ब्रिस्बेन, 16 ऑक्टोबर: भारत आणि पाकिस्तान सामन्याआधी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. पण सोमवारी होणाऱ्या या सराव सामन्याआधी टीम इंडियाचा कसून सराव सुरु आहे. याच सराव सत्रादरम्यान एका छोट्या मुलानं हजेरी लावली. इतकच नव्हे तर त्यानं चक्क रोहित शर्माला नेट्समध्ये बॉलिंगही केली. आणि त्याची बॉलिंग पाहून रोहितही इम्प्रेस झाला. पण हा मुलगा आहे तरी कोण असा प्रश्न सगळ्यांनाच पडला. यावर आता बीसीसीआयनंच खुलासा केला आहे. बीसीसीआयनं एक व्हिडीओ शेअर करत रोहितल्या इम्प्रेस करणाऱ्या त्या मुलाची स्टोरी सांगितली आहे.
द्रुशिल चौहान टीम इंडियाच्या नेट्समध्ये
टीम इंडियाच्या नेट्समध्ये रोहितला बॉलिंग करणाऱ्या या 11 वर्षांच्या चिमुरड्याचं नाव आहे द्रुशिल चौहान. द्रुशिल रोहितचा मोठा फॅन आहे. टीम इंडियाचे व्हिडीओ अॅनालिस्ट हरी प्रसाद मोहन यांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ टीम इंडियाच्या पर्थमधील सराव सत्रादरम्यानचा आहे. सराव झाल्यानंतर जेव्हा टीम इंडिया ड्रेसिंग रुममध्ये जायची तेव्हा वाका मैदानात अनेक लहान मुलं खेळताना दिसायची. त्यातल्याच एका मुलानं सर्वांचं लक्ष वेधलं खासकरुन रोहितचं. आणि रोहितनं त्याला नेट्समध्ये येऊन बॉलिंग करण्यास सांगितलं.
द्रुशिलनं केली ड्रेसिंग रुमची सैर
द्रुशिलनं नेट्समध्ये रोहितला बॉलिंग केली. त्यामुळे इम्प्रेस झालेल्या रोहितनं नंतर द्रुशिलला टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्येही नेलं. जिथे त्यानं टीम इंडियाच्या स्टार खेळाडूंसोबत काही वेळ घालवला. यावेळी द्रुशिलनं क्रिकेटर होण्याची आपली इच्छा व्यक्त केली. या सगळ्याचा व्हिडीओ बीसीसीआयनं आपल्या वेबसाईटवर शेअर केला आहे.
!
When a 11-year-old impressed @ImRo45 with his smooth action! A fascinating story of Drushil Chauhan who caught the eye of #TeamIndia Captain & got invited to the nets and the Indian dressing room. #T20WorldCup Watch https://t.co/CbDLMiOaQO — BCCI (@BCCI) October 16, 2022
हेही वाचा - T20 World Cup: टीम इंडियाची ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'सराव परीक्षा', पाहा कधी आणि कुठे पाहता येणार मॅच?
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचा सराव सामना
23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानं टीम इंडिया आपल्या वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात करणार आहे. पण त्याआधी ब्रिस्बेनमध्ये टीम इंडिया दोन सराव सामने खेळणार आहे. तेही गेल्या वर्षीच्या वर्ल्ड कप फायनलिस्ट टीम्सशी. सोमवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये ब्रिस्बेनच्या गॅबा मैदानावर सराव सामना होणार आहे. त्यानंतर 19 ऑक्टोबरला भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सराव सामना खेळेल. पण त्याआधी कांगारुंविरुद्धच्या सराव परीक्षेत टीम इंडिया प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणते प्रयोग करणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Sports, T20 cricket, T20 world cup 2022