मुंबई, 06 डिसेंबर : भारतीय संघाला बांगलादेशविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. इतर भारतीय फलंदाज बांगलादेशच्या गोलंदाजीसमोर निष्प्रभ ठरले मात्र केएल राहुलने सर्वाधिक 73 धावांची खेळी करून संघाला 186 धावांपर्यंत पोहोचवलं. त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली असती तर भारतीय संघाची धावसंख्या 200 च्या वर पोहोचली असती. पण भारतीय संघाला सामन्यात एका विकेटने पराभूत व्हावं लागलं.
केएल राहुलने पहिल्या सामन्यात ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली. तसंच त्याने यष्टीरक्षणाची जबाबदारीही सांभाळली. भारताचे माजी कर्णधार सुनिल गावस्कर हे केएल राहुलच्या या कामगिरीवर खूश झाले. त्यांनी यावर प्रतिक्रिया देताना केएल राहुल अष्टपैलू असल्याचं म्हटलं. तसंच आपल्या या वक्तव्याचं स्पष्टीकरणही दिलं आहे.
हेही वाचा : पाकिस्तानच्या पराभवामुळे भारताला फायदा, WTCच्या फायनलमध्ये पोहोचण्याची संधी
सुनिल गावस्कर म्हणाले की, केएल राहुल भारतासाठी पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे. धवन आणि रोहित सलामीला येत आहेत. तर विराट तिसऱ्या क्रमांकावर खेळतो. गेल्या काही काळापासून केएल राहुल पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करतोय. या क्रमांकावर तो आपलं स्थान भक्कम करतोय. यामुळे भारताला एक एक्स्ट्रा अष्टपैलूचा पर्याय मिळतोय.
तुमच्याकडे मधल्या फळीत पर्याय म्हणून एक असा खेळाडु आहे जो यष्टीरक्षण करू शकतो. त्यामुळे तुम्ही आणखी एका गोलंदाजाला खेळवण्याचा विचार करू शकता. मी त्याला अष्टपैलू म्हणतो कारण तो यष्टीरक्षण करू शकतो, सलामीला खेळू शकतो आणि पाचव्या क्रमांकावर खेळू शकतो. मला वाटतं की केएल राहुल अष्टपैलू आहे आणि त्याच्याकडे असलेला अनुभव, त्याचे फटके असे आहेत जे तुम्हाला पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फिनिशरसाठी हवे असतात असंही गावस्कर म्हणाले.
हेही वाचा : तुम्ही फक्त वऱ्हाडी गोळा करताय; टीम इंडियाच्या निवडीवर माजी क्रिकेटपटू संतापला
एकदिवसीयमध्ये केएल राहुलच्या अनुपस्थितीत पंत भारताचा यष्टीरक्षक आहे. पंतने यंदा 12 एकदिवसीय सामने खेळले, यात त्याने 37.33 च्या सरासरीने एक शतक आणि तीन अर्धशतकासह 336 धावा केल्या. तर केएल राहुलने बांगलादेशविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यासह 8 सामने खेळले. यात त्याने 32.71 च्या सरासरीने दोन अर्धशतकांसह 229 धावा केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Kl rahul, Sunil gavaskar, Team india