील. या दोनपैकी एक विजय त्यांना सेमी फायनलच्या प्रवेशासाठी पुरेसा ठरु शकतो. तर टीम इंडियाला आता उर्वरित दोन सामने जिंकून सेमी फायनलच्या तिकीटासह ग्रुपमध्ये स्थान मजबूत करण्याची संधी आहे. भारतासमोर आता झिम्बाब्वे आणि बांगलादेशचं आव्हान असेल. या ग्रुपमध्ये बांगलादेश 4 पॉईंटसह तिसऱ्या, झिम्बाब्वे 3 पॉईंटसह चौथ्या तर पाकिस्तान आणि नेदरलँड अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत.
Undefeated South Africa go on top of the Group 2 table 🌟#T20WorldCup Standings 👉 https://t.co/cjmWWRz68E pic.twitter.com/A4cpQMRgnP
— ICC (@ICC) October 30, 2022
पाकिस्तानचं काय होणार? टीम इंडियाच्या पराभवामुळे पाकिस्तानची चांगलीच अडचण झाली आहे. पाकिस्तानला आता सेमी फायनल गाठायची असेल तर पुढचे दोन्ही सामने जिंकून इतर संघांच्या निकालावरही अवलंबून राहावं लागेल. पाकिस्तानचा पुढचा सामना दक्षिण आफ्रिकेशी आहे. तर अखेरचा सामना बांगलादेशशी. ग्रुपमधील एकंदर समीकरणं पाहता पाकिस्तानसाठी सेमी फायनलची दारं जवळपास बंद झाली आहे. हेही वाचा - Ind vs SA: सेमी फायनलच्या तिकिटासाठी टीम इंडिया वेटिंगवरच, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाली ‘ही’ अवस्था पर्थमध्ये दक्षिण आफ्रिकेची सरशी दरम्यान आजच्या दिवसातली सुपर 12 फेरीच्या ग्रुप 2 मधील तिसरी लढत रंगली ती टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका संघात. डेव्हिड मिलर-एडन मारक्रम या जोडीनं केलेल्या निर्णायक भागीदारीमुळे दक्षिण आफ्रिकेनं या सामन्यात टीम इंडियाचा 5 विकेट्सनी पराभव केला. भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर 134 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण दक्षिण आफ्रिकेनं अखेरच्या ओव्हरमध्ये 2 बॉल बाकी ठेऊन हा सामना जिंकला आणि वर्ल्ड कपमध्ये दुसऱ्या विजयाची नोंद केली. त्याआधी आजच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशनं झिम्बाब्वेला आणि दुसऱ्या सामन्यात पाकिस्ताननं नेदरलँडचा पराभव केला.